माडगं- मराठवाड्यातील पाककृती

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in पाककृती
24 Dec 2012 - 5:34 pm

माडग्याचे साहित्य:
तांदूळ- एक मोठी वाटी
तूरडाळ- एक वाटी
हळद- पाव चमचा
मीठ- चवीनुसार

माडग्याचे साहित्य

फोडणीचे साहित्य:
शेंगदाण्याचे तेल/ साजूक तूप
मोहऱ्या
जिरे

पाककृती:
तांदूळ धुवून निथळत ठेवा.
"माडग्या"त किंवा कोणत्याही जाड बुडाच्या पातेल्यात तूरडाळ, चार वाट्या पाणी आणि पाव चमचा हळद घालून मध्यम आचेवर शिजवायला ठेवा. दुसरीकडे चार-पाच वाट्या पाणी गरम करायला ठेवा. माडग्यामध्ये हेच पाणी अधूनमधून घालायचे आहे. डाळ शिजायला सुमारे अर्धा तास लागेल.

शिजलेली डाळ उलट्या पळीने थोडीशी घडसून धुतलेले तांदूळ आणि दोन वाट्या गरम पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. इथून पुढे पळीने अधूनमधून हलवत राहा (नाहीतर बुडाला लागून माडगं करपतं) आणि गरजेनुसार गरम पाणी घालत राहा. डाळ-तांदूळ अगदी एकजीव व्हायला हवेत, ताटात वाढल्यावर भाताची शिते दिसायला नकोत. माडगं अगदीच घट्ट व्हायला नको; साधारण सैल (फारसं न चावतही घश्याखाली उतरेल) असे व्हायला हवे. तांदूळ घातल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने माडगं तयार होईल.

तेल किंवा तुपाची जिरे-मोहऱ्या घालून फोडणी करा.

ताटात वाफाळतं माडगं वाढून त्यावर भरपूर फोडणी घालून खायला द्या. सोबत आंब्याचे मुरलेले लोणचे किंवा ताज्या हिरव्या मिरच्यांचा (हिरवे टमाटे घालून केलेला) ठेचा द्या.

 वाफाळतं माडगं

अधिक माहिती:
पूर्वी शेतकरी घरीच तूर भरडून तूरडाळ करायचे. त्यातून बरीच चुरी (डाळीचे तुकडे) निघायची. गिरणीतून साळीचे तांदूळ करून आणायचे. त्यातूनही बरीच चुरी (तांदळाचे तुकडे) निघायची. माडगं करण्यासाठी खासकरून या चुरींचा उपयोग करायचे.
माडगं हा पदार्थ रुचकर असून पचायला अतिशय हलका आहे. विशेषतः पावसाळ्यात-हिवाळ्यात करायलाच हवा.
"माडगं" हा पदार्थ बहुतेक वेळा "माडगं" याच नावाच्या काशाच्या/ पितळेच्या भांड्यात शिजवतात.

"माडगं"

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

24 Dec 2012 - 7:49 pm | इष्टुर फाकडा

मस्तच पाकृ. जास्त चावाचाव न करावे लागणारे पदार्थ मला नेहमीच आवडतात :)

माडगं हा पदार्थ रुचकर असून पचायला अतिशय हलका आहे. विशेषतः पावसाळ्यात-हिवाळ्यात करायलाच हवा.

पण हिवाळ्यात पचायला हलके पदार्थ कुठे खातात? या काळात पचनशक्ती चांगली असते की.

हे असे पदार्थ मला आवडतात पण,
ताटात वाढल्यावर भाताची शिते दिसायला नकोत
वरील चित्रात दिसत आहेत ती केवळ भात वाटीत वाढल्याने आहेत का? ;) आणखी घोटायला हवा हा पदार्थ.
डाळीची चुरी आणि तांदळाच्या कण्या यांच्या उल्लेखाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
या पदार्थासाठीचे स्पेशल भांडे माहित नव्हते. फोटू दिल्याबद्दल आभार.

रामदास's picture

24 Dec 2012 - 9:12 pm | रामदास

पण पात्र जास्तच आवडलं. तुम्ही फोटोत दाखवलं तसं माडगं कुठे मिळेल ? जुनं मिळालं तर फारच छान.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Dec 2012 - 9:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुळशी बागेतल राम मंदीर माहीत आहे का तुम्हाला?
त्याच्या बाजुला बरीच भांड्यांची दुकानं आहेत. तिथे पाहील्यासारख वाटतय. पण लहान होत ते.

तांबट आळी मधे नक्की मिळेल.

कौशी's picture

24 Dec 2012 - 11:06 pm | कौशी

माडगंपात्र कुठे मिळेल?

चिर्कुट's picture

24 Dec 2012 - 11:24 pm | चिर्कुट

मला माझ्या पणजीची आठवण येते..मी अगदी ५ वी ला होतो तोपर्यंत तिचा सहवास लाभला. माडगं हा तिचा अत्यंत आवडता पदार्थ. खास तिच्यासाठी माझी आई ते बनवायला शिकली :)

बर्‍याच दिवसांत खाल्लं नाही. आता घरी गेलो की बनवायला सांगावं लागणार :P

अजुन येऊद्या अश्या अनवट पाककृती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2012 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, ही तर पिव्वर खिचडी दिसत आहे.
माडगं म्हणुन काही स्पेशल दिसतंय का ? सॉरी हं चुभुदेघे.

[गाडग्यात म्हणलं असतं तरी चाललं असतं. माझी आजी अशा गाडग्यात वरण करायची]

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

25 Dec 2012 - 10:15 am | पैसा

पण दिसतेय तर खिचडीसारखी हो! नीट एकजीव झाले नाहीयेत डाळतांदूळ.

माडगं आवडलंच. गोव्यात अशा आकाराची भांडी तांब्याची किंवा मातीची मिळतात.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2012 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा...व्वा...नविन परकार...झ्याक हाय...आमच्या कोकणातल्या मेतकुट/मऊ भातासारखा :-)

किसन शिंदे's picture

26 Dec 2012 - 1:46 am | किसन शिंदे

ह्ये तर डाळखिचडीसारखं दिसतंय पण बहुदा त्या भांड्यात करत असावेत म्हणून त्याला माडगं म्हणत असावेत.

ते "अडगुलं, मडगुलं , सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा तीट लावा" मधलं मडगुलं म्हणजे हेच का माडगंपात्र?

सुहास..'s picture

26 Dec 2012 - 11:27 am | सुहास..

माडगं काय असते हा प्रश्न बर्‍याच जणांना पडलेला दिसतो आहे, म्हणुन मी जे माडगं पाहिले ते सांगतो.

मराठवाड्याकडे भिल्ल समाज याचा अजुन ही वापर करतो, हे एक छोटेसे मडके च असते , जेवण बनवुन झाल्यावर गरमागरम असताना ते माडग्यात घालायचे आणि थेट त्याचच खायचे. रानावनात भटकताना याच माडग्याला पांढरा कपडा बांधायचा आणि तेच माडगं कमरेला बाधांयच आणि ईमर्जन्सी जेवण म्हणुन वापरायचे. जेवण काही काळ का असेना गरम रहाते. खाताना थोडी मातकट चव लागते :) ( जशी सिझलर्स खाताना जळालेली ! )..माडग्यामध्ये, लाल मिरचीचे बेसन आणि भाकरीचे तुकडे टाकुन खायला ही मस्त वाटते .

वामन देशमुख's picture

26 Dec 2012 - 11:51 am | वामन देशमुख

प्रतिसादांबद्धल सर्वांचे मनःपूर्वक आभार! मिपावर पाकृ लिहिण्याची माझी ही पहिलीच वेळ.
या वेळचं माडगं खरंच फसलं, नीट शिजलंच नाही. (कारण ते करणारा मी होतो!) म्हणून भाताची शिते दिसताहेत. तथापि माडग्यात तांदूळ घातल्यानंतर घोटण्याची/ घडसण्याची नक्कीच गरज नाही.
भर्त्या बहुतेक जणांना माहित असेल. माडगं हे भांडं भर्त्यापेक्षा बरंच मोठं, सुमारे पाच-सात लीटरचं, पितळेचं किंवा काश्याचं असतं.
भर्त्या हे रोजच्या स्वयंपाकात चुलीवर डाळ शिजवण्यासाठीचं एक-दीड लीटरचं भांडं असतं. जास्त जणांसाठी स्वयंपाक करायचा असल्यास बहुधा माडगं वापरत असावेत.
आता कालौघात ही सगळीच भांडी मागे पडलीत. त्यातलं माडगं (आणि इतर कांही भांडी) मात्र आम्ही जपून ठेवलीत. वर्षातून एक-दोन वेळा ती वापरण्यात येतात. या भांड्यांचा लख्ख घासूनपुसून दिवाणखान्यात ठेवण्यासाठीही उपयोग करता येईल.
प्रतिसादाला उशीर झाल्याबद्धल क्षमस्व.

माडग ऐकुन होते. तुमच्या मुळे कृती अन पहायला मिळाल. या अनवट पाकृ बद्दल धन्यवाद.

रुमानी's picture

2 Jan 2013 - 11:25 am | रुमानी

छान आहे माडगं
.......(खिचडी)

प्रभाकर पेठकर's picture

3 Jan 2013 - 10:07 am | प्रभाकर पेठकर

'माडगं' म्हणजे बिन मसाल्याची, त्या विशिष्ट पात्रात केलेली मौ खिचडी. मस्तच दिसते आहे. वर जीरे-तुपाची सात्विक फोडणी म्हणजे स्वर्गसुखंच.

दिपस्तंभ's picture

30 Dec 2017 - 6:14 pm | दिपस्तंभ

आमच्या सांगली कोल्हापुरात कुळीथ किंवा हुलग्याचं माडगं करतात. पाकृ खालीलप्रमाणे

माडगं
साहित्य : कुळथाचे पीठ पाव वाटी, तांदळाचे पीठ एक चमचा, गूळ अर्धी वाटी, अर्धा चमचा साजूक तूप.
कृती : हुलग्याचे व तांदळाचे पीठ तुपावर थोडे भाजून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात थोडे पाणी मिसळून शिजायला ठेवावे. शिजत असताना सतत ढवळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. नंतर गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. खायला देताना साजूक तूप घालावे. यात वेलदोड्यांची फुलं घालायची गरज पडत नाही. कारण भाजलेल्या हुलग्यांना त्याचाच एक प्रकारचा सुगंध असतो. हुलग्याचं माडगं थंडीत खूप पौष्टिक मानलं जातं.
थोड्या शेवया घातल्या की अजून छान लागतं फक्त थंड चांगलं लागत नाही