साहित्य सँडविचसाठी:
अर्धा लिटर दूध
दीड टेस्पून लिंबाचा रस
३/४ वाटी साखर
दीड वाट्या पाणी
१/२ टीस्पून वेलची दाणे
पत्री खडीसाखर
बर्फाचे तुकडे
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवावे.
दूधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस थोडा-थोडा करून घालावा व सतत ढवळावे.
दूध फाटायला / नासायला लागून त्याचे पाणी (व्हे) वेगळे होऊ लागेल.
त्यात बर्फाचे तुकडे घालून गॅस बंद करावा व बर्फ पूर्ण वितळेपर्यंत ढवळत रहावे.
चाळणी स्वच्छ कापड ठेवून त्यात तयार केले पनीर गाळून घ्यावे.
कापडाची पोटली तयार करून शक्य तेवढे पिळून पाणी काढून टाकावे.
थंड पाण्याच्या नळाखाली पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल.
१/२ तास पोटली टांगून ठेवावी.
१/२ तासानंतर पनीरला एका ताटात काढून चांगले ७-८ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहीजे.
थोडे पनीर तळहातावर घेऊन चपटे करा व त्यात पत्री खडीसाखर ठेवा व त्याचा हलक्या हाताने छोटा चौकोन बनवा.
प्रेशर कुकरमध्ये दीड वाट्या पाणी व वेलची दाणे घालून उकळी काढा. उकळी आली की त्यात साखर घाला व ढवळा.
साखर विरघळली की त्यात तयार केलेले पनीरचे चौकोन हलकेच सोडा व कुकरचे झाकण बंद करा.
२-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा व कुकर लगेच थंड पाण्याच्या नळाखाली धरा म्हणजे वाफ निघून जाईल.
सँडविच तयार होऊन आकाराने दुप्पट झालेले असतील. २-३ तास पाकात मुरु ध्यावे.
साहित्य फिलींगसाठी:
२-३ टेस्पून घरी बनवलेला ताजा खवा
२ टीस्पून पिठीसाखर
रोझ वॉटर
१ टीस्पून पाण्यात मिसळलेले केशर
१-२ थेंब खाण्याचा गुलाबी रंग (ऐच्छिक)
चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
बदाम-पिस्ता पूड / काप
पाकृ:
खव्यात आवडीप्रमाणे पिठीसाखर एकत्र करून घ्यावी.
खव्याचे दोन भाग करावे, एका भागात रोझ वॉटर व थोडे केशर पाणी घालून एकत्र करावे व दुसर्या भागात रोझ वॉटर व खाण्याचा गुलाबी रंग एकत्र करुन घ्यावे.
तयार पनीरच्या चौकोनाला पाकातून काढून घ्यावे व ( पाक दाबून काढायचा नाही) मधो-मध कापून दोन भाग करावे.
एका भागाला केशरमिश्रीत खवा नीट पसरवून लावा व वर उरलेला पनीरचा भाग लावून सँडविच तयार करावे.
असेच दुसर्या सँडविचला गुलाबी खवा लावून घ्यावा.
बदाम-पिस्ता पूड व चांदीचा वर्ख लावून सजवावे.
मलई सँडविच खाण्यासाठी तयार आहे :)
नोटः
पनीर चांगले मळावे म्हणजे सँडविच मऊसूत व लुसलूशीत होतात, तसेच खडीसाखरेमुळे हलके व पोकळ होतात.
खाण्याचा रंग नाही घातला तरी चालेल.
खवा शक्यतो घरचाच व ताजा घ्यावा. (मिल्क पावडर वापरून खवा बनवू नये, चवीत फरक पडतो)
पनीरमध्ये रवा, मैदा बांईडिंगसाठी अजिबात मिसळू नये त्याने ते गार झाल्यावर वातड होतात.
अर्धा लिटर दूधाचे मध्यम आकाराचे चार सँडविचेस तयार होतात.
प्रतिक्रिया
26 Sep 2012 - 5:08 am | किसन शिंदे
क..ह..र
शेवटचा फोटो पाहून खपल्या गेलो आहे.
आज संध्याकाळीच आमच्या इथल्या प्रशांत मधून मलई सँडविच घेऊन येतो. ;)
26 Sep 2012 - 5:23 am | रेवती
सानिका, तोंपासू. बाप्पा नक्की खूष होणार या नैवेद्याने!
जरा खटपटीचा प्रकार आहे पण छानच!
26 Sep 2012 - 9:20 am | इरसाल
नाही नाही.राहु द्याच आता. छ्या..........
26 Sep 2012 - 9:25 am | झकासराव
लाळ गाळणार्या दहा स्मायल्या लावायला पाहिजेत असा धागा :)
26 Sep 2012 - 9:42 am | अक्षया
शब्द नाही आहेत!!! अप्रतिम.. :)
26 Sep 2012 - 9:49 am | ज्ञानराम
प्रेमात पडले रेसिपीच्या........ मस्त..
26 Sep 2012 - 10:09 am | प्रभाकर पेठकर
सुंदर, आकर्षक, रसाळ मलाई सँडविच फारच छान बनविले आहे. अभिनंदन.
26 Sep 2012 - 10:28 am | sagarpdy
या बाईना कित्येक भुकेल्या जीवांचे (आणि अविवाहितांचे) तळतळाट लागणारेत.
26 Sep 2012 - 11:32 am | ५० फक्त
अहो तुम्ही करता छान , तुमचे हे फोटो काढतात छान, इथं छान छान लिहिता, यात भर ती छान छान भांडी कुठुन आणता ओ, तुमचे धागे दाखवुन काहीतरी असलं कर असं बायकोल म्हणलं की ती म्हणते ' ते बघ ते तसलं भांडं आण आधी मग करते ' पुढच्या धाग्यापासुन भांड्यांचे सोर्स पण देत चला, आणि ते चमचा पाठवुन देणार होतात, त्याचं काय झालं. ?
26 Sep 2012 - 11:45 am | तर्री
काय बोलणार ? बोलती बंद !
26 Sep 2012 - 11:49 am | स्पा
यम्मि
26 Sep 2012 - 11:54 am | सस्नेह
हवीहवीशी पाकृ..पण खटपट भारी ! कुणी आयती करून देईल का ?
26 Sep 2012 - 12:26 pm | गणपा
जरा मेहनतीचं काम आहे.
पण चवीचं खायचं म्हटली की मेहनत आलीच. :)
26 Sep 2012 - 12:33 pm | अभ्या..
ग्रेट सानिकातै ग्रेट
पाकृ ग्रेट
सादरीकरण अजूनच ग्रेट
व्हिज्युअलायझेशन प्रचंड भारी आहे. (असे नवीन प्रयोग करताना करण्याआधीच डोळ्यासमोर ती पाकृ आणि जिभेवर त्याची चव जाणवत असते का? ;-) )
26 Sep 2012 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
26 Sep 2012 - 1:30 pm | मोहनराव
_/\_ सलाम.. बाकी नेहमीच, छान छान, तोंपासु वेग्रे वेग्रे...
26 Sep 2012 - 1:42 pm | प्रचेतस
_/\_
26 Sep 2012 - 1:56 pm | Mrunalini
वा.. मस्तच गं.... एकदम tempting आहे.... करुन बघायलाच पाहिजे, पण इथे खवा मिळत नाही आणि घरी करायचा म्हणजे खुप वेळ जातो. कधीतरी सुट्टिच्या दिवशी करुन बघेल. :)
26 Sep 2012 - 3:13 pm | सानिकास्वप्निल
खवा मायक्रोवेव्हमध्ये छान पटकन बनतो...मी नेहमी मायक्रोवेव्हमध्येच बनवते :)
धन्यवाद :)
26 Sep 2012 - 4:05 pm | कवितानागेश
मायक्रोवेव्हमध्ये कसा करायचा ते सांगाल का?
पॉवर अॅडजस्ट करावी लागेल ना?
27 Sep 2012 - 6:16 pm | सानिकास्वप्निल
मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवर वर दूध गरम करुन घ्यावे ५ मिनिटे..नंतर ते उतू जात नसल्यास दर दोन-तीन मिनिटांनी हाय पॉवर वर आटत रहावे.
जितके जास्त दूध तितका जास्त वेळ लागतो आटवायला (गॅसवर आटवण्यापेक्षा नक्कीच कमी) .
मायक्रोवेव्ह सेफ बाऊलच वापरावे
26 Sep 2012 - 2:22 pm | पिंगू
प्रतिक्रिया काय देणार.. फोटो बघुनच खपलोय...
26 Sep 2012 - 2:27 pm | प्रास
मी धागा उघडला नाही, त्यामुळे वाचलाच नाही म्हणून मग मी फोटो पहाण्याचा प्रश्नच नाही तर आता बादलीभर लाळ गळून अचानक मलई सँडविच खाण्याची इच्छा का बरं होतेय, काही कळतंच नैये...... :-(
26 Sep 2012 - 2:31 pm | गवि
धागा न उघडल्याने जे फोटो पाहिले नाहीस त्यात हा फोटोही होता का? नीट पाहून सांग बरे..
26 Sep 2012 - 2:38 pm | प्रास
अजून मिपावर आपण दिलेल्या प्रतिसादावर कुणी प्रतिसाद दिलाय याचा वेगळा संदेश येत नाही. तेव्हा माझ्या प्रतिसादावर कुणी उपप्रतिसाद दिलाय हेच मला कळलेले नाही त्यामुळे त्यात कुणी एखादा फोटो चिकटवलाय हे समजणं अशक्यच आहे तरी मेलं ते मलई सँडविच खावसं का वाटातंय ब्वॉ? ;-)
26 Sep 2012 - 2:30 pm | धनुअमिता
खुपच छान आहे रेसिपी. नक्की करुन बघणार.
26 Sep 2012 - 3:22 pm | हरिप्रिया_
अ प्र ति म !!!!
खुप मस्त दिसत आहे.
26 Sep 2012 - 8:59 pm | मी_आहे_ना
सानिकाताई, आपली पाकृ पाहत/वाचत असतानाही माझ्या सारख्या (चहा आणि कधीकधी मुगाची खिचडी बनवणार्या)चीही ब्रह्मानंदी टाळी लागते... अप्रतिम सादरीकरण! तुम्हाला -^-
27 Sep 2012 - 12:48 am | मराठे
मेलो!
27 Sep 2012 - 1:36 am | मोदक
भारी.
हातात कला आहे तुमच्या..... :-)
27 Sep 2012 - 7:45 am | Pearl
अप्रतिम..
तों.पा.सू.
27 Sep 2012 - 2:33 pm | सुहास..
एखादी ग्रंथ आटोपतानाची स्मायली मिळेल का ? ;)
27 Sep 2012 - 3:01 pm | पियुशा
सुपर्ब !
लाजवाब !
यम्मी !
चल आता एक पार्सल दे पाठवूण हिकडे :)
27 Sep 2012 - 11:29 pm | पैसा
सानिका, तुझे पाय कुठे आहेत? फोटो पाठव,
30 Sep 2012 - 8:08 pm | डावखुरा
बंगाली मिठाई सदृश्य पदार्थ...
टपक...
टपक..
टपक.
;)
1 Oct 2012 - 10:26 am | चिंतामणी
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
फक्त एक बारीकशी दुरुस्तीसाठी सुचना. दूध न म्हणता गाईचे दूध असे म्हणायला हवे होतेस.
(राणीच्या देशात गाईचेच दूध मिळते. म्हणून तु नुसते दूध असे म्हणले असशील. पण आमच्या देशात म्हशीचेच जास्त वापरले जाते. पनीरसाठी गाईचेच दूध उत्तम)
तू "परफेक्षनीस्ट" आहेस. म्हणून हे सुचवले.
1 Oct 2012 - 3:59 pm | सानिकास्वप्निल
काका भारत हा माझा ही देश आहे :)
आणी पनीरसाठी गाईचेच दूध उत्तम हे बहुतेक सर्वांनाच माहीत असते म्हणून तसे लिहिले नाही, तरीही पुढच्यावेळेपासून तसे ही नमूद करेन :)
प्रतिसादासाठी धन्यवाद :)
1 Oct 2012 - 4:41 pm | प्रभाकर पेठकर
पनीरचे दोन प्रकार येतात. एक हार्ड पनीर दुसरे सॉफ्ट पनीर.
हार्ड आणि सॉफ्टपणा हा दुधातील फॅट मुळे ठरतो. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते त्यामुळे म्हशीच्या दुधापासून बनविलेले पनीर हार्ड असते.
पाककॄतीच्या गरजे नुसार पनीर वापरावे. वरील पाककृतीस सॉफ्ट पनीर लागेल तेंव्हा ते गाईच्या दुधापासून बनविलेलेच चांगले.
बाकी पनीरच्या काही पाककृतीत, जसे पालक पनीर, बटर पनीर, पनीर भुर्जी तसेच सजावटीसाठी वापरण्याचे पनीर हार्ड पनीर असल्यास चव चांगली येते (त्यातील फॅटच्या प्रमाणामुळे).
हार्ड पनीर जास्त तळल्यास रबरासारखे होते. ते टाळण्यासाठी एकतर पनीर रंग बदलेपर्यंत तळू नाही. आंच मंद असावी. तळलेले पनीर कढईतून (तेलातून) काढल्या बरोबर थंड पाण्याने भरलेल्या वाडग्यात टाकावे आणि थंड झाले की वापरावे. रबरासारखे होत नाही.
सॉफ्ट पनीर करण्यासाठी गाईचे दूध मिळाले नाही तर म्हशीचे दुध तापवून, रुम टेंपरेचरला आले की फ्रिज मध्ये ठेवून द्यावे. काही तासांनी त्यावर साय जमा होईल ती काढून टाकावी. पुन्हा दुध तापवून वरील प्रमाणेच प्रक्रिया करून पुन्हा साय काढून टाकावी. दोनदा असे केले की म्हशीच्या दुधापासूनही सॉफ्ट पनीर बनते.
2 Oct 2012 - 12:42 am | चिंतामणी
धन्यु.
2 Oct 2012 - 2:02 pm | प्राजु
तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे!!
तुझ्या रेसिपीज शेअर करताना अभिमान वाटतो तुझा. :)
19 Oct 2012 - 9:34 pm | स्वातीदेव
मला ही पाककृती दिसत नाही.
बाकीच्या धाग्यांवर सुद्धा काही प्रतिसाद दिसत नाहीत. काय कारण असेल?
20 Oct 2012 - 1:57 am | प्रभाकर पेठकर
'काही कारणाने' आपण 'मलई सँडविच' सारखे पदार्थ खाऊ नये अशी ईश्वरेच्छा असेल. (ह. घ्या.)
संपादकांना 'साद' घाला, 'प्रतिसाद' दिसतील.
20 Oct 2012 - 2:46 am | कौशी
काय कारण असावे..
20 Oct 2012 - 2:46 am | कौशी
काय कारण असावे..
22 Oct 2012 - 3:02 pm | अल्केमिस्ट
छान,,, तोंडाला एकदम पाणी सुटले
22 Oct 2012 - 6:51 pm | खादाड
काय प्रतिसाद द्यावा सुचत नाहिये !!
22 Oct 2012 - 7:56 pm | अनन्न्या
मस्त!!! पण मि करताना पाकात फुट्ले.पनिरचि खिर केलि,खवा घालुन!! जुनीच वाचक पण नवीन सभासद!!