खूप दिवस मनात होते नॉर्थ कॅरोलिना झू पहायला जाउया, पिल्लूला पण मजा येईल झू पहायला. पण हिवाळ्यामुळे थांबावं लागत होतं. खूप थंडी ,बोचरं वारं आणि लहान दिवस यामुळं इतके दिवस हा बेत पुढे ढकलला जात होता.पण एप्रिलमध्ये टेंपरेचर चांगल सुधारू लागलं, पारा वर चढू लागला आणि दिवसही छान मोठा होत गेला. मग वेदर पाहिलं आणि एकदा ठरवलं की या विकांताला झू पहायचं.
झू ची साइट पाहिली. अगदी सविस्तर माहिती दिली होती. इथलं हे आवडतं आपल्याला. साइटवर अगदी इत्थंभूत माहिती दिली असते, की झू ला पोहोचायचे कसे, झू सुरू आणि बंद होण्याच्या वेळा काय आहेत, तिकिटांचे रेट काय आहेत, स्किम्स काय आहेत, तिथे काय काय अॅट्रॅक्शन्स आहेत, झूच्या आतील भागाचा मॅप, झूमध्ये कोणकोणती रेस्टॉरंट्स आहेत, त्याचा मेनू काय आहे, 'what to bring' लिस्ट, झू चे नियम, तिथे उपलब्ध असणार्या आणि नसणार्या सोयी-सुविधांची लिस्ट वगैरे वगैरे..
नॉर्थ कॅरोलिना झू चांगलचं मोठं आहे. त्याचे मुख्यत: २ भाग आहेत,
१) नॉर्थ अमेरिका रिजन
२) अफ्रिका रिजन
त्या त्या रिजन मध्ये तिथे तिथे आढळणारे प्राणी पहायला मिळतात. झू खूप मोठं असल्याने शक्यतो एका दिवशी एकच रिजन कव्हर होतो. आमचाही वन डे ट्रीपचा प्लॅन होता. मग अफ्रिका रिजनचे प्राणी जास्त इंटरेस्टिंग वाटल्याने तोच रिजन पहायचा ठरवला. शिवाय जिराफ डेक, डायनोसॉर चा 4-D शो आणि अॅनिमेट्रॉनिक डायनोसोर्स पहायचे हेही रडारवर होते. कॅरोसेल (आपलं मेरी गो राउंड असतं ना तसं) पण आहे तिथं. पण ते सगळीकडंच असतं म्हणून म्हंटलं वेळ मिळाला तरच कॅरोसेल राइड घेऊ.
असा सगळा बेत ठरला, तारीख ठरली. झू आमच्यापासून साधारण दीड-पावणेदोन तासावर आहे. ९ ते ५ अशी त्याची वेळ असल्याने घरातून सकाळी ७ ला निघण्याचा अतिमहत्वाकांक्षी प्लॅन केला :-) (तो तसाच बनवावा लागतो ;-)) त्याप्रमाणे सकाळी ६ वाजता डोळे चोळत उठलोही. मग चहा, आवराआवरी, पिल्लासाठी २/३ आलू पराठे बनवणे. अधेमधे पॅकिंग करणे. म्हणजेच पाणी-स्नॅक्स-कॅमेरा-छत्री इ.इ. वस्तू शिवाय छोटीचा खाऊ-स्नॅक्स-पराठे-पाणी-ज्यूस-कपडे हे सगळं सॅकमध्ये भरणे. मग पिल्लाला उठवून दौडादौडा भागाभागासा करत तिचं आवरून, दूध पिण्यासाठी साम-दाम-दंड-भेद करत तिला काही खाऊ-पिऊ घालून एकदाचे ८:३० ला घरातून निघालो.
ट्रीप म्हंटलं ना की मला जाम मजा येते लहान मुलासारखी. आपण कुठेतरी मस्त भटकायला चाललो आहोत म्हणून मी खूष असते. सकाळचा मस्त गारवा होता. ट्रॅफिक पण कमी होतं. कारमध्ये आवडीच्या गाण्यांची सिडी लावली होती. तासाभराने सबवे ला थांबून मस्त सँडविच खाल्लं. वेजिटेरिअन लोकांसाठी सबवे ही खूप छान सोय आहे. हेल्दी आणि टेस्टी. आता साधारण दहा वाजले होते.
मग परत झूच्या दिशेने आगेकूच. पण जसं झू जवळ येऊ लागलं, झूपासून अगदी १-२ mile अंतरावर आलो, तसं गाड्यांची गर्दी वाढू लागली. आणि पुण्याच्या हिंजवडीला जसं वरातीतून गेल्यासारखी गाडी चालवावी लागते तशी गाडी चालवावी लागतं होती. कारण सगळेच जण बच्चे कंपनीला घेऊन (गर्दी टाळायला म्हणून ;-)) लवकर येऊन पोचले होते.
झालं. पार्किंगपर्यंत जायला अर्धा तास आणि तिथून पुढे परत तिकिट काढायला भली मोठी रांग. वर उन्हाचा तडाखा. तिकिटं काढून प्रवेश मिळवायला जवळजवळ दीड तास लागला. शेवटी साडेबाराला आत पोचलो. मग थोडं फ्रेश होऊन मस्तपैकी झू फिरलो, जिराफ डेक पाहिला. तिथे जाऊन जिराफांना झाडाचा पाला खाऊ घालण्याचा कार्यक्रम झाला. खूप मजा आली आणि खूप जवळून जिराफ पहायला मिळाले. खरचं इतका राजबिंडा असतो हा प्राणी. तेव्हापासून जिराफ माझा एकदम फेवरेट प्राणी झाला.
मग सिंह, झेब्रे, शहामृग, हरिण, गेंडे, अफ्रिकन हत्ती, गोरिला, लेमूर(माकडाची एक जात), फ्लेमिंगो असे भरपूर प्राणी-पक्षी पाहिले. मजा आली.
नंतर मग डायनो 4-D शो पाहिला. सह्ही.. होता. त्यानंतर अॅनिमेट्रॉनिक डायनोसोर्स चा छोटा पार्क पाहिला. काय सही बनवलेत डायनोसोर्स. मस्तच. बच्चेकंपनीला तर खूप आवडले. अगदी खर्या डायनोसोर सारखे दिसतात आणि (एका जागीच) मुव्हमेंट करतात, हात हलवतात, डोक हलवतात, डोळे फिरवतात, आवाज काढतात, काही डायनोसोर तोंडातून पाणी फवारतात (स्पिटिंग डायनोसोर) . मस्तच. डोळे तर इतके जबरी केलेत की काही काही डायनो आपल्याकडेच पहात आहेत असं वाटतं... :-)
अशी मस्त सफर करून आणि एक छानसे सोवेनिअर घेऊन मग (परत ती सकाळची गर्दी नको म्हणून) झूच्या बंद व्हायच्या वेळेच्या अर्धा तास आधीच बाहेर पडलो आणि लगेच हायवे ला लागलो. परत एकदा सकाळचेच सबवे गाठले आणि १-१ फूटलाँग सँडविच फस्त करून परतीच्या वाटेवर निघालो. आणि ७ च्या सुमारास घरी परतलो. आणि भरल्या पोटी मस्त ताणून दिली :-)
फोटो गॅलरी:
1) माझे लाडके जिराफ :-)
2) अॅनिमेट्रॉनिक डायनोसोर्स:
3) झू मधले इतर प्राणी व पक्षी

प्रतिक्रिया
17 Apr 2012 - 10:22 am | अमृत
जिराफ, हत्ती आणि फ्लेमिंगोचे फोटो २-२ दा आहेत बाकी प्रण्यांवर अन्याय का? आणखी फोटो टाका की इथे नाही मम्हणजे फोटोंची गुणवत्ता चांगली वटली म्हणून म्हणतो :-)
अमृत
17 Apr 2012 - 10:36 am | पियुशा
+१
हेच म्हणते ऑर भी आने दो दीद्दी ;)
17 Apr 2012 - 10:59 am | कौतिक राव
खुप सुन्दर फोतो आहेत. खरच अजून आसतील तर प्लीज टाका ना!!
तो आफ्रिकन हत्ती खरा अहे का हो?
जस्ट एक जिज्ञासा आली म्हनून विचारले, क्रुपया राग मानू नये.
17 Apr 2012 - 11:43 am | तुषार काळभोर
प्राणी व प्राणीसंग्रहालयाची स्वच्छता पाहून अंमळ हळवा झालो.
(पुण्याचं सर्पोद्यान आवडणारा) पैलवान.
(पुण्याचं सर्पोद्यान सुद्धा वाईट नाहिये, पण हे नॉ. कॅरोलिना प्राणिसंग्रहालय म्हणजे जरा जास्तच टापटीप आहे.)
17 Apr 2012 - 12:59 pm | अन्नू
छान, सहलीचे फोटो अगदी बेस्टच आलेत.
या निमित्ताने बालवाडीतल्या सहलीची आणि त्या सहलीला नेणार्या बाईंची प्रकर्षाने आठवण आली.
(अवांतरः- नंतर याच बाईंच्या झिंज्या मी ओढल्या होत्या! ;) )
17 Apr 2012 - 1:11 pm | यकु
हत्ती अगदी शाडूने बनवून त्या हिरवळीत ठेवल्यासारखा वाटतोय :D
छान फोटो.
यावरुन एक विनोद आठवला. एकदा आमच्या गावातल्या आयाबायांची ट्रीप शेगावला गेली. तिथल्या बागेत रात्रीच्या वेळी एका स्त्रीच्या सुंदर मूर्तीलाच एका महामायेने विचारलं, ''ओ बाई, किती वाजलेत हो आता?..
17 Apr 2012 - 1:17 pm | मेघवेडा
एकदंताचे फोटो मस्त आहेत!
बाकी झू बी प्रकरणं आपल्याला खपत नाहीत. बिचारे कोंडलेले प्राणी.. :(
मागं एकदा एका ठिकाणी एका झूमध्ये वाघाला कलिंगडाशी खेळताना पाहिल्यापासून पुन्हा झूमध्ये पाय ठेवायचा नाही असं ठरवलं आहे. :)
17 Apr 2012 - 2:09 pm | गणपा
धागाकर्तीला नाउमेद करण्याचा प्रयत्न नाही. फोटो सुरेखच आहेत यात वाद नाही.
मात्र हे खरयं.
आधी त्यांच घर हिसकावुन घ्यायचं. मग त्यांना एका बंदिस्त जागेत कोंडुन परत त्या वरुन पैसा ओढायचा. माणसाची जातच नालायक.
(या प्राण्यांना त्यांच्या घरात पहायचं भाग्य लाभलेला) - गणा
1 May 2012 - 11:32 am | चित्रगुप्त
यावरून आठवलं,
Desmond Morris यांचे 'The Human Zoo' हे पुस्तक. मनुष्येतर प्राणी व मनुष्य यांच्यातील संबंध, साम्य, इ. उलडून दाखवणारे अप्रतिम लेखन.
18 Apr 2012 - 7:28 pm | Pearl
>> बिचारे कोंडलेले प्राणी..
आधी त्यांच घर हिसकावुन घ्यायचं. मग त्यांना एका बंदिस्त जागेत कोंडुन परत त्या वरुन पैसा ओढायचा. माणसाची जातच नालायक.
>>
+१
तिथं जाऊन आल्यापासून मला पण राहून राहून हेच वाटतं आहे :-(
कारण त्यांना कितीही प्रशस्त मोकळी जागा दिली आणि आयतं खायची सोय केली तरी नैसर्गिक वास्तव्य (नॅचरल हॅबिटॅट) ते नैसर्गिक वास्तव्य. पिंजरा सोन्याचा असला तरी तो पिंजराच ना :-( मे बी पुढच्या वेळी कोणत्याही झू ला जायच टाळेन.
(थोडं अवांतर होईल कदाचित)
पण अजून काही गोष्टी पण खूपतात.
(कृपया खालील गोष्टी कोणीही वैयक्तिक घेऊ नये. कोणावरही आरोप करण्याचा हेतू नाही.)
१) वर्तमानपत्रात बातम्या येतात. अमूक अमूक प्राणी / पक्षी (पारवा, कावळा, हरिण, गरूड वगैरे) जखमी पडला होता. पण काही लोकांनी माणूसकी दाखवून त्यांना वाचवलं, बरं केलं वगैरे.
त्या काही लोकांत मासाहारी लोक पण असतात. मला कळतं नाही की एकीकडे तुम्ही (तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला म्हणून) धडधाकट प्राण्यांची कत्तल करायला लावता /करवता आणि दुसरीकडे ह्या जखमी प्राण्यांना वाचवल्याचा बेगडी आनंद मिळवता.
२)पोल्ट्री फार्म्समध्ये वगैरे ठेवल्या जाणार्या प्राण्यांची अवस्था तर प्राणीसंग्रहालयापेक्षा वाईट असते.
ते प्राणी तिथे एवढ्याचसाठी आणले जात आहे कारण मासाहारींना ते खाण्यासाठी हवे आहेत.
३) असं ऐकलं आहे की मास टेस्टी व्हाव म्हणून काही ठिकाणी प्राण्यांना हाल करून ठार मारले जाते. खरं खोटं माहिती नाही. पण असं होत असेल तर हेही खूपच क्रूर आहे.
माणसाची जात खरच वाईट आहे. म्हणून मला जे शक्य आहे ते करायचे ठरवले आहे.
१)लहानपणी रेशमी किड्यांपासून रेशीम (सिल्क) मिळवतात एवढच वाचलं होतं. पण हल्ली हल्लीच नेमके कसे रेशीम मिळवतात ती माहिती वाचनात आली. आणि तेव्हापासून ठरवले आहे की रेशिम वापरायचे नाही. लेदर तर कधीच वापरले नाही.
२)असं ठरवले आहे की सर्व्हायवलचा प्रश्न आला तरच अंडी खायची. घरी अंडी वापरून कोणताही पदार्थ करत नाही. बाहेरही अंडी/अंड्याचे पदार्थ खात नाही. कोणासाठी बर्थडे केक घ्यायचा झाला तर एगलेसच घेते. पण जिथे आपला कंट्रोल नाही तिथे (उदा. विकतच्या काही पदार्थातून उदा. कोणाच्या बर्थडे पार्टीचा त्यांनी आणलेला केक, स्विस रोल इत्यादी) अंडी खाल्ली जातात त्याला नाइलाज आहे.
३)मास-मच्छी मुद्दामच कधीही खाल्ले नाही, चव पण पाहिली नाही. कारण आपल्या सर्व्हायवलसाठी शाकाहार उपलब्ध असताना, मुद्दाम प्राण्यांच्या कत्तलीला कारणीभूत व्हावे असे कधी वाटले नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एनिवे..
शाकाहारी खायचं की मासाहारी हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी आपलं माझं मत व्यक्त केलं. माझ्या मतामुळे कोणी दुखावले गेले असल्यास क्षमस्व.
1 May 2012 - 11:35 am | चित्रगुप्त
पण हल्ली हल्लीच नेमके कसे रेशीम मिळवतात ती माहिती वाचनात आली. ... ही माहिती आम्हालाही सांगावी, अशी विनंती.
1 May 2012 - 11:40 am | शिल्पा ब
आम्हाला तर शाळेत असतानाच एक धडा होता त्यात ही माहीती होती की रेशीम किडे जे कोष विणतात ते उकळत्या पाण्यात टाकुन धागे काढतात. जे कोष असतात त्यातच ते कॅटरपिलर पण असतं. थोडक्यात लॉबस्टर / क्रॅब वगैरे बनवतात तो प्रकार. भयानक आहे.
18 Apr 2012 - 7:37 pm | पैसा
झूमधे प्राणी बघायला बरं वाटत नाही हे खरं, पण लहान मुलांना जिवंत प्राणी एरवी बघायला मिळतच नाहीत. हत्ती वगैरे डिस्कव्हरीसारख्या चॅनेल्सवर बघायला मिळतात, पण त्यांच्या खर्या आकाराचा अंदाज प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कसा येणार? शिवाय अनेक झूमधे अनाथ झालेल्या प्राण्या-पक्ष्यांच्या पिल्लांना जगवलं जातं. तेवढंच वाईटात चांगलं म्हणायचं.
18 Apr 2012 - 7:51 pm | Pearl
@अमृत, पियुशा, कौतिक राव,
धन्यवाद...
अजून फोटो आहेत. लवकरचं टाकेन.
आणि हो तो हत्ती खरा आहे कौतिक राव :-) पण खरं सांगायच तर मला आपले भारतीय हत्तीच जास्त आवडतात. ते उंच, डौलदार, तजेलदार वाटतात. आणि त्यांचा करडा रंग पण छान वाटतो.
@ गणपा, मेघवेडा, यकु, पैलवान, अन्नू, पैसा
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
26 Apr 2012 - 4:57 am | शिल्पा ब
छान.
अवांतरः मला असं वाटतं इथे अमेरीकेत किंवा बहुतेक प्रगत देशांमधे प्राणिसंग्रहालय वगैरे करताना त्यांना कीती जागा योग आहे वगैरे तज्ञांकडुन ठरवले जात असावे. हे प्राणि बहुदा एकेकटे किंवा लहान असताना असे आणलेले असतात. त्यांची काळजी घेतली जाते. पिंजरा कीतीही छान असला तरी तो पिंजराच असतो हे मान्य केले तरी लोकांना प्राण्यांबद्दल माहीती व्हावी, त्यांच्याविषयी "जनावरं" म्हणुन असलेली भावना कमी व्हावी हासुद्धा उद्देश असु शकेल. प्रगत देशात स्वच्छतेची काळजी घेतली जातेच.
मांसाहार करणे वगैरे पर्सनल प्रश्न आहेत. माणुस अगदी शाकाहारीच होता, अन मांसाहार अयोग्य वगैरे मला पटत नाही कारण शरीराला आवश्यक व्हिटामीन "बी" मांसाहारातुन मोठ्या प्रमाणावर मिळते. जर मांसाहार शरीराला अयोग्य असता तर निसर्गाने अशी रचना केली नसती. माणसाने सगळे संतुलन बिघडवले ही वेगळी गोष्ट. असो. हे माझं मत आहे.
1 May 2012 - 12:57 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम फोटो. चर्चा रोचक!