आपल्याला नेहमी येता जाता कसलीतरी दृश्ये दिसतात आणि त्यातून काहीतरी मनात उमटतं. असल्या दृश्श्यांना, असल्या क्षणात घडून गेलेल्या किश्श्यांना नेहमीच काही विशेष अर्थ असतोच असे नाही. बस्स काहीतरी चटकन होऊन जातं आणि आपण तेवढ्यापुरतं आश्चर्य वाटून गप्प बसतो. त्याबद्दल कुठे बोलावं एवढं महत्त्व कदाचित त्या दृश्याला किंवा सहज घडून गेलेल्या किश्शाला कदाचित असत नाही. पण असली दृश्ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असतील हे नक्की. ती इथे कृपया सगळ्यांनी द्यावीत. ही दृश्ये बिनमहत्त्वाची असली तरी ती खरी असावीत, काल्पनिक नकोत. ती विनोदी, दु:खद, सुन्न करणारी, कुणाचातरी मूर्खपणा जाहिर करणारी कसलीही असू द्या, पण ती 'समथिंग रिअल फ्रॉम रिअॅलीटी' असावीत.
सुरुवात मी करतो.
-----------------------------------
आमची कॉलनी तशी रिटायर्ड लोकांची कॉलनी म्हणता येईल. पँटला पट्टा न लावता इन केलेले, पांढर्या सुती पँटी घालून सत्तरी-बहात्तरीतले आणि अनेक पावसाळ्या उन्हाळ्यातून आलेला घरंदाज जख्खपणा मिरवत सेकंड इनिंगवाले इकडेतिकडे फिरताना नेहमीच दिसतात. त्यामानाने तरुण मुले मुली तुरळक रस्त्यावर दिसतात - दिसले तरी भुर्रर्रकन गायब होण्यापुरतेच. मग पायी चालणारे हेच पैलतोगे काऊ कोकताहे वाल्या वृद्ध आणि वृद्धा!
कॉलनीतल्या कुठल्याही रस्त्यावर जा, शांतता तर एवढी की ही सुखवस्तू घरे उगाच बांधून ठेवली आहेत, तिथे खरंतर कुणीच रहात नाही, लोक घरे सोडून कुठेतरी निघून गेले आहेत असं वाटावं एवढी.
मी ज्या रस्त्याने ऑफिसकडे चालत येतो त्यावरील बंगल्यासमोर कधीकधी एक आजोबा बसलेले दिसतात. त्यांना कॅथेटर लावलेलं आहे. हे आजोबा पण जख्खच! ठेंगणी मूर्ती, गोल गरगरीत डोके आणि जाड गोलगोल वर्तुळे दिसणारा त्यांचा तो लठ्ठ काचेचा जुना चष्मा. बाबा सत्तरी-पंच्याहत्तरीचे सहज असतील, चेहेर्यावर मात्र दोन वर्षाच्या मुलाच्या चेहेर्यावर असतात तसे, जगाबद्दल कायम उत्सुक असल्यासारखे, आजूबाजूच्या हलणार्या जगाबद्दल परम आश्चर्य दाखवणारे भाव! आणि कधी कधी ते कॅथेटरची पिशवी हातात घेऊन बंगल्यासमोरच्या फूटपाथवरुन जवळपास दुडूदुडू धावत, त्याच नेहमीच्या आश्चर्यचकित चेहेर्याने इकडेतिकडे पहात शतपावली करतात ते पाहून तर 'वृद्धत्त्वी नीज शैशवास जाणे' या ओळी त्यांच्यात मूर्तीमंत झाल्यासारखे वाटते. सकाळी आणि सायंकाळी ते आपले आजूबाजूच्या हलत्या, चालत्या जगाचं निरीक्षण करीत, उत्सुक होऊन बसून असतात, हे मी नेहमी पहातो.
लांबून जवळ येणार्या माणसाकडे टक लाऊन पहाणे, आणि जवळ आल्यावरही कुणी त्यांच्या नजरेला नजर दिली की ते आजोबा नक्की काहीतरी बोलणार!
मलाही ते बर्याच वेळा बोलले आहेत - पण स्वत:च्या मनगटावर टिचकी मारुन त्यांचा तो ठरलेला प्रश्न!
''किती वाजलेत??''
किती वाजलेत हे त्यांना सांगताना मला फार आनंद होतो.
प्रतिक्रिया
1 Sep 2016 - 8:19 pm | बहुगुणी
हा एक चांगला धागा थंडावला होता तो परत वर आणतोय. मी इथेच इतरत्र लिहिलेल्या काही किश्श्यांसहः
१. जिंदगी के सफर में गुज़र जाते जो मुकाम, वो फिर नही आते.....
महिन्यापूर्वी
नव्यानेच रुजू झालेला एक सहकारी माझ्याकडे आला, म्हणाला, "थोडा वेळ आहे?" म्हंटलं, "शुअर, काय हवंय?" म्हणाला, "मी ते Major Equipment Grant चं प्रपोजल countersign साठी Dean कडे पाठवलं होतं आठवड्यापूर्वी, बर्याचदा reminder e-mails पाठवल्या, पण अजून उत्तर नाही. उद्या शेवटचा दिवस आहे सबमिशनचा, कुणाला विचारू?"
मेडिकल स्कूलच्या डीनची सही ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नव्हे, ते कागदपत्र प्रायॉरिटी लिस्ट वर नेमकं कुठे आहे हे त्यांची सेक्रेटरी आणि चीफ ऑफ स्टाफ ठरवतात, आणि त्यांच्या हातून ते डीनच्या टेबलपर्यंत पोहोचलं आणि त्यांना वेळ झाला तर ती सही होणार. तेंव्हा नुसत्या इ-मेल रिमाईंडर वर होणारं हे काम नक्कीच नाही. मी म्हंटलं "फोन केला होता का?" "नाही," म्हणाला, "I wasn't sure if the Chief of Staff would like it..he is so imposing, I am almost scared to approach him". खरंही होतं ते म्हणा, रिचर्ड म्हणून चीफ ऑफ स्टाफ होते ते खरंचच माणूस दबेल असं व्यक्तिमत्व. फील्ड मार्शल माणेकशॉ सारख्या भरघोस मिशा आणि तशीच बलदंड देहयष्टी, पब्लिक टरकून असायची डिकला. मी म्हंटलं बस इथे, आताच विचारुयात फोन करून. त्यांना फोन लावला, "डिक, थोडं काम होतं...." त्यांनी सांगितलं की ते प्रपोजल त्यांनी पाहिलंय आणि आज त्यावर सहीदेखील होईल डीनची, पण डीन कडे फॉरवर्ड करण्याआधी या वर्षात आवश्यक असलेली budgetary commitment खरंच शक्य आहे का याचं confirmation Accounts कडून अजून आलं नाहिये, ते तासाभरात मिळेल, त्यानंतर सही होईल आणि मग घेऊन जा म्हणावं. त्याप्रमाणे तासाभरात त्यांचा फोन आला आणि माझा सहकारी जाऊन त्याचं प्रपोजल घेऊन आला. म्हणाला, "Got it! Didn't meet Richard, wanted to say thanks. I will send an e-mail. Thanks for your help."
दोन आठवड्यांपूर्वी
सोमवारी सकाळी ऑफिसमध्ये येऊन इ-मेल्स पहातो, तर वरतीच डीन कडून सर्व स्टाफ ला आलेली इ-मेल- "Dick is No More!"...आतल्या मजकूरावरून कळलं की गेली चार दशकं तीन डीन्सचा चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करणार्या, सायकॉलॉजीत मानद प्राध्यापक असलेल्या आणि नुकतीच पी एच डी पूर्ण केलेल्या डिक चा शुक्रवारी संध्याकाळी दु:खद मृत्यू झाला होता. Condolence meeting सोमवारी संध्याकाळी होती. त्यावेळी कळलं की हा कर्तव्यकठोर, फारसं कधी कुणाशी मिळून-मिसळून वागणारा नसला तरी अतिशय कार्यक्षम असा गृहस्थ खरा मनाने अतिशय सरळ होता, स्थानिक चर्चसाठी आणि इतर कामांसाठी खूप देणग्या द्यायचा, आणि पेशंट्सना नकळत आर्थिक मदत करायचा, वगैरे, वगैरे...हे सगळं मग obituaryत छापून आलं, आणि सर्व स्टाफला इ-मेल मधून कळलं.
दोन दिवसांपूर्वी
सुटीवर परदेशी गेलेला माझा सहकारी परत आला, आणि धावतच माझ्याकडे आला, "Did you see this news about Richard?" मी म्हंटलं,"Yes, that was a real shock." तो म्हणाला "My God! And after reading all those good things about him...now I feel why I did not wait and thank him in person? Now I never will!"
2. Pay it forward
सोमवारी सकाळी ९ ची वेळ. एलिव्हेटर मध्ये ८-९ जण भरले होते. आपापल्या मजल्यांची बटनं दाबून झाल्यावर सगळी मंडळी आपले स्मार्ट फोन काढून बटनं दाबायला लागलेली (मी देखील!) दार बंद होता-होता एक कृष्णवर्णीय मध्यमवयीन स्त्री धावतच आत आली, कुणीतरी हात लांबवून दार उघडं ठेवून तिला आत येऊ दिलं, तिने 'थँक यू' म्हणतांना दार बंद झालं. तेवढ्या क्षणभरच वर बघणारी मंडळी पुन्हा आपापल्या फोनांकडे वळली आणि एलिव्हेटर वरच्या दिशेने निघाली. "Good Morning, Everybody!" त्या स्त्रीने खणखणीत आवाजात मागे वळून लोकांकडे पहात म्हंटलं, गोड हसून. एक-दोघांनी, खजील होत "Good Morning!" म्हंटलं. तिसर्या मजल्यावर एलिव्हेटर थांबल्यावर ती स्त्री उतरून "बाय!" म्हणून मागे न पहाता निघून गेली. त्यानंतरच्या जवळ जवळ प्रत्येक मजल्यावर एलिव्हेटर थांबल्यावर, बाहेर जाणारी प्रत्येक व्यक्ती उरलेल्यांना "हॅव अ नाईस डे!" म्हणत गेली. ...दुसर्या दिव्याची ज्योत लावण्याने पणतीचं काहीच बिघडत नाही.
३. केवळ हलकी-फुलकी गंमत
अशीच सकाळची घाईची वेळ. मी, बरोबर बरीच निरनिराळ्या ऑफिसातील लोकं, आणि एक वैद्यकीय शास्त्रज्ञ पण खडूस म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर एलिव्हेटर मध्ये. दार बंद होता-होता एक शिडशिडीत तरूण धावत आत आला. सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह वगैरे असावा अशी हातात ब्रीफकेस, काळा सूट, पण झटकन लक्षात भरली ती त्याची उंची, आम्ही सगळे ५-६ फूटी मंडळी असलेल्या त्या एलिव्हेटरमध्ये हा चांगला सात फूटी लंबूतडांग तरूण एका कोपर्यात सरकून उभा राहिला. एलिव्हेटर वर निघाली. पिन-ड्रॉप शांततेत आवाज आला, ते खडूस म्हणून कुप्रसिद्ध असलेले डॉक्टर त्या तरूणाला विचारत होते, "How's the weather up there?" नंतर उसळलेला हशा मी अजून विसरू शकलेलो नाही ;-)
1 Sep 2016 - 8:22 pm | पिलीयन रायडर
"How's the weather up there?" =))
मस्त वाटलं सकाळी सकाळी हे वाचुन!
छान धागा आहे हा!
2 Sep 2016 - 8:25 pm | मोदक
मी अनुभवलेला एक लिफ्टमधला किस्सा..
बरेच वर्षांपूर्वी.. म्हणजे दिल चाहता है नवीन नवीन होता आणि आमिर खानची नक्कल करत खालच्या ओठाखाली दाढीचा एकच त्रिकोणी पॅच घेवून जिथेतिथे फिरणारे दिसायचे त्यावेळी..
मंगेशकर हॉस्पीटलची लिफ्ट.
सर्वप्रकारचे लोक त्या लिफ्टमध्ये भरले गेले आणि लिफ्ट वर जावू लागली..
एका मजल्यावर लोकांची अदलाबदल झाली, त्यात एक इंटर्न दिसणारी डॉक्टर युवती आत आली. आल्या आल्या लिफ्टमधल्या एकाला "हाय..!" केले.. आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
बोलता बोलता तिने विचारले, "तू कुठे असतोस आता..?"
"UK" हनुवटीखालच्या दाढीवाल्याकडून एकशब्दी उत्तर आले..
बाकी लोकांच्या कौतुकाच्या नजरा तो झेलत असताना तिने सगळ्यांसमोर त्याचा कचरा करत विचारले.
"उरळी कांचन..?"
तो हो म्हणाला
..आणि सगळे जण हसायला लागले.
1 Sep 2016 - 8:32 pm | मुक्त विहारि
भिकारXX य़कू.
यकूचे धागे वाचले की, आमचे असेच होते.
भेंडी,
त्याला देवाने बोलावले त्यावेळी आम्ही नेमके परदेशी....
आज परत एकदा, रात्र जागवणार हा यकू.....
1 Sep 2016 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्रास होतो. :(
-दिलीप बिरुटे
1 Sep 2016 - 11:13 pm | मुक्त विहारि
+ १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
3 Sep 2016 - 3:06 pm | ज्ञानोबाचे पैजार
साला उगाच त्याची आठवण येत रहाते मग दिवसभर
पैजारबुवा,
3 Sep 2016 - 9:52 pm | कैलासवासी सोन्याबापु
यकुचा माझा वैयक्तिक परिचय नव्हता, पण त्याच्या उल्लेखाने माझे खुपसे जवळचे मित्र मी स्तब्ध अन निःशब्द होताना पाहिले आहेत त्यावरून अंदाज येतोच.
धागा यकुचा आहे, जाणतेअजाणतेपणी वरती आलाय अन काल परवाच एक विलक्षण दृश्य पाहिले ते कुठेतरी मनावर कोरले गेले आहे.
काही कामानिमित्त ग्वालियर मध्यप्रदेशला जाणे झाले होते, मी ग्वालियर कॅन्टॉन्मेंटच्या जवळच असलेल्या बिगबझार समोर उभा होतो, तिथे काही कॉलेजवयीन मुलामुलींचा घोळका मस्त खिदळत होता आयुष्याची मजा घेत होता. काही वेळाने तिथे एक डोंबारी फॅमिली आली, टीपीकल चार बांबू लावून दोरी ताणून उणेपुरे 4 वर्षे वयाची पोरगी खेळ करू लागली, तसे ती कॉलेजची पोरे त्यांच्यावर सुद्धा खिदळू लागली, अश्या काही प्रसंगात आपण stereotype करतो, लोकांना, प्रांताला, समाजाला, देशाला कोणालाही, पण पुढे जे घडले ते पाहून मी अंतर्बाह्य सुखावलो, थोडे खिदळणे झाल्यावर पोरे शांत झाली अन आपापसात काहितरी बोलली, तोवर खेळ संपला होता, ती छोटी छोकरी पैस्या करता थाळी फिरवत होती, तेव्हा त्या कॉलेज गटातील एका गोड़ मुलीने ती थाळी अक्षरशः त्या लहानग्या पोरीच्या हातून काढून घेतली अन तिच्या हातात चक्क एक पुस्तक कोंबले! जवळ जाऊन पाहता ते हिंदी इंग्रजी बाराखडीचे पुस्तक होते , सहज मी कॉलेज कन्येला विचारले
"आप हमेशा ये बच्चों की किताबे साथ रखती हो क्या??"
"हा सर"
"मे आय आस्क व्हाय??"
"सर आप बस ये बच्ची की ख़ुशी देख लो"!!
मी त्या नंतर निःशब्द झालो होतो, आनंद भरून येत होता, तसाच मुक्कामी परत येऊन मी अगोदर 5 मिनिटे आनंदाश्रू ढाळले, अन खूप खुश झालो, हा देश महान आहे , कायम होता अन कायम राहील, तो का राहील? ह्याचे उत्तर मला सायंकाळी 2 जोडी डोळे देऊन गेले होते, एक त्या छोकरीचे अन एक त्या कॉलेज कन्येचे :)