खांदेरी जमला पण उंदेरी हुकला

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
2 Mar 2012 - 9:17 pm

खरेतर गेल्या वर्षी हा ट्रेक केल्यानंतरच फोटोवृत्तांत टाकायचा होता पण कामाच्या व्यापामुळे नाही जमले. तेव्हा गेल्या वर्षी होळीला केलेल्या ह्या ट्रेकचा हा फोटोवृत्तांत.

लेख थोडा मोठा झालाय आणी फोटोपण लोड व्हायला वेळ लागेल कदाचीत पण हा एकच दिवसाचा ट्रेक होता म्हणून क्रमश: न टाकता सलग एकाच भाग टाकलाय.
_________________________________________________

काही वर्षांपूर्वी जेव्हा खांदेरी-उंदेरी किल्ले कोण्या व्यावसाईकाला होटेल/मॉटेल बांधण्यास विकले हे वाचल्यानंतर ह्या किल्ल्यावर जायची ईच्छा बळावली. त्यादिशेने शोध सुरु केल्यानंतर असे कळले की हे किल्ले आता मुंबई पोर्ट ट्रस्ट, कस्टम व नौसेनेच्या ताब्यात गेलेत आणी ईच्छा जशी बळावली तशीच मावळली पण.....:( तरीसुद्धा किल्ल्यावर जायची आशा काही सोडली नव्हती. जिथून जमेल तिथून माहिती गोळा करत होतो की किल्ल्यावर जायला कसे जमेल पण फार काही माहिती हाताशी लागली नाही. पण इंटरनेटवर खांदेरी आणी उंदेरीचे फोटो बघून असे वाटत होते की काहीना काही उपाय नक्की असेल. मुंबई पोर्ट ट्रस्ट मधे पण माहिती काढायचा प्रयत्न केला पण जमले नाही आणी शेवटी नाद सोडला.

किल्ला काही डोक्यातून निघून गेला नव्हताच पण मनात असे म्हणालो की किल्ल्याला काही आपल्याला आत्ता बोलवायचे नाहीये आणी तो जेव्हा आपल्याला बोलावेल तेव्हा काहीतरी मार्ग निघून किल्ल्यावर जाता येईलच.

आणी असेच घडले. एक दिवशी असाच इंटरनेटवर सर्फ करत होतो आणी किल्ल्यावर जायची किल्ली गवसली. “मार्च महिना आणी होळीची वेळ”. खांदेरीचा योग गाठायचा म्हणजे होळीच्या दिवसाचा मुहूर्त पकडणे गरजेचे होते आणी २०१० च्या एप्रिल-मे मध्ये जेव्हा हे समजले तेव्हा होळी होऊन गेली होती व २०११ च्या होळीची वाट बघणे गरजेचे होते.

पूर्ण वर्ष वाट बघितल्यानंतर जेव्हा २०११ ची होळी जवळ आली तेव्हा ठरवलेच की यंदा हा योग साधायाचाच.....:) त्याप्रमाणे अजून दोघा मित्रांना तयार केले आणी होळीचा दिवशी पहाटे २ बाईक वरुन थळ गावाकडे निघालो.

साधारण ९.३० ला थळ गावातल्या जेट्टीवर पोचलो आणी तिथल्या पहिल्या दृश्याने मन प्रसन्न झाले.

थळ बंदर आणी धक्का

थळच्या किनार्‍यावरून एकाच दृष्टिक्षेपातले खांदेरी आणी उंदेरी

थळ आणी आजूबाजूच्या गावामध्ये आणी एकंदरीत कोकणात होळी म्हणजे वर्षातला एक मोठाच सण आणी त्यासाठी सगळे गाव आणी बंदर धक्का नटला होता. सगळीकडच्या होड्या पताका आणी झेंडे लाऊन सजवल्या होत्या. होळी म्हणजे ईथल्या मच्छीमार लोकांचा सुट्टीचा दिवस, त्या दिवशी त्या परिसरातले कुठलेही लोक होडी मासेमारीसाठी समुद्रात लोटत नाहीत. उलट होड्या सजवून समुद्रात जाउन समुद्राला नारळ देणे, होड्यांच्या शर्यती लावणे, घरच्या लोकांना घेऊन समुद्रात चक्कर मारणे थोडक्यात काय एक दिवस स्वत:साठी आणी घरच्यांसाठी वेगळा काढणे असे चालते. बंदरावर एका झाडाखाली गप्पा ठोकीत बसलेल्या लोकांना खान्देरीवर जायचे सांगितल्यावर आम्हाला पहिला धक्का बसला. होळीच्या दिवशी कोणीही म्हणून होडी समुद्रात लोटत नाहीत आणी सकाळी समुद्रात गेलेले १२ च्या आत परत किनार्‍यावर आपआपल्या घरी येऊन पुरणा-वरणाचा नैवैद्य दाखवतात. त्यामुळे आमची होळीची वाट बघण्याची वाट लागतेय की काय असे वाटले :(

तसेही खांदेरी किल्ला सरकारच्या अखत्यारीत असल्याने आणी किल्ल्यावर दिपगृह असल्याने किल्ल्यावर परवानगीशिवाय जाता येत नाही असे कळले होते पण गावातल्या लोकांनी एका माणसाचे नाव सांगितले व सांगितले की फक्त त्यांच्याकडे किल्यावर जायची परमिशन आहे. मग काय त्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांच्या कडे गेल्यावर त्यांनी आमचे स्वागत करून चहा वगैरे दिला पण खांदेरीला चलणार का विचारल्यावर कानावर हात ठेवले आणी म्हणाले की होळीच्या दिवशी आम्ही होडी नेणार नाही :(. म्हणाले की होळी सोडून इतर कुठल्याही दिवशी या तुम्हाला किल्लावर नेतो :( (शेवटी होळीची किल्ली दुसर्‍याच कुलुपाची निघाली).

शेवटी बर्‍याच गप्पा केल्यावर त्यांना आमची दया आली असावी आणी त्यांनी त्यांच्या अविनाश नावाच्या मुलाला आम्हाला किल्ल्यावर न्यायला सांगितले (अर्थात आम्ही त्यांना मोबादल्याचे सांगितले होतेच) अविनाश आणी त्याचा ग्रुप त्यांच्या होडीने असाच समुद्रात चक्कर मारायला निघाला होता आणी आम्ही त्यांच्या होडीत शिरकाव केला. होडीतली बर्फाची सोय, कोल्ड्रिंक, काळी पिशवी बघून ही चक्कर कसली आहे त्याचा आम्हाला लगेच अंदाज आला :)

त्यांच्याशी गप्पा मारता मारता कळले की त्या ग्रुप मधले दोघे जण माझ्या मित्राचे लहानपणाचे मित्र आहेत आणी आम्ही त्यांना त्यांचा चक्कर प्रोग्राम खांदेरीतच करण्याची विनंती केली :) अणी नशीब की त्यांनी ती मान्य केली.

होडीने थळ सोडताच समुद्राचा खारा वारा नाकात भरला आणी होडी खांदेरीकडे निघाली. खांदेरीकडे जाताना ह्या लोकांचे उगाच दुसर्‍या होडीच्या मध्येच ये, कोणाशीतरी शर्यत लाव, मध्येच हळू चालव, मध्येच उगाच अ‍ॅक्सीलेरेटर पीळ असे मजे मजेचे प्रकार चालले होते.

आमच्या होडीची ह्या होडीशी शर्यत लागली होती

ह्या होडीशी पण पंगा घेतला

थळ गावाच्या समोरच उंदेरी किल्ला दिसतो आणी त्या पाठीमागे थोड्या अंतरावर खांदेरी किल्ला आहे. उंदेरीला वळसा मारल्यांनातर खांदेरी दिसला. थोड्याच वेळात आम्ही खांदेरीच्या धक्क्यावर उतरलो.
अविनाशच्या ग्रुपने एका झाडाखाली बैठक मारली आणी आम्ही त्यांना दोन तासात किल्ला भटकून येतो असे सांगितले.

ह्या दोन तासाच्या भटकंती दरम्यान मी काढलेले काही फोटो

थळ सोडल्यानंतर दिसणारा उंदेरी

उंदेरीला वळसा मारल्यानंतर दिसणारा खांदेरी

खांदेरी धक्क्याकडे जाताना

वेतोबाचे देऊळ

खांदेरी धक्का

धक्क्यावर उतरल्यावर

किल्ल्यावर उतरल्यावर लगेच समोर दिसते ते दिपगृह. अविनाशचे काका तिथे काम करत असल्याने तेही आतून बघायची सोय झाली. दिपगृहाकडे जाताना वाटेत एक दर्गाह, एक हनुमानाचे, एक ज्ञानेश्वरांचे आणी एक देवीचे देऊळ लागते.

दिपगृहाकडे

हनुमान, ज्ञानेश्वर मंदिर आणी दर्गाह

दिपगृहात फोटो काढायला बंदी असल्याने त्याचे फोटो काढले नाहीत. दिपगृह बघून झाल्यावर किल्ला भटकायला बाहेर पडलो. किल्ला फिरताना एक जाणवले की भर समुद्रात वार्‍या पावसाचे फटके खात असूनही किल्ल्याची तटबंदी चांगलीच शाबूत आहे. दिपगृहाच्या पायर्‍या उतरल्या की उजवीकडे लगेच तो प्रसिद्ध दगड आहे. ह्या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या वर दुसर्‍या दगडाने आपटल्यावर भांडी (खासकरून तांब्याची) आपटल्यावर येतो तसा आवाज येतो.

भांड्याचा आवाज करणारा दगड

निसर्गाचा हाही एक चमत्कारच म्हणायचा. हा दगड बघून झाल्यावर आम्ही पश्चिमेकडून तटबंदीवरून फेरी मारायला सुरुवात केली. लगेचच तटालगतच एक मोठे पाण्याचे टाके आहे आणी त्यातच एक तुळशी वृंदावन आहे.

पाण्याचे टाके आणी तुळशी वृंदावन

ते बघून झाल्यावर परत तटावर आलो. तटावरून फेरी मारताना एक जाणवत होते की त्यावेळी किल्ल्यात खूप बांधकाम असावे कारण जागोजागी बांधकामाचे अवशेष दिसत होते. फेरी मारताना थळच्या बाजूला आल्यावर दूरवर उंदेरी खुणावत होता. किल्ल्याच्या ह्या बाजूला प्रचंड मोठे वृक्ष आहेत पण त्यांच्या खाली आणी वाटेत जागोजागी रान माजले होते त्यामुळे कधी आतमधून आणी कधी तटावरून किल्ल्याची फेरी करत होतो. ह्याबाजुला दर थोड्या अंतरावर बुरुज आणी बर्‍याच बुरुजावर तोफा दिसतात. एका बुरुजावर अलिबागच्या किल्ल्यासारखी गाड्यावाराची तोफ आहे. तटावरून फेरी मारताना वाटेत एक आग्या वेताळाचे देऊळ लागले. एक दोन बुजलेली पाण्याची टाकीही लागली.

किल्ल्याचा दक्षिण भागाचा फेरा

खांदेरीवरून दिसणारा उंदेरी आणी थळचा किनारा

फेरी पूर्ण करून परत किल्ल्याचा मध्यभागी आलो आणी दुसर्‍या बाजूला मोर्चा वळवला. उत्तर दक्षिण पसरलेल्या खांदेरी किल्यात दोन टेकड्या आहेत. एक मोठी जिच्यावर दिपगृह आहे आणी जिला आत्ताच आम्ही फेरा मारुन आलो ती आणी दुसरी त्याच्या पेक्षा छोटी जी किल्ल्याच्या उत्तर भागात आहे. ह्या दुसर्‍या टेकडीच्या बाजूला काही विशेष नाही. समुद्राच्या दिशेला असणारा चोर दरवाजा, परत काही अर्धवट बुजलेली पाण्याची टाकी, खुरटी झुडुपे, वाळलेले गवत, थोडेसे बांधकामाचे अवशेष आणी फार थोडी झाडे.

किल्ल्याचा उत्तर भाग

चोर दरवाजा

ह्याही बाजूला तटबंदीवरून पूर्ण फेरी मारता येते. दक्षिण भागासारखे ह्याही भागात दर थोड्या अंतरावर बुरुज आहेत. त्यातल्याच एका मोठ्या बुरुजावर परत दोन गाड्यावारच्या तोफा आहेत. फेरी पूर्ण करता करता वेतोबाचे मोठे आणी कौलारू देऊळ लागते. हा किल्ल्याचा मुख्य देव. तिथे आजूबाजूच्या गावातले लोक होळीला बळी देतात. आमच्या समोरच काही लोकांनी कोंबड्याचा मान पिरगाळून बळी दिला :(

वेतोबाचे देऊळ आणी बुरुज

वेतोबाचे दर्शन झाले की आपण फेरी पूर्ण करून परत धक्क्याच्या दिशेला येतो

आम्ही परत येईपर्यंत अविनाशच्या गृपचेही उरकलेले होते आणी आम्ही परत यायला निघालो. जरी थळवरून निघताना फक्त खांदेरीची बोली झाली होती पण जाता जाता उंदेरीही पदरात पडावा म्हणून आम्ही अविनाशला गळ लावत होतो. जर का पूर्ण ओहोटी असती तर कदाचित तो तयारही झाला असता कारण उंदेरीला पूर्ण ओहोटीच्या वेळी पुळणीला होडी लागू शकते. आम्ही त्याला एवढेही सांगितले की जेवढे जास्त जवळ नेता येईल तेव्हढे ने उरलेले अंतर आम्ही पोहत जातो पण तो तयार होईना. येताना काही होड्या व काही लोक उंदेरीवर फिरताना दिसले पण आमच्या काही ते नशिबात नव्हते. एकदा तर समुद्रातच दुसर्‍या होडीत, जी उन्देरीला जात होती, त्यात जातो असे देखील म्हणालो पण तो बधला नाही त्यामुळे उंदेरी मात्र आमचा हुकला.

हुकलेला उंदेरी बाहेरून

वरच्या फोटोत सगळ्यात उजवीकडच्या होडीच्या सगळ्यात उजव्या झेंड्याच्या मागे उंदेरीचा दरवाजा आहे

थळ गाव व RCF चा प्रकल्प

परत किनार्‍यावर आलो आणी थोडी खुशी थोडे गम असा विचार करत परत घरी यायला निघालो. परत येता येता मी ज्याचा गेली ३ वर्षे तपास करत होतो त्या ठिकाणाची अचूक जागा सापडली हेच काय ते समाधान. येताना पळीचा सॅम्सन सोडा पिउन ट्रेकची सांगता केली.

खांदेरीचा ट्रेक जरुर एकदा करण्या सारखा आहे आणी माझ्यासारखा गेली अनेक वर्षे हुलकावणी देत असेल तर नक्कीच करण्यासारखा आहे. अश्या ट्रेक नंतरचे समाधान काही औरच.... :)

________________________________________________
वरील सगळे फोटो मी माझ्या कॅमेराने काढले आहेत.

परत पुढच्या ट्रेकला भेटुच....

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Mar 2012 - 9:55 pm | प्रचेतस

फोटो आणि वर्णन फारच सुरेख.
अगदी तपशीलवार माहिती दिलीत.
खांदेरीच्या रणसंग्रामाची माहिती कुणी देईल काय?

मालोजीराव's picture

5 Mar 2012 - 4:15 pm | मालोजीराव

या बेटावर १६७० च्या आसपास छत्रपतींनी पाहणी करून बांधकामास सुरुवात केली...'टोपीकर फिरंगी प्रबळ जाहला' अश्या सूचना देत त्यांनी दौलतखानच्या सहाय्याने किनारपट्टी आणि समुद्रावर
आपला वचक ठेवण्याचे प्रयत्न केले...सिद्दी आणि इंग्रजांनी बरेच अडथळे आणल्याने काम बरेच स्लो चालले होते...१६७९ च्या अखेरपर्यंत काम चालू होते.
दौलतखानाने कडवा प्रतिकार केल्याने शेवटी कंटाळून इंग्रजांनी १६८० ला तह केला.
मुंबईकर टोपीकराने "शिवाजीने खांदेरी उभारणे म्हणजे मुंबईच्या गळ्यावर तलवार ठेवण्यासारखे आहे" अश्या आशयाचे पत्र त्याच्या राजास लिहिले होते !
- मालोजीराव

अन्नू's picture

2 Mar 2012 - 10:48 pm | अन्नू

आवडेश! :)

सुहास झेले's picture

3 Mar 2012 - 12:48 am | सुहास झेले

मस्त माहिती आणि फोटो.... गेल्या रविवारी आमच्या ग्रुपने (VAC ने) इथला दौरा केला, दुर्दैवाने मला नाही जमले, बघू कधी जमतंय :( :(

झकास ट्रेक झाला..

डीटेल माहिती बद्दल धन्स..! :-)

पाषाणभेद's picture

3 Mar 2012 - 6:07 am | पाषाणभेद

नाय पान्यामदी नाय पायला कदी
किल्ला जंजीरा दाखवाल का?
हो नाखवा बोटीनं फिरवाल का?

नको मुंबई नको पुना अहो नको नको मला गोवा
किल्ला कुलाबा मला खंदेरी उंदेरी दावा

एकदम झकास गाणे अन तसाच झकास लेख!

मस्त फोटो आणि मस्त रिपोर्ट, जेंव्हा इकडं जाणार असेन तेंव्हा व्यनिनं कळवेन, थोडं लक्ष ठेवा.

बाकी इथल्या तोफा, इतर किल्यांवरच्या तोफांपेक्षा वेगळ्या दिसत आहेत.

सुहास झेले's picture

5 Mar 2012 - 7:06 pm | सुहास झेले

मी कदाचित १८ तारखेला जातोय खांदेरीला .... रविवार आहे. बघा जमतंय का यायला. मी एका ग्रुपसोबत येतोय.

कॉमन मॅन's picture

3 Mar 2012 - 12:04 pm | कॉमन मॅन

अतिशय सुरेख..!

सुकामेवा's picture

5 Mar 2012 - 3:26 pm | सुकामेवा

परत कधी जाणार असल्यास जरूर कळविणे

वपाडाव's picture

5 Mar 2012 - 3:39 pm | वपाडाव

येक्क नंबर...

पैसा's picture

5 Mar 2012 - 8:43 pm | पैसा

फोटो आणि वृत्तांत फार आवडला. कधीतरी उंदेरीला पण जाऊन या अन असाच वृत्तांत द्या!

एकदम झकास ..

भटकंती लय आवडली

प्रचेतस's picture

7 Mar 2012 - 7:22 pm | प्रचेतस

फोटो दिसले का रे पण?