दिनविशेष : २७ फेब्रुवारी - 'जागतिक मराठी भाषा दिवस'

सागर's picture
सागर in काथ्याकूट
27 Feb 2012 - 12:55 pm
गाभा: 

माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे अभिमान

असे अभिमानाने आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना एक अभिमान देणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करायचे घोषित केले. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला आणि हा दिवस आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो.

तेव्हा समस्त मराठी जनांना 'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा

जागतिक मराठी भाषा दिवस

कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना कुसुमाग्रजांना कधीही मानवली नाही. अनेकांनी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रयत्न केले. पण वाढदिवसाच्या आधी २ दिवस ते अज्ञातवासात निघून जात. परंतु त्यांच्या ८५ व्या वाढदिवशी मात्र त्यांच्या चाहत्यांनी त्यांना प्रेमाची भेट दिलीच.

कुसुमाग्रजांना मुळातच आकाश चांदणे, तारे, तारकांचे वेड होते त्यामुळे अवकाशातील एका तार्‍यालाच त्यांनी कुसुमाग्रजांचे नाव दिले. स्वीडनमधील इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री मार्फत दि.२७ फेब्रुवारी १९९६ रोजी स्वर्गदारातील तारा (स्टार इन द गेट वे ऑफ हेवन्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तार्‍याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. एवढयावरच त्यांचे चाहते थांबले नाहीत तर त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. आणि तो सिद्धीसही नेला.

Kusumagraj

नाशिक ही कवी आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. अनंत कान्हेरे, वीर सावरकर अशा क्रांतिवीरांचे धगधगते कुंड अशी एके काळी नाशिकची ओळख होती. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने या क्रांतीचा ज्वाळांना शब्दांचा अंगार चढवून कवितेला स्वातंत्र्यलढय़ाच्या समरांगणात उतरवले. त्यांची क्रांतीचा जयजयकार’ ही कविता तर स्वातंत्र्य- लढय़ातील सैनिकांचे स्तोत्र बनली होती. अशा या मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार्‍या वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 'जागतिक मराठी भाषा दिवस' साजरा होतो आहे ही एक भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे.

तेव्हा आजच्या या पुण्यदिनी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे "अमृताशीही पैजा जिंकणार्‍या" आपल्या माय मराठीचे कौतुक करुयात आणि तिला दिवसेंदिवस वाढीस लावण्याची मनोमन प्रतिज्ञा घेऊयात.

कुसुमाग्रजांनादेखील मराठी भाषेतील त्यांच्या अनमोल योगदानाबद्दल आदरपूर्वक श्रद्धांजली

संदर्भ : विकी, महान्यूज, काही जालीय वृत्तपत्रे आणि कुसुमाग्रज.कॉम
चित्रे : जालावरुन साभार

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

27 Feb 2012 - 1:12 pm | सर्वसाक्षी

आजच्या दिवसाचे औचित्य साधुन लिहिण्यासाठी धन्यवाद.
क्रांतिकवी कै. कुसुमाग्रजांना त्यांच्या जन्मदिनी प्रणाम.

सागर's picture

27 Feb 2012 - 3:09 pm | सागर

कुसुमाग्रजांचे संकेतस्थळ कुसुमाग्रज.ओआरजी असे वाचावे.

समयोचित लेख मित्रा.
नासिकला मागे गेलो असता कुसुमाग्रज स्मारकाला भेट देण्याचा योग आला. अत्यंत निगुतीने स्मारक निर्माण करण्यात आले आहे.

अरे वा छानच मित्रा.

माझ्या पुढच्या नाशिक भेटीत तू माझ्याबरोबर नक्की असशील याची खात्री आहे.
त्यावेळी पांडवलेण्या, ब्रह्मगिरी बरोबरच कुसुमाग्रजांच्या स्मारकातही त्यांना मानवंदना द्यायला जाऊयात :)

ठरवून करुयात सगळे वल्ली मित्रा... काय म्हणतोस ? ;)

अगदी नक्कीच.
लवकरच तसा प्लॅन आखूयात.

मोदक's picture

28 Feb 2012 - 12:05 am | मोदक

+१

धन्या's picture

29 Feb 2012 - 7:09 am | धन्या

अर्थात यायला जमलं तर. ;)

धन्यवाद
आणि
'जागतिक मराठी भाषा दिवसाच्या' हार्दिक शुभेच्छा

स्वातीविशु's picture

27 Feb 2012 - 2:21 pm | स्वातीविशु

कै. कुसुमाग्रजांना त्रिवार अभिवादन व जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा.

सुहास..'s picture

27 Feb 2012 - 2:22 pm | सुहास..

छान , या निमीत्ताने कुसुमग्राजांच्या कवितांचे कलेक्शन करायचे का आंजावर (अर्थात त्या करत सेपरेट साईट आहे, पण तरी इथ ही करू यात !! )

ही सुरुवात माझ्या कडुन ,

१ )

जोतिबा म्हणाले,
शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा
शिवाजीराजे म्हणाले,
मी फक्त मराठ्यांचा
आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौध्दांचा
टिळक उद्गारले,
मी तर फक्त
चित्पावन ब्राम्हणांचा
गांधीजीनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान
एकेक जमात तरी
तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेर्‍यातल्या भिंती

२ )
हृयदयातील रणे जाहली
क्षणामधे शान्त
आणि विस्मृतीच्या नाहली
चांदण्यात रात
अशीच संगीते आळवी तुझी कलावन्ता
घडी भर जागव रे आमुची अशीच मानवता

सागर's picture

27 Feb 2012 - 2:43 pm | सागर

छान सुरुवात केलीस रे सुहास

माझी एक (माझ्या नावाचे औचित्य साधून ) भरः

दूर मनोर्‍यात

वादळला हा जीवनसागर – अवसेची रात
पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परंतु अंधारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात
अन् लावा हृदयात सख्यांनो आशेची वात

- विशाखा, कुसुमाग्रज

माझ्या मराठी मातीचा,लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या,दर्‍या खोर्‍यातील शिळा

माझ्या मराठी मातीला ,नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर,मला हिचे महिमान

रत्नजडित अभंग ,ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे,सरस्वतीची पालखी

रसरंगात भिजला ,येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली,झाले वसुधेचे घर

माझ्या मराठी मातीचा,नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे,भविष्याचे वरदान

नाही पसरला कर,कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे,कधी लवली ना मान!
-----कुसुमाग्रज-----

निवेदिता-ताई's picture

27 Feb 2012 - 7:21 pm | निवेदिता-ताई

पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु ।

भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2012 - 8:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. मराठी भाषेचा अभिमान बाळगेन आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अधिकाधिक प्रयत्न करीन.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मराठी भाषा व वाड्.मय विभाग, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठवाडी बोली संशोधन प्रकल्प (२०११-२०१२) सुरु आहे.

सण,उत्सव, कृषी, रुढी,परंपरा,व्यसन,पोशाख,आहार, अलंकार, वेशभूषा / पशु-पक्षी, प्राणी, व्यवहार, व्यापार, विधी या विषयक मराठवाडी बोलीतील शब्द हवे आहेत.

आम्ही काही प्राध्यापक मित्रांनी मराठी विभागाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृतीच्या या उपक्रमास हातभार लावण्याचे ठरविले आहे. आपल्याकडे काही मराठवाडी बोलीतील शब्द-संपदा असेल तर खरड करावी, ही नम्र विनंती.

जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी | कि परिमळांमाजि कस्तुरी ||
तैसी भासांमाजि साजरी | मराठीया || (फा.स्टी.)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

28 Feb 2012 - 12:28 am | पैसा

मला आवडणारी कुसुमाग्रजांची कविता

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||