गोव्यात मी जातो ते स्थलदर्शनासाठी अशी माझ्या हिची समजूत आहे. पण मला सांगा, आपण आपल्याच गावात म्युझियम किंवा चर्च बघायला जातो का? किती पुणेकर शनिवारवाडा निरखून पाहतात?
अर्थात मी काही तशा अर्थाने गोव्याचा नाही. सहज फिरायला म्हणून गोव्यात जाता जाता जात गेलो आणि तिथलाच झालो, असं काहीसं झालं.
गोव्याला गेल्यावर दोन खाण्यापिण्याच्या ठिकाणांमधे प्रवास करताकरता निसर्गसौंदर्य दिसतंच की.. त्यासाठी अर्ध्या अर्ध्या दिवसांच्या साईटसीईंग टूर्स घेणं मला मानवत नाही.
असो.. एवढ्याने माझे मूळ उद्देश जाहीर झाले असतील असं समजून मी आता बराच काळ "मस्ट व्हिजिट लिस्ट" मधे असलेल्या "मार्टिन्स कॉर्नर"च्या ताज्या भेटीचा वृत्तांत जमेल तितका थोडक्यात देतो.
मला वाटतं वीसेक वर्षांपूर्वी मिस्टर मार्टिन आणि मिसेस कारफिना परेरा या गोयंकार जोडप्याने घरच्याघरीच सुरु केलेल्या कोल्ड्रिंकच्या दुकानाने या "कॉर्नर"ची सुरुवात झाली. कॅरम पत्ते वगैरे खेळत संध्याकाळी कट्टे भरवणार्या आपल्यासारख्याच लोकांचं ते आवडतं ठिकाण झालं होतं. रोजचा कल्ला करण्याचा हँगआउट.
गोवन सॉसेज हा बराच मसालेदार प्रकार असतो. तो पावासोबत खाण्याची मजा औरच. कोल्डड्रिंक्सच्या जोडीला परेरांनी हळूहळू सॉसेजपाव आणि अशाच सिलेक्टेड डिशेस सर्व्ह करायला सुरुवात केली. त्यांच्या हातच्या अफलातून चवीला मागणी इतकी वाढायला लागली की दोनाची चार टेबलं करत हळूहळू व्याप प्रचंड वाढत गेला. आता नव्या पिढीचे तीन परेरा बंधू हे हॉटेल चालवतात.. पण अजूनही कारफिनाबाई पूर्णवेळ जातीने अन उत्साहाने हॉटेलच्या "चवी"च्या डिपार्टमेंटमधे लक्ष घालतात.
आता तर हे ठिकाण इतकं प्रसिद्ध झालंय की सचिन तेंडुलकर, अमिताभ वगैरे सेलेब्रिटीज तिथे आवडीने येतात. जाहिरात करायला किंवा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नव्हे.. खरंच चवीने खायला.
इतक्या माहितीनंतर, विशेषतः तेंडुलकर आणि अमिताभ वगैरे ऐकून मला वाटायला लागलं की हे अजून एक ओव्हर हाईप्ड ठिकाण दिसतंय.. म्हणून आवर्जून जाण्याची इच्छा झाली नाही.
यावेळी मात्र काही जेन्युईन शिफारसींमुळे मार्टिन्सला जायचंच असं ठरवलं आणि ते घडवूनही आणलं. मार्टिन्सविषयी लिहिणार्या बोलणार्या सर्वच लोकांनी एकमुखाने आणि ठळकपणे उल्लेख केला होता की इथे भयंकर गर्दी असते आणि आधी नंबर लावून ठेवलात तरच टेबल मिळेल. हे ऐकून मी दुपारी दोन वाजतासाठी लंचचं बुकिंग करायला आणि तेव्हा टेबल नच मिळाल्यास रात्रीचा नंबर तरी लागावा म्हणून दुपारी बाराच्या सुमारासच बेताळभाटीला पोचलो. बेताळभाटी बीचपासून किलोमीटरभर अंतरावर असलेल्या मार्टिन्स कॉर्नरमधे पुरेश्या दिशादर्शक बोर्डांमुळे न चुकता पोचलो. पार्किंगसाठी भरपूर जागा पाहून सुखावलो.
समोर पाहतो तर एक सुरेख कौलारु टिपिकल गोवन घर समोर आलं.

"नंबर लावायला" म्हणून आत पाऊल टाकलं आणि बघतो तर या सुंदर घराच्या ओसरीवर सगळं हॉटेल होतं.. आणि तेही संपूर्ण रिकामं.. फक्त एका कोपर्यात चारपाच गोरे लोक बियरचे घुटके घेत बसले होते.
एंट्रीलाच डावीकडे एका काचेरी पेटीत भावी भक्ष्य ठेवलेलं दिसलं.

सर्वच समुद्रीजीव इतके ताजे दिसत होते की जवाब नही..
घरगुती कशाला म्हणायचं या जागेला..? घरच ते मुळातलं..

एका भल्याथोरल्या घरातच उंचसखल, वेगवेगळ्या जागी टेबल्स ठेवलेली होती आणि जाण्यायेण्याच्या वाटेवर आजुबाजूला वाईन्स आणि गोडधोडाचीही रेलचेल दिसत होती..

ते बघून जिवाला बरं वाटलं.. आणि त्या कौलारु छपराखाली एक कोपर्यातलं टेबल पकडून बसल्यावर तर एकदम शांत सुशेगातच वाटलं. आजुबाजूला मान वळवली आणि बघितलं तर एकीकडे डोळ्याला थंड गारवा देणारा अन घरगुती सेटअपमधे बसलेला लाकडी बार होता..

अगदी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंपासून सर्व भिंती मारिओ मिरांडासाहेबांच्या डीटेलवार काढलेल्या खास चिरपरिचित कार्टून्सनी भरलेल्या होत्या. मुंबईतल्या आवडत्या कॅफेमधे त्यांच्या चित्रांसोबत ऊठबस असते.. इथल्या त्या भिंतींमुळेच त्यांच्या आपल्यातून जाण्याची जाणीव एकदम अंगावर आली.
मेनूकार्ड समोर आलं आणि पुन्हा एकदा मिरिंडांच्या कार्टूनने समोर येऊन हसवलं.

मेनू भरगच्च दिसत होता. मद्य आणि कॉकटेल्सनीही बरीच पानं भरली होती. त्यात लॉं आयलंड, मार्गरिटा, मोहितो, सेक्स ऑन सनसेट बीच अशा नेहमीच्या नावांसोबत कोको लोको आणि मार्टिन्स स्पेशल कॉकटेल अशी दोन नावं दिसली.
पैकी कोको लोकोमधे नारळाची फेणी, जिन, व्हाईट रम, अननसाचा रस आणि नारळाचं दूध असं मिश्रण होतं.. आणि मार्टिन्स स्पेशल कॉकटेलमधे नारळाची फेणी आणि पीच, संत्रं, अननस वगैरे फळांचे ज्यूसेस होते.
ही दोन्ही फेणी कॉकटेल्स मागवली. त्यासोबत चाखायला काहीतरी हवं म्हणून गोव्यातला खास चणक मासा मागवला. हे पहा कॉम्बो:


ही चणक म्हणजे आंबटगोड आणि तिखट असा अफलातून प्रकार होता. नाक पुसत पुसत खावा लागला पण चटक लावूनच संपला.. गोव्यातला खास मसाला ओघळेपर्यंत लावून खरपूस परतलेला हा लईभारी प्रकार होता.
कोको लोकोमधे नारळाचं दूध एकदम दाट होतं. एखाद्याला हे खूप आवडू शकेल, पण मला खूप नाही आवडलं. दुधात दारु घातल्याचा फील येत होता. मार्टिन्स स्पेशल कॉकटेल मात्र मस्तच..
मेनूत ओळखीचे बरेच पदार्थ होते. पण काही लक्षवेधी म्हणा किंवा स्पेशल वाटलेले म्हणा, त्यांची नावं इथे देतोय :
-मार्टिन्स एक्झॉटिक सी-फूड प्लॅटर (यात किंग क्रॅब मसाला फ्राय (सचिनचा फेवरिट), लॉबस्टर थर्मिडर, बटर गार्लिक टायगर प्रॉन्स, तंदूरी स्नॅपर हे सर्व एकत्र होतं)
-क्रॅब मसाला फ्राईड
-लॉबस्टर रेचिआडो.. (उच्चारी चूभूदेघे)
-प्रॉन्स बाल्चाव, किंगफिश बाल्चाव
-मटण सागुती
-प्रॉनकरी राईस
-फिश टिक्का
-फिश फिंगर्स
-फ्राईड शिंपल्या
-बॅटर फ्राईड किंवा मसाला फ्राईड म्हाकुळ
-गोवन पोर्क सॉसेजेस
-पोर्क चिली फ्राय
व्हेज ऑप्शन्स पहावेत म्हणून पत्नीसाठी मागवण्याच्या निमित्ताने हरेभरे कबाब मागवले. मस्तशा ताज्या चटणीसोबत गोव्याचा टच म्हणून काजूंनी सढळपणे जडवलेले खमंग आणि खुसखुशीत असे चविष्ट कबाब. आपण तर फिदाच झालो.

मग वेळ आली मेन कोर्सची. आधी एक नुसती विनाकॉकटेलवाली साधी नारळाची फेणी मागवली आणि सोबत नेहमीच्या पद्धतीने सिग्नेचर डिश म्हणून फिशकरी अन राईस मागवला. जेव्हा तो प्रकार समोर आला तेव्हा मी बेहद्द खूष झालो. भारीभारी हॉटेलांमधेही फिशकरी राईस म्हणजे फक्त एका वाडग्यात करी आणि एकात भात इतकंच देतात. पण मार्टिन्समधे मात्र त्यांनी तेवढंच न देता दिलखेचक ओरिजिनल खास गोवेकरी रंगाच्या फिशकरी सोबत एक अतिखमंग परतलेला मासा वेगळा दिला होता.


शिवाय किसमूर ही जबरदस्त टेसदार झिंग्यांची चटणी आणि एक वेगळंच आंबटगोड घरगुती गोवन लोणचं. या किसमूरची पाककृती तेवढी द्या हो कोणीतरी.
किसमूर..


हे अफलातून लोणचं कसलं आहे आणि कसं बनवलं हे वेटरला सांगता आलं नाही. ते इथे घरीच बनवतात इतकंच तो सांगू शकला. पण पारंपरिक लोणचं असावं गोव्यातलं.

फिशकरी जीवघेणी चविष्ट होती. आहाहा.. तो खरपूस मासा, फिशकरी आणि भात यांनी एकत्र मिळून पूर्णब्रह्माचा अनुभव दिला.
त्यानंतर काही नसतं तरी चाललं असतं. पण हॉटेलचा पूर्ण अनुभव घ्यायचा म्हणजे डेझर्ट हवं. बेबिंका हे गोव्यातलं प्रसिद्ध डेझर्ट मागवलं. खोबरं वापरुन आणि थरावर थर दिलेला हा पदार्थ सांदण किंवा हलवा किंवा तत्सम काहीश्या चवीचा वाटला. बराच आवडलाही. त्यासोबत आईसक्रीमही होतं.

शिवाय अनेक केक्स, पेस्ट्रीज आणि पुडिंग्जनी भरलेलं कपाट साद घालत होतं. कॅरामेल कस्टर्ड भारी दिसत होतं पण पोटात आणखी काही भरणं शक्य नव्हतं. पुढच्या भेटीसाठी ते शिल्लक ठेवलं..

बिलही फार झालं नाही. अशा दर्जाच्या हॉटेलच्या मानाने तसं खूपच कमी वाटलं.
बाहेर पडलो ते जड उदर आणि तृप्त मन घेऊन...
शंभर टक्के शिफारसपात्र ठिकाण आहे हे..
जियो मार्टिन्स कॉर्नर.. जियो परेरा ब्रदर्स.. फिर मिलेंगे..
.........................
प्रतिक्रिया
30 Jan 2012 - 1:59 pm | गणपा
सध्या दुसऱ्या फोटोभोवतीच घुटमळतो आहे.
30 Jan 2012 - 2:18 pm | सुहास झेले
जबरदस्त.... एकदम खादाड शौकिनांच ठिकाण दिसतंय. :) :)
मागे महेंद्रकाकांनी सुद्धा या हॉटेलबद्दल लिहिलं होतं इथे....बघू कधी मुहूर्त येतोय जायचा :)
30 Jan 2012 - 2:09 pm | प्रास
मस्त लिखाण आणि सुंदर परिचय!
सामिष भोजन करत नसलो तरी उत्तम पदार्थं देणार्या जागा माहिती असणं केव्हाही चांगलंच.
सगळे फोटो झकास पण शेवटचे दोन जास्त झकास...!
बाकी शेवटच्या दोन फोटोंमध्ये असणार्या डिशेस् खाण्याची प्रचंड लालसा निर्माण झालेली आहे.
31 Jan 2012 - 5:43 pm | वपाडाव
मार्टिन्स स्पेशल कॉकटेल अन (व्हेज) हराभरा कबाब खायला का होइना आपल्याला एकदा जावे लागणार आहे असं दिसतंय...
30 Jan 2012 - 2:18 pm | विशाखा राऊत
सगळे वर्णन आणि फोटो असे जीवघेणे आहेत की बस...
30 Jan 2012 - 2:26 pm | स्पा
कसले फोटू?
कसल हॉटेल?
कोण गवि?
में
काहाहू?
30 Jan 2012 - 2:35 pm | मोहनराव
काय हो गवि, भारी मजा केलेली दिसतीये. पण गोव्यात हे हॉटेल नेमकं कुठे आहे ते जरा सांगाल का?
फोटो व वर्णन जबराट!! एखाद्या हॉटेलचे वर्णन करावं ते तुम्हीच!
30 Jan 2012 - 2:37 pm | गवि
दक्षिण गोव्यात बेताळभाटी गावात. प्रसिद्ध आहे, कोणीही सांगेल. आणि दिशादर्शक पाट्या खूप पसरल्या आहेत, त्यातली एक दिसतेच आणि रस्ता सहज सापडतो.
ही पहा वेबसाईट..
30 Jan 2012 - 8:31 pm | मोहनराव
धन्यवाद!
30 Jan 2012 - 2:40 pm | प्रचेतस
मस्त फोटू, झक्कास वर्णन.
हराभरा कबाब आणि डेझर्ट च्या फोटूंनी तृप्त झालो आहे.
30 Jan 2012 - 2:44 pm | योगप्रभू
गवि,
किसमूर म्हणजे सुकी कोशिंबीर.
किसमूर हा सुक्या प्रॉन्सचा, सुक्या माशाचा (गोव्यात बांगड्याचा फेमस) असतो.
व्हेजी लोक भाजक्या पापडाचा पण किसमूर बनवू शकतात.
चिंच, हळद, लाल तिखट, मीठ, खोबर्याचा चव, बारीक कापलेला कांदा, चमचाभर तेल (पळी फोडणीचे आणखी छान) एकत्र करायचे. भाजलेला पापड चुरुन बारीक करायचा आणि त्यात हे मिश्रण मिसळायचे. झाली सुकी कोशिंबीर.
बांगड्याच्या किसमूरच्या वर्णनात पूर्वी सुका बांगडा खोबरेलची किंचित धार सोडून चुलीतल्या निखार्यात भाजून मग चुरत, असे वाचले आहे. किसमूर करताना केवळ मासाचा चुराच घेतात. बोन्स काढून टाकतात.
बाकी गोव्याच्या गृहिणी अधिक तपशील सांगतीलच.
30 Jan 2012 - 2:58 pm | शिल्पा ब
वाह!! कधी गोव्याला जायला मिळाले तर तुमचा सल्ला घेतला जाईल.
30 Jan 2012 - 3:27 pm | मी-सौरभ
मी हा धागा पाहिला नाही.
मी हापिसात काम करतोय.
30 Jan 2012 - 3:49 pm | नंदन
खरपूस भाजलेला मासा, फिशकरी आणि किसमूर पाहून अंमळ नव्हे तर तुडुंब हळवा झालो आहे :)
किसमूरची रेसिपी - http://misalpav.com/node/18059
30 Jan 2012 - 8:04 pm | पैसा
मिळताना कठीण आहे. त्याबदली जवळा थोडा परतून घेतला तरी चालेल. शाकाहारी मंडळींसाठी कोहाळ्याचे सांडगे तळून चुरडून घेतले तरी जवळपास अशीच चव येते.
30 Jan 2012 - 3:53 pm | गणेशा
जबरदस्त
30 Jan 2012 - 8:08 pm | पैसा
ए वन फोटो आणि वर्णन!
'रेचिआडो' हे पोर्तुगीज स्पेलिंग आहे. त्याचा उच्चार 'रशेद' असा काहीसा आहे.
चणकं हा मासा रत्नागिरीत आणि मुंबईतही मिळतो अशी माझ्या मासेच खाणार्या नवर्याने दिलेली माहिती आहे.
ते लोणचं 'बिंबलं' नावाच्या आंबट फळाचं दिसतंय. जाम टेस्टी असतं, पण फक्त ८ दिवस टिकतं.
30 Jan 2012 - 8:38 pm | स्मिता.
काही लोक पाकृ बनवून इथे फोटो टाकून जीव जाळतात तर गवि हॉटेलातल्या पदार्थांचे फोटो टाकून जीव जाळतात. त्यात सोबतीला वर्णनं पण कसली... श्या! फोटो दिसले नसते तर बरं झालं असतं.
30 Jan 2012 - 9:22 pm | अन्नू
असले पक्वानांचे जिवघेणे फोट्टु दाखवून मि.पा. करांन्नी बहुदा आमचा आता खुन करुन आंम्हाला ठार मारायचाच निश्चय केलेला दिसतोय.
"अत्रुत्म आत्मा... येतोय हो तुमच्या जोडीला आंम्ही!"
31 Jan 2012 - 10:57 pm | अत्रुप्त आत्मा
@"अत्रुत्म आत्मा... येतोय हो तुमच्या जोडीला आंम्ही!"
या..या..पण जायचं कुठे यातून शेवटी..?
@"अत्रुत्म(?) आत्मा..
खलास जाहला आहे
30 Jan 2012 - 10:29 pm | रेवती
वर्णन आणि फोटो छानच.
30 Jan 2012 - 10:33 pm | जाई.
जबरदस्त वर्णन
31 Jan 2012 - 12:45 am | चतुरंग
झालं, केलंत पुन्हा आम्हाला 'कॉर्नर'?
तरी बरं जेवण झाल्यावर उघडला तुमचा धागा...
पुढली ट्रिप गोव्यातच काढायला हवी असे वाटवणारे दिलखेचक फोटू आणि रंजक वर्णन! :)
(पेनल्टीकॉर्नर) रंगा
31 Jan 2012 - 5:31 am | piu
ओरिजिनल खास गोवेकरी रंगाची फिशकरी !
फारच छान !
31 Jan 2012 - 10:39 am | इरसाल
लै लै पाणी सुटले तोन्डाला.जबरदस्त.
फोटोवरुन लोणचे तोन्ड्लीचे तर नाहीना अशी शन्का येतेय.
31 Jan 2012 - 10:58 am | गवि
मलाही चवीवरुन तोंडली हा एक घटक असावा असंच वाटलं. पैसाताईंनी म्हटलेले ते फळ म्हणजे आंबटगोड करमरेवालं हिरवं फळ असेल... (मुंबईत बोरिवली नॅशनल पार्कात किंवा गोव्यात मंगेशीच्या बाहेर माम्या तिखटमीठ लावून विकतात ते फळ)
ते यात बहुतेक नसावं.. कारण त्याने लोणचं खूपच आंबट झालं असतं.
पण आता ते काय आणि कसं बनवतात ते नेमकं समजल्याशिवाय पुन्हा बनवता येणार नाहीच..
तरी पुढच्या वर्षीची गोवा व्हिजिट आहेच ... :)
किसमूरची कृती मिसळपाववरच मिळाल्याने आनंद झाला आहे..
2 Feb 2012 - 3:01 pm | प्रीत-मोहर
करमलं, आणि बिंबलं अशी दोन वेगवेगळी फळ असतात. करमलं आकाराने मोठी असतात तर बिंबल खूप छोटी . मंगेशीला तुम्ही करमलं खाल्ली असावी असा माझा अंदाज
2 Feb 2012 - 3:07 pm | मेघवेडा
बिंबलं आंबटढाण नि करमलं गोडसरशी असतात, नाही गं?
2 Feb 2012 - 3:19 pm | पैसा
करमलं
आणि बिंबलं
2 Feb 2012 - 3:21 pm | प्रीत-मोहर
अगदी !!
+१ मेव्या. पण बिंबलं सुद्धा मीठ न मसाला लावुन खायला सह्हीच लागतात!!
2 Feb 2012 - 3:23 pm | गवि
जबरदस्त डीटेलवार माहिती..
हो ते पहिलं फळ बोरिवली पार्कात किंवा मंगेशीजवळ खाल्लेलं आहे तिखटमीठ लावून. ते खूप आंबट होतं.
हे दुसरं फळ हाच त्या लोणच्याचा घटक असणार.. फोटो बघून हेच वाटतंय..
अनेक आभार...
आता मुंबैत बिंबले शोधणे आले....
2 Feb 2012 - 6:32 pm | रेवती
अर्रे! मला त्या फळाचं नाव करमलं आहे हेच माहीत नव्हतं.
आमच्या इथल्या ग्रोसरीत स्टार फ्रूट की अश्याच नावाने मिळते.
4 Feb 2012 - 11:04 pm | प्रास
कदाचित देशी भाषांमध्ये या फळाला करमलं म्हणत असतील (कदाचित नसतील, आठवत नाही) पण संस्कृतमध्ये या फळाला 'कर्मरंग' असं नाव आहे. मराठीत याला 'कमरक' म्हणतात. कमरक चवीला खूप आंबट असलं तरी अजीर्ण आणि अम्लपित्तावरचं प्रभावी औषध समजलं जातं. अर्थात रेवतीताई म्हणतायत त्याप्रमाणे या फळाच्या चकत्या ताराकारच असतात.
गविंनी खाल्लेल्या लोणच्यात हे नसावं.
31 Jan 2012 - 9:46 pm | स्वाती दिनेश
सगळ्या पदार्थांचे फोटो आणि त्याबरोबरचा एक्सपर्ट कमेंट्स सकटचा वृत्तांत मस्त..
स्वाती
31 Jan 2012 - 11:28 pm | सूड
गोवा वारी अगदी झोकात झालेली दिसते.
1 Feb 2012 - 12:30 pm | नगरीनिरंजन
कातिल!
2 Feb 2012 - 8:05 pm | मालोजीराव
फक्त मार्टिन्स साठी आता गोव्याला जायलाच पाहिजे !
मध्ये हा लेख वाचला तेव्हाच ठरवलेलं जायचं इथे नक्की
- मालोजीराव
4 Feb 2012 - 10:54 pm | निनाद मुक्काम प...
नुकताच कामावरून आलो नी तुमच्या सचित्र खादाडी वृत्तात वाचला. नी जीव्हेतून लाळेचा ओघ सुरु झाला.
ह्यावेळच्या भारत भेटीत राजस्थान दौरा झाला .पुढील भारत भेटीत गोवा नक्की.
तुमच्या कडून गोव्यावर लेखमाला अपेक्षित आहे.
1 Mar 2012 - 12:20 am | जीएस
अतिशय सुंदर लेख. गोव्याला जाऊनसुद्धा नेहेमी मार्टिन्सला जाणे राहून जाते. पण आता हा लेख वाचून निश्चय पक्का... !
1 Mar 2012 - 10:27 am | चौकटराजा
प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया द्यायची खाज ना आम्हाला म्हणून -
खादाडीची आवड नाही, पूर्ण शाकाहारी आहे. सबब फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले नै .
आता मग प्रतिक्रिया काय देणार ? कप्पाळ ? पण खाज ......सबब
फोटो तांत्रिक दृष्ट्या चांगले आहेत.
मारिओ मिरांडाचे रेखन लाजबाब !
कोर्नर चे डेकोरेशन मस्त !
1 Mar 2012 - 12:48 pm | चिगो
आता खास एवढ्यासाठी गोवा ट्रिप करणं आलं...
झकास लेख, गवि..