एकदा एका संध्याकाळी आमच्या गावच्या चावडीवर,
गाववाले आणि मुंबईकर अशी चर्चा चांगलीच रंगली
विषय तसा वादाचा, आणि सारे मुद्दे असेच कळीचे
आमच्या सार्या गावाची शांतता या चर्चेने भंगली
त्याचे झाले असे की, पूर्वापार वाद शेजारच्याच गावाशी
त्यांनी आमच्या गावच्या गंज्यांना आगी लावून दिल्या
जळलं मेलं ते गावाचं लक्षण, सगळे बाप्ये मेले नामर्द
मुंबैकर वाणीन काकू गावकीत भावनाभरात बोलून गेल्या
वाणीन काकूंच्या या बोलण्याचा गावकर्यांना खुपच राग आला
गाववाल्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार मुंबैकरांस कुणी दिला
बिर्हाड गावी असणार्या चाकरमान्यांचं बोलणंही एकवेळ योग्य
मुंबैचं राशन कार्ड काढून मुंबैकर झालेल्यांनी बोलणं मात्र अयोग्य
झालं, याच विषयावर गावकर्यांनी मिटींग बोलावली
गावकरी आणि मुंबैकर या सार्यांनीच हजेरी लावली
तू अजून गावातच का? ठमाका़कू एकाला म्हणाल्या
यात्र्यांचा आंदया उचकलाच, या पाहा मुंबैकर आल्या
अहो गावाबद्दल आपुलकी आहे म्हणून मुंबैकर बोलतात
आमचे धन्याशेठ अगदी तब्येतीने, तोलून मापून म्हणाले
चालायचंच हो, भावनेच्या भरात बोलतो राव माणूस असं
मुसूशेठ लगेच धन्याशेठच्या बोलण्यास दुजोरा देत म्हणाले
कुणी मग लातूरकर बुवांच्या किर्तनातले दाखले दिले
कुणी पार देवाधर्माच्या गोष्टी करत सप्त्यात* घेउन गेले
मात्र तिकडे कोपर्यात कुणाला कोंबडी वडयाची पडलेली
कुणाची गाडी बेगी* मिरच्यांच्या गोड ठेच्यात अडलेली
धन्याशेठ "आक्षेप" घेता येईल असा शब्दांचा घोळ घालत होते
पण नंतर मात्र तेच वादाचे सारे मुद्दे व्यवस्थित हाताळत होते
अभिव्यक्ती हक्क उचलून धरत कुणी कायदयाशीच पंगा घेतला
हे कमी की काय, गुप्तेकाकांनी या आगीत तेलाचा बुधला ओतला
पण तरीही वाद आता थंडावला होता, लोकं कंटाळली
ईतक्यात जोग आणि प्रभू जोडी काही बोलू लागली
जोग अर्जुनाशी स्वप्नात बोलणं झालं, काहीसं पुटपुटले
मीही द्रोणाचार्यांशी स्वप्नात बोललो म्हणत प्रभू उठले
आज काय दुपारीच का म्हणत बिका शेखनी त्यांना झापलं
हे सारं पाहून एक "हलकट" पोरगं काहीतरी आठवून नाचलं
खुप बोलले, पण काय करावे निष्कर्षाप्रत कुणी आलाच नाही
साधकबाधक चर्चा होऊनही ठोस निर्णय काही झालाच नाही
मग लोक आपापसात थोडंसं कुजबुजू लागले
मुळ मुद्यावरची सारी चर्चा मात्र तिथेच थांबली
चर्चेत पुढे कुणी काही बोलायलाच तयार होईना
आता लोकं खरंच कंटाळली आणि घराकडे पांगली
सप्त्यात* - हरिनाम सप्ताहाचे उदाहरण
बेगी* - पिकल्यानंतर लालभडक होणारी पण फारशी तिखट न होणारी मिरचीची एक जात
प्रतिक्रिया
24 Jul 2011 - 10:22 am | अर्धवट
हॅ हॅ हॅ हॅ
25 Jul 2011 - 8:24 pm | कच्ची कैरी
ही कविता आहे कि लेख ?