विश्वचषक - काही प्रसंग काळजावर कोरून ठेवलेले..

चावटमेला's picture
चावटमेला in क्रिडा जगत
19 Feb 2011 - 4:14 pm

मित्रहो,

आजपासून दहाव्या क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात झाली, आताच बांग्लादेशने टॉस जिंकल्याचे ऐकले आणि आम्ही त्या शकीब्याच्या नावाने बोटे मोडत टंकायला बसलो.च्यायला, इंदिरा आ़क्कांनी बांग्लादेशला काय भारताच्या गळ्यात खोडा अडकवायलाच जन्माला घातले की काय असाच आम्हाला प्रश्न पडतो. असो, धोनी आणि कं ला २००७ चे उट्टे काढण्याच्या शुभेच्छा..

आज आपण काही अविस्मरणिय प्रसंगांबद्दल बोलू, जे केवळ माझ्याच नाही, तर तमाम क्रिकेट दर्दींच्या ह्रदयावर अगदी लेण्यांसारखे कोरलेले आहेत.

१. प्रसाद वि. सोहेल
http://www.youtube.com/watch?v=Byl3zrlF4ZE

आहाहा!!!! वेंकटेश प्रसादने त्या उद्दामुद्दीन आमिर सोहेल ची दांडी वाकविली तो हा क्षण. प्रसाद भाऊ, अहो जयसुर्याने तुमची कितीही धुलाई केली असली तरी, केवळ ह्या चेंडूसाठी तुमची शंभर अपराध सुद्धा आम्ही पोटात घालायला तयार आहोत. सोहेल ने खिजविल्यानंतर, हा चेंडू टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरात असतील नसतील अशा सगळ्या हाडांमधली ताकद एकवटली होती, ती फर्लांगभर मागे उडत गेलेली स्टंप तेच दाखवत आहे. आम्ही जर कुठल्या कुडमुडेवाडीचेही बादशहा असतो ना तरीही, आमचे अर्धे राज्यसुद्धा तुम्हाला बहाल केले असते. ह्या एका चेंडूने पाकिस्तानच्या उन्मत्त हत्तीला अक्षरशः लोळविले आणि भारताने बघता बघता सामना खिशात घातला..

२. गिब्स वर्ल्ड कप सोडतो
http://www.youtube.com/watch?v=yJAp30jzHdE

हर्शेल गिब्स ने स्टीव्ह वॉ चा झेल नाही सोडला, तर वर्ल्ड कपच सोडला, गिब्स बहुतेक एरंडेलाची बाटली रिचवूनच उभा होता, म्हणूनच इतकी हागीनघाई झाली होती. ऑस्ट्रेलियाला त्यावेळी जिंकायला जवळजवळ १५० धावा हव्या होत्या आणि चार खंदे वीर तंबूत परतले होते. नंतर वॉ साहेबांनी त्यांच्या नेहमीच्याच स्टाईल मधे खेळत अप्रतिम शतक झळकावले आणि संघाला सेमी फायनल मधे घेवून गेले, ह्याला म्हणतात Captain's knock (अझर्या, ऐकतोयेस ना रे?)

३.ऑस्ट्रेलिया वि अफ्रिका १९९९ सेमी फायनल
http://www.youtube.com/watch?v=fxVNtuDKsds&feature=related

हार्टब्रेक, हार्टब्रेक म्हणतात तो हाच का असा प्रश्न पडावा हा तो क्षण. शेन वॉर्नने निम्म्या अफ्रिकन संघाला धूळ चारल्यानंतरही क्लुसनर दादाने श्रीकृष्णाने एका करंगळीवर गोवर्धन उचलावा तसा एकहाती सामना खेचून आणला होता. शेवटच्या षटकात ९ धावा हव्या असताना, ह्या झुलु आयकॉन ने दोन खणखणीत चौकार मारून विजयावर जवळजवळ शिक्कामोर्तब का काय म्हणतात तेही केले होते, आणि मग अचानक तिसर्या चेंडूवर अगदी एखाद्या यजमानाने सत्यनारायणाचा प्रसाद वाटावा इतक्या सहजपणे फिल्डरच्या पुढ्यात बॉल सरकवून हा वेड्यासारखा पळत सुटला, आणि तिकडे तो कर्मदरिद्री डोनाल्ड सुद्धा बूटांना फेविकॉल लावल्यासारखा क्रीझ मधेच चिकटून उभा राहिला, अर्थात बॉल फिल्डरकडे गेल्यावर तो तरि काय करणार म्हणा? येवढ्यात त्या जात्याच कावेबाज ऑसींनी डाव साधला आणि सामना टाय करवून केवळ सुपर सिक्स मधील विजयाच्या जोरावर फायनल गाठली.

४.सचिन शोएब्याला धुतो, २००३ वर्ल्ड कप
http://www.youtube.com/watch?v=kPguR7QoWIk

वा!! वा!! आणि वा!! हा क्षण तमाम भारतीयांनी देवघरातील फोटोसारखा ह्रदयातील मंदिरात जपून ठेवला आहे.. जितके बोलावे तितके थोडे, दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट क्षण असेच ह्याचे वर्णन करावे लागेल. पहा तरी, सचिनने किती सहज त्त्या शोएब्याचा मात्र १५० कि मी प्रति तास येणारा बॉल प्रेक्षकांमधे भिरकाविला.हा फक्त एक सिक्स नव्हता, तर तो रावळपिंडीचा खराटा, सगळी पाकिस्तानी टीम, पाकिस्तानी चाहते, सगळ्यांच्या तोंडावर एक सणसणीत चपराकच होती, इतकी सणसणीत की त्यामुळे आलेल्या भोवळीतून पाकिस्तान टीम आजतागायत सावरलीच नाही.अरे सच्या, भावा त्यो २००३ चा वर्ल्ड कप आपलाच हुता रे, ऐन वेळी त्या नतद्र्ष्ट बॉलर्स नी माती खाल्ली आणि होत्याची नव्हते केले :(

त्या २००७ च्या वर्ल्ड कप च्या आमच्या काहीच आठवणी नाहीत, तसेही लक्षात राहण्यासारखे त्यात होतेच काय?

यंदाचा वर्ल्ड कप भारतातच होत आहे, तर करोडोंच्या शुभेच्छा भारतीय संघाच्या पाठीशी आहेतच. मुंबापुरीच्या मैदानात, धोनी आणि संघाने विश्वचषक उंचवावा, हीच सिद्धिविनायका चरणी प्रार्थना :)

क्रिकेट

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

19 Feb 2011 - 5:04 pm | अमोल केळकर

मस्त आठवणी :)

अमोल केळकर

यशोधरा's picture

19 Feb 2011 - 5:24 pm | यशोधरा

मस्त!

रिलायन्स कपमधील पाकिस्तान विरूध्द वेस्ट इंडिज हा सामना केवळ अप्रतिम.हा सामना ओळखला जाईल सलिम युसुफची जिगर, इम्रान खानचा संयम, अब्दुल कादिरची किलर इन्स्टिन्क्ट आणि त्याचबरोबर कोर्टनी वॉल्शच्या खिलाडू वृत्तीसाठीही.हा सामना मी पाहिलेल्या काही सर्वात संस्मरणीय सामन्यांपैकी एक आहे.तेव्हा या सामन्यात काळजावर कोरून ठेवणारा एक प्रसंग नाही तर अनेक आहेत.

वेस्ट इंडिजने सर्वप्रथम ५० षटकात सर्वबाद २१६ धावा करून पाकिस्तानपुढे २१७ धावांचे आव्हान ठेवले.आजच्या काळात ५० षटकात ४०० धावा केल्या तरी विजयाची खात्री देता येणार नाही.पण त्याकाळी २१६ ही विजयाची खात्री देणारी नसली तरी बऱ्यापैकी आव्हानात्मक धावसंख्या होती.त्यातच पाकिस्तानची सुरवात अडखळत झाली.रमीझ राजा आणि जावेद मियांदादने डावाला आकार द्यायचा प्रयत्न केला पण तरीही ३५ वे षटक येताना पाकिस्तानची अवस्था ५ बाद ११० अशी झाली होती.तेव्हा उरलेल्या १५ षटकात दर षटकाला ७ च्या दराने धावा फटकावायचे आव्हान पाकिस्तानपुढे उभे राहिले.

अशा वेळी सलीम युसूफच्या साथीला आला इम्रान खान.सलीम युसूफ फटकेबाजी करत होता त्याला इम्रान खानची संयमी खेळीची जोड मिळाली.स्वत: इम्रानने जास्त काळ स्ट्राईक सलीम युसूफकडे जाईल याची काळजी घेतली आणि सहाव्या विकेटसाठी बहुमूल्य ७३ धावा जोडल्या.तेव्हा हातातून गेलेला सामना पाकिस्तानने परत आपल्या आवाक्यात आणला असे वाटू लागले.पण तितक्यात इम्रान खान आणि नंतर सलीम युसूफ हे दोघेही बाद झाले.नंतर वसीम अक्रमनेही निराशा केली.शेवटी अखेरच्या षटकात १४ धावा हव्यात आणि ९ विकेट आधीच पडलेल्या अशी परिस्थिती आली.

शेवटचे षटक मला वाटते की सर्वात जास्त चित्तथरारक होते.कोर्टनी वॉल्श गोलंदाजी करत होता आणि अब्दुल कादिर फलंदाजी.दुसऱ्या टोकाला होता सलीम जाफर. त्यातही पहिल्या दोन चेंडूंवर अवघ्या दोन धावा पाकिस्तानला मिळाल्या.त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एका ओव्हरथ्रोवर एका धावेच्या जागी फलंदाजांनी दुसरी धावही घेतली.तेव्हा ३ चेंडूत १० धावा असे समीकरण होते.त्यावेळी अब्दुल कादिरने कोर्टनी वॉल्शला एक उत्युंग षटकार ठोकला.पुढच्या चेंडूवर आणखी दोन धावा घेऊन शेवटच्या चेंडूवर आणखी दोन धावा हव्या अशी परिस्थिती आली होती.कोर्टनी वॉल्श शेवटचा चेंडू टाकायला आला तेव्हा त्याला दिसले की नॉन स्ट्रायकर ऐंडवरचा सलीम जाफर क्रिझ सोडून पुढे गेलेला होता.अशा वेळी त्याला धावबाद करून सामना कोर्टनी वॉल्शला सहज खिशात टाकता आला असता.पण तशा "मंकडेड" पध्दतीने धावबाद करणे कोर्टनी वॉल्शला प्रशस्त वाटले नाही.विनू मंकडने ऑस्ट्रेलियन खेळाडूला या पध्दतीने धावबाद करण्याआधी एकदा warning दिली होती तसेच आपणही करावे असे ठरवून कोर्टनी वॉल्शने सलीम जाफरला तो क्रिझच्या बाहेर असल्याचे सांगितले.मग त्यानंतर परत कोर्टनी वॉल्श शेवटचा चेंडू टाकायला आला आणि या चेंडूवर दोन धावा काढून पाकिस्तानने सामना शेवटच्या चेंडूवर एक विकेट राखून जिंकला!

बहुतांश काळ सामना एकतर्फी झाला तरी शेवटच्या काही षटकांत सामना फिरला असे विश्वचषकात नंतरही अनेकदा झाले (१९९६ च्या विल्स विश्वचषकातील मोहालीचा ऑस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका हा उपांत्य सामना, १९९९ च्या विश्वचषकातील परत एकदा ऑस्ट्रेलिया विरूध्द दक्षिण आफ्रिका हा उपांत्य सामना आणि विशेषत: ऍलन डॉनाल्डचे धावबाद होणे).पण या सगळ्याबरोबरच शेवटच्या षटकातही विजयाचे पारडे वरखाली होणे आणि अगदी शेवटच्या चेंडूवर कोर्टनी वॉल्शची खिलाडूवृत्ती हे सगळे घटक एकाच वेळी आलेला हा सामना केवळ अप्रतिम.

या सामन्यातील शेवटचे षटक http://www.youtube.com/watch?v=fOJ1XDstMa8&NR=1 इथे आहे.पण या व्हिडियोमध्ये कोर्टनी वॉल्शची खिलाडूवृत्ती मात्र कापलेली दिसते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Feb 2011 - 6:51 pm | निनाद मुक्काम प...

वॉल्श च्या ह्या दिलदारी बद्दल त्याचे आभार मानून समस्त पाकिस्तानी संघाने वॉल्श ला काश्मिरी गालीचा भेट दिला .असे वाचले होते .
रिलायंस कप मध्ये आशियायी खंडातील क्रिकेट रसिकांना अंतिम सामना खुन्नस ने खेळणाऱ्या भारत पाकिस्तान मध्ये हवा होता .
पण त्यांच्या नशिबी अशेस पाहणे होते .

भडकमकर मास्तर's picture

19 Feb 2011 - 5:51 pm | भडकमकर मास्तर

१९९२ च्याविस्श्वचषकातला भारत विरिद्ध ऑस्ट्रेलिआ .. भन्नाट झालेला सामना...

हा पराभव फार काळ स्मरणात राहिलेला होता...

शेवटच्या चेंडूवरती चार धावा हव्या होत्या...मूडी गोलंदाज ... श्रीनाथने तडकावला चेंडू सीमारेषेवरती स्टीव वॉने क्याच टाकला ... हा राजू पाहत उभा होता... धावला असता तर कदाचित तीन धावा पळून निघाल्या असत्या.टाय वगैरे झा ली असती म्याच... राजू रन आउट झाला आणि भारत एका धावेने हरला...

निखिल देशपांडे's picture

19 Feb 2011 - 6:02 pm | निखिल देशपांडे

१९९२ च्याविस्श्वचषकातला भारत विरिद्ध ऑस्ट्रेलिआ .. भन्नाट झालेला सामना..

राजुला खुप शिव्या घातल्या होत्या त्या दिवशी...
पण अजुनही तो शेवट चांगलाच आठवतो

बाकी लेखात निवडलेले प्रसंग एक से बढकर एक आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Feb 2011 - 7:03 pm | निनाद मुक्काम प...

१९९२ ला जावेद मियादाद व किरण मोरे ह्यांच्यातील शाब्दिक बाचाबाची आणि जावेदच्या मोरेला चिडवण्यासाठी त्यांच्या उड्यांची नक्कल करतांना बेडूक उड्या मारून दाखवणे .
हा एकच सामना पाकिस्तान माझ्या मते त्या स्पर्ध्धेत हरले .
येथे