'बार्डसाँग्ज' - पौर्वात्य तत्त्वज्ञानाचं आख्यान

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
10 Jan 2011 - 12:41 am
गाभा: 

Bardsongs - Poster

'बार्डसाँग्ज' हा सँडर फ्रँकेन या एका डच दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. तो घडतो मात्र गरीब देशांत. यात तीन कथा आहेत. एक राजस्थानमध्ये घडते; एक आफ्रिकेत माली या देशात, तर एक लडाखमध्ये घडते. तिन्ही कथांना लोककथांचा बाज आहे. हिंदू, मुस्लिम आणि बौध्द अशा तीन धर्मांच्या व्यक्तिरेखा यात केंद्रस्थानी दिसतात. तिन्ही कथा पौर्वात्य तत्त्वज्ञान उलगडणार्‍या बोधकथा म्हणता येतील अशा आहेत. पौर्वात्य देशांतल्या मौखिक, गीतकथनपरंपरेच्या शैलीनुसार, त्या त्या भौगोलिक परंपरेनुसार संगीत वापरून गोष्ट पुढे नेली जाते. त्यामुळे चित्रपटाला कीर्तन किंवा आख्यानाचा बाज येतो.

Rajasthan Still

पहिली कथा एका कबाडवाल्याची आहे. तो आणि त्याचा वयात येणारा मुलगा दोघे दिवसभर रस्त्यातला प्लॅस्टिकचा कचरा गोळा करतात. एका उंटाच्या गाडीवर कचर्‍याची पोती लादून मग ती विकायची आणि त्यावर गुजराण करायची असा त्यांचा दिनक्रम आहे. वयात आलेला मुलगा तारुण्यसुलभ रीतीनं उद्दाम आहे, तर बाप अतिशय शांत, संयमी आहे. अगदी पहिल्या प्रसंगातच हे दिसतं. चिंचोळ्या बोळातून उंटाची गाडी जात असताना वाटेत एक गाय येते. बाप शांतपणे गाय पुढे जायची वाट पाहत बसून आहे. मागे रहदारी खोळंबते. लोक मुलाला 'तू उतर आणि गायीला बाजूला सार' असं सांगतात. मुलगा उध्दट उत्तर देतो. वाहनांच्या कलकलाटात गोष्टी हमरीतुमरीपर्यंत येत असतात. तेवढ्यात बापाला कोथिंबिरीची जुडी घेऊन जाणारा एक माणूस दिसतो. बाप शांतपणे त्याच्याकडून कोथिंबीर घेतो आणि रस्त्याच्या कडेला फेकून देतो. गाय वाटेतून बाजूला सरते आणि रहदारी पुढे जाऊ लागते.

पुढे बाप-मुलावर अनेक सुखदु:खाचे प्रसंग येतात. सुखाच्या प्रसंगी कुणी येऊन बापाचं अभिनंदन केलं किंवा दु:खाच्या प्रसंगी सांत्वन केलं तर तो म्हणतो, "ही गोष्ट माझ्यासाठी नक्की सुखाची आहे की दु:खाची ते अजून सांगता येत नाही." यामुळे लोक चिडतात खरे, पण अनेक प्रसंगांनंतर बापाचं म्हणणं सर्वांना पटतं की आयुष्यात अनेकदा वरवर सुदैवी/दुर्दैवी भासणार्‍या गोष्टी अंतिमतः तशाच असतील असं नाही. बापाचं शांत, समंजसपणे आयुष्याला सामोरं जाणं या जाणिवेतून होत असतं.

Mali - Still

दुसर्‍या भागात मालीमध्ये एका मदरशात शिकणारा लहान मुलगा केंद्रस्थानी आहे. शैक्षणिक वर्षाअखेरीला मदरशाचे शिक्षक मुलांना सात दिवसांत एका प्रश्नाचं उत्तर हुडकून काढायला सांगतात - 'जगातल्या सर्व ज्ञानापैकी सर्वात मोठं ज्ञान कोणतं?' जी मुलं योग्य उत्तर हुडकू शकतील ती पुढच्या वर्गात जाणार; इतरजण आधीच्याच वर्गात अजून एक वर्ष काढणार.

छोटा बूबा उत्तर हुडकून काढण्यासाठी अनेक माणसांना भेटतो. कुणी काय सांगतं तर कुणी काय. अखेर बूबाला उत्तर सापडतं का ते सांगत नाही, पण त्याचा शोध गोड आणि रंजक आहे एवढं नक्की खरं.

Ladakh - Still

तिसर्‍या भागात लडाखच्या डोंगराळ प्रदेशात एका खेड्यात राहणारा सोनम, त्याची मुलगी पद्मा आणि त्यांच्या गायीला झालेलं वासरू यांची कथा आहे. कबिल्याचा प्रमुख सोनमला आदेश देतो की वर्षाचा व्हायच्या आत बैल वीक आणि त्यातून एक मोबाईल फोन विकत घे. पद्माचा याला विरोध असतो. मोबाईल फोनचा आपल्याला उपयोग नाही, पण बछडा आपल्यासाठी लाखमोलाचा आहे असं तिचं म्हणणं असतं. पण वरिष्ठांची आज्ञा मोडणं सोनमला शक्य नसतं. मग सुरू होतो तो डोंगरांमधून शहराकडे जाणारा एक लांबलचक प्रवास. गाढव विकायला मुलासोबत निघालेला बाप रस्त्यात भेटेल त्याचा सल्ला ऐकत जातो ही आपल्या परिचयाची कथा आहे. तीच इथं एक वेगळा बाज घेऊन येते. सर्वांचं ऐकणार्‍या सोनमला अखेर अक्कल येते का? त्याला नक्की काय कळतं? हे पडद्यावर पाहण्यासारखं आहे.

या सर्व कथांमध्ये प्रगत 'कार्टेशिअन' उत्तरेपेक्षा वेगळं असं दक्षिणेकडच्या गरीब देशांतलं तत्त्वज्ञान दिसतं. शांत माणसं, त्यांचे मॉडेलसारखे गुळगुळीत, चकचकीत नसणारे, सोशिक पण छान चेहरे, त्यांचा वावर यांतून चित्रपटाची लय घडते आणि ती त्यातल्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे. प्रत्येक गोष्टीमागचा विचार दिसता दिसता करमणूकही होते. कारण चित्रपटाला एक सौम्य विनोदाची झालर आहे.

कबाडवाल्याच्या मुलाचा पाय मोडतो. त्याला सांत्वनात्मक भेट देणारा एक पंडित त्याच्यासाठी भेटवस्तू घेऊन येतो. त्यात एक कोका-कोलाची बाटलीही असते. कबाडवाल्याच्या दृष्टीनं ते सांत्वन किती अस्थायी असतं ते त्या गरिबाच्या झोपडीत दिसणार्‍या कोका-कोलानं अधोरेखित होतं. लहान बूबा शिक्षकांच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात मग्न असतो तेव्हा त्याच्यात रस दाखवणार्‍या एका मुलीकडे दुर्लक्ष करतो. एका क्षणी हताश होऊन तो शेवटी एक अख्खा दिवस त्या मुलीबरोबर घालवतो. मग तो आपल्या शिक्षकाला जेव्हा आपण प्रेमात पडल्याची कबुली देतो तेव्हा शिक्षक हर्षभरानं 'अल्लाहु अकबर' असं चीत्कारतो. तुला गवसलेलं 'प्रेम' हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, पण आज तुला एक खूप सुंदर गोष्ट गवसली आहे हे सांगताना शिक्षकही आनंदी असतो. शिक्षकाची ती आनंदभरली आरोळी मुस्लिमच काय पण जगातल्या कोणत्याही धर्मांधावर फेकून मारल्यासारखी वाटते. सोनमच्या गोष्टीत मोबाईल फोन अनपेक्षितपणे कुणी ना कुणीतरी वापरताना दिसतं. त्या अजस्र हिमालयाच्या कुशीत राहणार्‍या खडबडीत माणसांत मोबाईलधारकांचं मोबाईलवर्तन हे आपल्या सवयीच्या शहरी सुशिक्षित माणसांसारखंच बावळट आणि गावंढळ असतं. तेव्हा सर्व थिएटरात हास्याचा स्फोट होतो. पण त्या बावळट वर्तनामुळेच पद्माच्या हे पक्कं लक्षात येतं की ही आपल्यासारख्या हुशार बाईच्या कामाची चीज नाही.

अशा अनेक छोट्याछोट्या गोष्टींच्या प्रभावी वापरामुळे प्रत्येक गोष्ट संपली तरी आपल्या मनात घर करून बसते. रंजकतेची कास न सोडता आपला विचार छान पध्दतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा हा साधा, गोड चित्रपट आवर्जून पाहावा अशी शिफारस करेन.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

10 Jan 2011 - 1:11 am | शिल्पा ब

चित्रपट ओळख आवडली. बघते मिळतोय का.

धनंजय's picture

10 Jan 2011 - 2:02 am | धनंजय

छान वर्णन.

(हेवा वाटला.)

सहज's picture

10 Jan 2011 - 6:31 am | सहज

सुंदर ओळख.

चिंजं धन्यवाद!

चिंता, अ‍ॅलेक्स ग्रे हा माझा आवडता चित्रकार. मी त्याचे सॅक्रीड मिररस हे पुस्तक वाचलेले आहे. यामध्ये एका उतारा- पेरेनिअल तत्वज्ञान असे सांगते की स्त्री आणी पुरुष यांना कमीत कमी ३ प्रकारची ज्ञानप्राप्तीच्या वाटा उपलब्ध असतात- (१) अस्थि मज्जामय चक्षू (Eye of Flesh)ज्यायोगे मूर्त, भासमान, पंचेंद्रियजन्य जगताचे ज्ञान होते. (२) ज्ञानचक्षू (Eye of Mind)- ज्यायोगे अमूर्त अशा प्रतीकात्मक , काल्पनिक, शाब्दीक जगाचे ज्ञान त्यांना होते तर (३) अंतरचक्षू (Eye of Contemplation)- या योगे अधिभौतिक, पारलौकिक जगाचे दर्शन होऊ शकते . आणि ही सर्व जगं वेगवेगळी नाहीत तर ती एकमेकांत गुंफलेली असून ते एकाच जगाचे वेगवेगळे पैलू आहेत.

हे तीन चक्षू व्यक्तीत वेगवेगळ्या प्रमाणात उघडे अथवा बंद असतात. सांगायचा मुद्दा हा की हाच सिनेमा मी पाहीला असता तरी आपण उधृत केलेली सौंदर्यस्थळे मला दिसलीच असती याची शाश्वती नाही. कारण माझ्या वरील ३ चक्षूंच्या मर्यादा.

आपण फार चित्रांचे तसेच चित्रपटांचे अतोनात सुंदर रसग्रहण नेहमीच करत आला आहात. ते नेहमी करावे ही विनंती. माझ्यासारखी अतिसामान्य माणसे कोणताही चित्रपट अथवा चित्र हे ९५% अस्थि-मज्जामय चक्षूने आणि ५% ज्ञानचक्षूने पहात असतील पण आपल्यासारखे विद्वान लोक नक्की ३३.३३% तीनही चक्षूनी आस्वाद घेत असावेत असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jan 2011 - 7:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुचिच्या प्रतिसादाचा धागा पकडूनः
मी ५% ही ज्ञानचक्षू वापरत नाही, तेव्हा असेच सुंदर धागे येऊ द्यात.

सहज's picture

10 Jan 2011 - 8:22 am | सहज

चिंजंबरोबर सिनेमा पहायचे भाग्य व नंतर त्यांच्याकडून त्या कलाकृतीचे रसग्रहण प्रत्यक्ष ऐकायची सुसंधी मिळाली आहे त्यामुळे अनुभवाने सांगतो की चिंजं यांचे ज्ञानचक्षू, अंतरचक्षू इ. प्रभावी आहेतच पण आपल्यासारख्या सामान्य लोकांपुढे ते ज्ञान समजेल अश्या प्रकारे सांगायची हातोटी / कला देखील लाजवाब!

गणपा's picture

10 Jan 2011 - 3:14 am | गणपा

सध्या मिपावर विविध भाषेतल्या/देशांतल्या उत्तमोत्तम चित्रपटांच्या परिक्षणाची फिस्ट मिळतेय.
मित्रहो जमल्यास सोबत या चित्रपटांच्या टोरेंटची लिंक दिलीत तर दुधात साखर पडल्यांचा आनंद मिळेल. :)

शिक्षकाची ती आनंदभरली आरोळी मुस्लिमच काय पण जगातल्या कोणत्याही धर्मांधावर फेकून मारल्यासारखी वाटते.

मस्त :)

शिल्पा ब's picture

10 Jan 2011 - 4:30 am | शिल्पा ब

टोरेंट डाउनलोड अमेरीकेत कायदेशीर आहे का?

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jan 2011 - 10:20 am | बिपिन कार्यकर्ते

जंतु! _/\_ !!!

एकापेक्ष एक सरस आणि सुंदर चित्रपटांची ओळख करून देऊन मेजवानी देत आहात. दुर्दैवाने मुंबई / पुण्यात असूनही महोत्सवाचा लाभ घेता येत नाहीये. पण तुम्ही काही अंशी ते भाग्य आम्हाला देत आहात त्याबद्दल शतशः धन्यवाद!

शिवाय, एखाद वेळेस हे चित्रपट बघताही येतील, पण तुमच्यासारखी तरलपणे ते चित्रपट आणि त्यातले बारकावे समजून घेणे हे खरे तर शिकायचे आहे. तुम्ही बारकावे उलगडून दाखवता, एका अर्थाने तुमच्या नजरेतून चित्रपटच दाखवता याबद्दल विशेष धन्यवाद.

इन्द्र्राज पवार's picture

10 Jan 2011 - 10:35 am | इन्द्र्राज पवार

"....त्या अजस्र हिमालयाच्या कुशीत राहणार्‍या खडबडीत माणसांत मोबाईलधारकांचं मोबाईलवर्तन हे आपल्या सवयीच्या शहरी सुशिक्षित माणसांसारखंच बावळट आणि गावंढळ असतं. ..."

~ हे धमालच आहे. असे चित्रपट सातत्याने पाहात राहिल्यास रसिकाची 'टेस्ट' नकळत कशी बदलत जाईल हे पाहणार्‍यालादेखील कळणार नाही. भाषेची अडचण कधीही जाणवणार नाही याचे उदाहरण म्हणजे या पठडीतील चित्रपट होय. सुरेख परिचय.

इन्द्रा

निनाद's picture

11 Jan 2011 - 11:19 am | निनाद

कथा आवडली आहे... सादरीकरणासाठी नक्की पाहीन.
छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
कधी कधी हे साधे दिसणारे चित्रपट भलतेच परिणामकारक असू शकतात.