ओळख - पुस्तक आणि लेखकाची

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
26 Mar 2010 - 5:23 am

गेल्या आठवड्यात इथल्या एका पुस्तकांच्या दुकानात असेच फिरत असताना एका पुस्तकाकडे लक्ष गेले आणि आम्हाला दोघांना एकदम आकर्षक वाटले म्हणून तात्काळ लेकीसाठी म्हणून घेतले. मुलीला दाखवल्याबरोबर तिला देखील लगेच आवडले (!) आणि लगेच हसतखेळत वाचून काढले (!!).

ह्या पुस्तकाचे नाव आहे, "The Little Book of Hindu Deities" लेखकाचे नाव आहे, संजय पटेल. असे आवडण्यासारखे त्यात काय होते असे वाटत असेल ना? ही खालील काही चित्रे पहा:

गणपती काली दुर्गा सीता

अजून अशीच काही चित्रे त्याच्या संकेतस्थळावर पण पहाता येतील. यात सर्व हिंदू देवदेवतांची अशीच सुरेख पण त्याच बरोबर लहान मुलांना आवडतील अशी चित्रे काढलेली आहेत. त्याच बरोबर अगदी सोप्या शब्दात तसेच काहीसा मिष्कीलपणा ठेवत प्रत्येक देवतेबद्दल लिहीली आहे. उ.दा.:

"Ganesha also has a sweet tooth, so make sure to share laddoos with him..." अथवा "Lakshmi is best known for good luck, but don't expect her to visit you at the slot machines." असे काहीसे लिहीत त्या त्या देव-देवतांची माहीती सांगितली आहे.

म्हणलं हा संजय पटेल आहे तरी कोण?

Sanjay Patel Sanjay Patel

म्हणून बघितले तर समजले की हा पिक्सार या जगप्रसिद्ध सिनेस्टूडीयोमधील "बग्ज लाईफ" पासूनचा कलाकार (supervising animator and storyboard artist ) आहे! स्वतःची माहीती देताना देखील त्याने पुस्तकात मिष्कीलपणे दिली आहे मात्र त्याची सॅन फ्रॅन्सिस्को क्रोनिकल मधे आलेली मुलाखत बरेच काही सांगून जाते...

आई-वडील ब्रिटनचे. कॅलीफोर्नियात आले. आडनावाला साजेसे वडलांचे मोटेल आणि त्यातच व्यस्त. दुर्दैवाने आई मनोरुग्ण (स्किझोफ्रेनिक) त्यामुळे लहानपणी स्थानीक भारतीय समाजापासून तसे दूरच रहाणे झाले. कधीच भारतात गेला नाही. वडलांनी सतत दबाव आणल्यामुळे हिंदू असण्याला आधी मोठा भाऊ आणि नंतर हा दोघेही कंटाळले आणि पूर्ण दूर गेले. इतके की हा माध्यमिक शाळेत असताना चर्च मधे जाऊ लागला. धर्म म्हणून नाही पण मित्रांबरोबर म्हणून....

दुसरीकडे वयाच्या चौथ्या वर्षापासून हातातील कला दिसल्याने, जे काही परवडत होते ते देत आई-वडीलांनी प्रोत्साहन दिले. पुढे शाळेत लक्षात आले की आपल्याला कलाकारच होयचे आहे. म्हणून आधी क्लिव्हलंड इन्स्टीट्यूट ऑफ आर्ट्स मधे आणि नंतर कॅलिफोर्निया इन्स्टीट्यूट ऑफ आर्ट्स मधे शिक्षण घेयला गेला... मात्र पदवी कुठेच घेतली नाही! आजही विनापदवीचाच आहे...!

मात्र नंतर गीते मधील, "ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त यथाकाळी ते पावे अंतरी स्वये..." प्रमाणेच एक दिवस लहानपणापासून कायमच बघत आलेल्या गणपतीच्या चित्रामागील गणपतीची जन्मकथा मोठेपणी समजली आणि त्याच्यातील कलाकार जागा झाला. पुढे त्यातून हिंदू पुराणे वाचायची आवड लागली आणि डो़ळस विचार करून त्यातील (तत्वज्ञानाचा) मतितार्थ समजून घेऊन विचार करणे आवडू लागले. त्यातून हे पुस्तक तयार झाले. तरी देखील ते तयार करत असताना आपण कुणाच्या भावना दुखावत नाहीना याचा विचार सतत डोक्यात ठेवत तयार केले.

आजही हा स्वतःस हिंदू म्हणवून घेत नाही कारण लहानपणी हिंदूंचे म्हणून पाहीलेले कर्मकांड तो करत नाही. तरी देखील दरोज काही तास हिंदू तत्वज्ञान उत्साहाने वाचत आहे असे त्याने २००७ च्या मुलाखतीत सांगितले होते कारण तो पहील्यांदाच भारत प्रवास करणार होता! त्याच्याच शब्दातः

"If you define being Hindu in terms of devotion, well, I'm absolutely devoting five or six hours a night to Hinduism.

I'm just starting to come to terms with who I am, and maybe once I do that I can figure out what I believe. I'm just taking one step at a time."

Read more

त्याच्या खालील उत्तरात जीवन कसे जगावे याचे त्याने नकळत तत्वज्ञानच सांगितले आहे - जे कुठल्याच धर्माशी बांधील नाही तर वैश्वीक आहे: I so completely find myself through my art and my work -- I'm not sure if that's [my connection to] God. I know I feel absolutely at peace and totally satisfied when I'm working. I completely lose myself, and that's the greatest feeling. No criticism, no desire, just absolute bliss.

जशी २०-२५ एक वर्षांपुर्वी एक जर्मनबाई पुण्यात सगळेच संस्कृत बोलत असतील असे गृहीत धरून पोस्टात जाऊन संस्कृत मधे तार करायचा प्रयत्न करू लागली तसाच काहीसा सांस्कृतिक धक्का त्याला त्याच्या पहील्या भारतप्रवासात, स्वतःला हिंदू म्हणवणार्‍या आणि न म्हणवणार्‍यांकडून मिळाला असला तर त्यात नवल नाही.

तर असे हे लिटील बूक नक्कीच वाचण्यासारखे आहे. भारतात आहे का माहीत नाही. मात्र मिळाल्यास अवश्य वाचत लहानपणा परत एकदा सहजतेने उपभोगा आणि त्याच बरोबर लहानांनापण वाचायला द्या.

बालकथावाङ्मयरेखाटनआस्वाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

26 Mar 2010 - 5:43 am | शुचि

माझ्या इकडे एका दुकानात आहे हे पुस्तक. चाळते. धन्यवाद छान ओळखीबद्दल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

नील_गंधार's picture

26 Mar 2010 - 11:05 am | नील_गंधार

लेखक व पुस्तकाची ओळख आवडली.
लेखकाचि मुलाखत छानच.

नील.

कानडाऊ योगेशु's picture

26 Mar 2010 - 11:53 am | कानडाऊ योगेशु

किती सुंदर आणि क्युट (मराठी शबद?) चित्रे आहेत.
देव देवतांना ह्या रुपात पाहुन फार आपलेपणा वाटला.
अगदी एखाद्या कट्टर नास्तिकाच्या ह्रदयांत सुध्दा हि चित्रे पाहुन वात्सल्यभाव जागृत व्हावा.

अवांतर : हुसेनसाहेब अशी चित्रे का बरे काढत नाहीत?

- योगेशु.

टार्झनं प्रथमं वंदे खेचरं तदनंतरं | लत्ता प्रहारं पूर्वे मुष्टीप्रहारमं यथा||
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

स्वाती दिनेश's picture

26 Mar 2010 - 11:58 am | स्वाती दिनेश

ओळख आवडली, पुस्तक पहायलाही आवडेल.
स्वाती

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 7:12 pm | विसोबा खेचर

मस्त चित्र! :)

फारएन्ड's picture

27 Mar 2010 - 7:00 am | फारएन्ड

खुप सुंदर पुस्तक दिसते आहे. धन्यवाद येथे ओळख करून दिल्याबद्दल.

ऋषिकेश's picture

27 Mar 2010 - 1:43 pm | ऋषिकेश

वा अतिशय गोंडस चित्रे आहेत. पुस्तक व परिचय दोन्ही आवडले

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

एकलव्य's picture

28 Mar 2010 - 8:51 am | एकलव्य

अगदी असेच!!

वा अतिशय गोंडस चित्रे आहेत. पुस्तक व परिचय दोन्ही आवडले

घाटावरचे भट's picture

27 Mar 2010 - 3:45 pm | घाटावरचे भट

छान पुस्तक आहे.

छान परिचय. धन्यवाद
आमच्या ३ वर्षाच्या नातीसाठी मीही घ्यायचा विचार करत आहे!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm