खिडक्या

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
24 Mar 2010 - 10:45 pm

चला म्हणलं नेहमीप्रमाणे सुदर्शनला जाव. नाटक होत खिडक्या
मूळ जर्मन नाटकाचे मराठी भाषांतर विद्यासागर व सुनंदा महाजन यांनी केलंय.
कलाकार- ज्योती सुभाष, असीम पाळंदे
आजी व नातू या दोनच पात्रांभोवती हे नाटक फिरतं. कमल आजी वय ७० (ज्योती सुभाष) व तिचा नातू प्रसाद वय २५ (असीम पाळंदे) यांच्या संवादातून होणारी तीन पिढ्यांचे चित्रण यात आहे. कमल आजीला प्रसाद मोठी आई म्हणतो. कारण आजी म्हटल्यानं तिला म्हातारं वाटतं. स्टेनो म्हणून रिटायर झालेली कमल व तिचा नवरा गोविंद हे दोघेच मुंबईत फ्लॆट मध्ये राहत असतात. दोघांची मुले अमेरिकेत व मुलगी कानपुरला. मुलांशी फारसा संपर्क नाही. प्रसाद हा मुलीचा मुलगा जर्नॆलिझम शिकायला मुंबईत होस्टेल वर राहतो. तो या मोठ्या आईकडे येत असतो. दोघांचे छान जमते. गोविंदराव हे टीव्ही पाहण्यात मग्न असलेले अदृष्य पात्र. त्यांच नातवाशी फारसं जमत नाही. कमल कार्यमग्न. कोडी सोडव घरातील कामे कर, भिशीला जा वगैरे.वयोमानाप्रमाणे कमलचा आता पत्रे लिहिताना हात थरथरतो व अक्षर खराब येते म्हणून प्रसाद तिला संगणक शिकवतो.ईमेल्स शिकवतो. मग हळू हळू ब्लॊगिंग शिकवतो.संगणकाचे खिडक्या उघडणे चालू होते. संगणकाच्या पडद्याच्या अलीकडे ती व पलीकडे सारे जग ज्यात ती रमत जाते.नाटकात प्रोजेक्टर द्वारा या उघडत जाणार्‍या खिडक्या पडद्यावर दाखवल्या आहेत. एकामागोमाग एक उघडत जातात त्यावेळी तिची तारांबळ होते. सर्फिंग करताना एकदा तर पोर्नो साईट्स उघडल्याने घाबरून दोन दिवस संगणक बंद करते. हळू हळू संगणकाला सरावते.
प्रसाद अजून वाट न सापडलेला तरुण. तरुणाईत तो पायल नावाच्या तरुणीच्या बळेच प्रेमात पडतो. आजीशी म्हणजे मोठ्या आईशी तो मोकळे पणाने बोलत असतो. त्याच्या आईचे व आजीचे संबंध चांगले नाही हे त्याला माहीत असते. तिचा प्रसादच्या वडिलाशी घटस्फोट झालेला असतो. प्रसादचे आजीच्या घरात जाणे येणे असते. तो आजीला म्हणतो तू म्हातारी म्हणून तुझ्या ब्लॊगिंगला कुणी उत्तर देत नाही. तू तरुण हो बघ कसे प्रतिसादांचा पाऊस पडतो ते. इंटर नेटवर कुणाला वय कळतंय? ती मग पायल नावाने काल्पनिक पात्र होऊन लिहायला घेते. मग गोविंद नावाच्या पात्राच्या प्रेमात अशी वास्तव जालीय जगताची सरमिसळ करीत लिहीत जाते. जालावरील मित्रमंडळी तिला उत्तम प्रतिसाद द्यायला लागतात. मग हळू हळू तिच्या जालीय जगण्याची वास्तवाशी फारकत होते. खर्‍या आयुष्यात डिमेन्शियाने केव्हाच प्रवेश केलेला असतो. तिला गोविंदराव जातात तरी समजत नाही. भ्रमिष्टपणा वाढत जातो. डॉक्टरच्या सल्ल्याने प्रसाद तिला हॊस्पिटल मध्ये ऎडमिट करतो. मेंदू क्षीण झालेला असतो. प्रसादलाही ती ओळखत नाही वॊर्डबॊयला प्रसाद म्हणते. हळू हळू तिच्या डोक्यात अनेक खिडक्या उघडत जातात व संगणक व ती दोन्ही एकदम बंद होतात व नाटक संपते.
नाटकातील संवाद/ स्वगत विचार करायला लावतात, मेंदूची स्मृती आहे तो पर्यंत जग आहे हा संदेश देत राहतात. डिमेन्शिया विषयी थोडी माहिती नाटकात मिळते. राग, अपमान, नाराजी, अपेक्षाभंग मनात सूक्ष्म अढी निर्माण करतात. मग मी अमुक एक गोष्ट आयुष्यात कधी विसरणार नाही अशी भाषा करतो. शेवटी हे मेंदूच्या स्मृतीचे खेळ आहेत हे प्रसादच्या स्वागतातून उत्तम व्यक्त होताना दिसतं.
विचार करताना तंद्री भंग पावते कारण नाटक संपलेलं असतं.

नाट्यआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

24 Mar 2010 - 10:54 pm | शुचि

क्लिष्ट नाटकाची संक्षिप्त आणि चांगली ओळख.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

अरुंधती's picture

24 Mar 2010 - 11:10 pm | अरुंधती

वार्धक्यातील वास्तव व कल्पनाभासाच्या सरमिसळीचा आविष्कार तुम्ही चांगल्या शब्दांत मांडला आहे. मागे ह्या नाटकाचे परीक्षण सकाळमध्ये वाचले होते. परंतु तुमच्या लेखाने पुन्हा एकदा तो विषय मनात जिवंत झाला. धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

धनंजय's picture

25 Mar 2010 - 2:35 am | धनंजय

आणि मस्त नाटक

प्रमोद देव's picture

25 Mar 2010 - 8:39 am | प्रमोद देव

विषय नावीन्यपूर्ण आहे. घाटपांडेसाहेबांनी अगदी नेमक्या शब्दात नाटकाचे कथानक मांडलंय...त्यामुळे नाटक पाहिल्याचे समाधान मिळाले.

चित्रा's picture

25 Mar 2010 - 8:56 am | चित्रा

भरपूर प्रायोगिक नाटके पाहू लागले आहेत असे दिसते आहे!

नाटकाचा परिचय आवडला.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Mar 2010 - 9:25 am | प्रकाश घाटपांडे

मूळ जर्मन लेखक क्लिमेन्स म्याडगे. मॅक्समुल्लरभवन पुणे यांच्या सहकार्यातुन हे नाटक झाले.
नाटक पहाताना भय वाटल. नकळत कमल आजीच्या जागी स्वत:ला भविष्यात कल्पुन पाहिल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

25 Mar 2010 - 11:40 am | विसोबा खेचर

सुंदर परिचय..

मी_ओंकार's picture

25 Mar 2010 - 12:04 pm | मी_ओंकार

छोटेखानी पण परिपूर्ण परिचय.

- ओंकार.