युलीप बाबत काय करावे?

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in जनातलं, मनातलं
16 Mar 2010 - 9:17 pm

युलीप बाबत काय करावे?

वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक म्युच्युअल फंड किंवा अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी. ज्यावेळी आपल्या गुंतवणूकीचे मुल्य अपेक्षीत रकमे एवढे होईल, म्हणजेच आपल्या पश्चात वारसाचे सर्व प्रकारच्या आर्थीक गरजा भागण्याएवढे होईल तेव्हा टर्म इंशुरन्सचा हप्ता भरणे बंद करुन सर्व रक्कम गुंतवणूक पर्यायात करावी. (नियमीत दर महा अथवा वार्षीक स्वरुपात करणे चालू ठेवावे).

युलीपचे फायदे:

* मर्यादीत ५ वर्षे हप्ते भरुन नंतर हप्ते न भरताही वयाची ७५ वर्षे पुर्ण होईपर्यंत विमा संरक्षण चालू ठेवण्याची सुविधा.
* आयकर कलम ८०-सी नुसार कर बचत.

युलीपचे तोटे:

* पहिल्या वर्षी अँलोकेशन चार्जेस बरेच असतात त्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीला जात नाही.
* २ –या व ३ –या वर्षी सुध्दा व काही योजनेत नंतरही चार्जेस कापले जातात.
* सर्व प्रकारचे विमा संरक्षणापोटी कापले जाणारे मॉर्ट्यालीटी चार्जेस, फंड मँनेजमेंट चार्जेस, अँडमिनीस्ट्रेशन चार्जेस हे दर महिना आपली त्याप्रमाणात युनीटस् कापून आकारले जातात, ज्यामुळे भविष्यात युनीटची एनएव्ही वाढली तरी त्याचा पुर्ण लाभ विमा धारकाला मिळत नाही.
* मार्केट वरती जात असताना एनएव्ही मधील बदल म्युच्युअल फंडाचे तुलनेत लक्षणीय नसतो. मात्र मार्केट कोसळत असताना एनएव्ही जास्त प्रमाणात कोसळते.

युलीपचे तुलनेत गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंड योजनाच का स्विकारावी?

* संपुर्ण रक्कम गुतवली जाते.
* कोणतेही चार्जेस युनीटस कमी करुन आकरले जात नाहीत तर ते चार्जेस वजा केल्यानंतरच एनएव्ही जाहीर केली जाते.
* मार्केट नुसार एनएव्ही मधील बदल लक्षणीय असतो.
* म्युच्युअल फंडाचे इएलएसएस योजनेत केलेल्या गुंतवणूकीवरही आयकर कलम ८०-सी नुसार कर सवलत मिळते.
* पैसे भरणे व काढणे आपल्या सोइनुसार ठरवता येते.
* म्युच्युअल फंड व युलीप दोन्हीकडे बाजाराचे चढ उताराची जोखिम असते अशावेळी म्युच्युअल फंडातील परतावा हा युलीप पेक्षा नेहमीच अधीक असतो.

परंतु जर वय ३५ पेक्षा जास्त असेल व जिवन विमा घेणे गरजेचे असेल तर एखाचे चांगले युलीप योजनेद्वारे विमा उतरावा, मात्र तो उतरवताना उदिष्ट हे प्रथम विमा व नंतर परतावा असेच असावे.

त्यासाठी खालीलप्रमाणे धोरण अवलंबल्यास फायदेशीर होते:

* युलीप योजना स्विकारताना बाजारात उपलब्ध असणा-या सर्व योजनांचा तौलनीकदृष्ट्या अभ्यास करुन ज्या योजनेत कमीत कमी अँलोकेशन चार्जेस असती व ज्या योजनेत आपले स्वत:चे वय ७५ वर्षे पुर्ण होईपर्यत विमासंरक्षण मिळू शकत असेल तसेच ज्या योजनेत अपघाती मृत्यु, कायमस्वरुपी अपंगत्व, मेडिकल संरक्षण इ. मिळत असेल अशी सर्वसमावेशक योजना निवडावी. एक लक्षात ठेवा बहुतांशी एजंट सर्वसाधारणपणे तुमचा विचार न करता त्याचे कमिशनचाच जास्त विचार करत असतो.
* आपले जिवन संरक्षण वय वर्षे ७५ पर्यंतची घ्यावे.
* विमा संरक्षण योजनेतून जितके जास्तीत जास्त मिळेल तेवढे घ्यावी.
* सर्वसाधारणपणे युलीपमध्ये विमा हि वार्षीक हप्ता गुणीले मुदत भागीले दोन द्यावेच लागते, परंतु जर सदर योजनेतून जादा जिवन संरक्षण मिळत असेल तर ते संपूर्ण घ्यावे.
* जेवढे रायडर उपलब्ध असतील तेवढे घ्यावेत.
* पॉलिसी सुरु झाल्यापासून पुढे ५ वर्षे नियमीत विमा हप्ता भरावा.
* ५ वर्षानंतर विमा संरक्षण वय वर्षे ७५ पर्यंत चालू ठेवण्याचा पर्यायाचा अर्ज द्यावा.
* ५ वर्षानंतर विमा हप्ते भरणे बंद करावे पण पैसे काढू नयेत.
* ५ वर्षानंतर जेवढा विमा हप्ता आपण दर वर्षी भरत होतो पैकी त्यावेळी असणारे आयकर कायद्याप्रामाणे जेवढी सुट कलम ८०-सी प्रमाणे मिळत असेल तेवढी रक्कम म्युच्युअल फंडाच्या टँक्स प्लँन मध्ये गुतवावी व उर्वरीत रक्कम इक्वीटी अथवा डेट म्युच्युअल फंड योजनेत आपल्या जोखिम स्विकाणेच्या तयारीनुसार गुंतवावी.
* आपल्या गुंतवणूक मुल्यातूनच विमा आकार कापला जाऊन विमा संरक्षण मुदतपुर्तीपर्यंत चालू राहील.
* मुदतपुर्ती पुर्वी मृत्यु आल्यास विमा संरक्षणा इतकी रक्कम वारसाला प्राप्त होईल.
* मुदतपुर्तीचे वेळी आपण हयात असल्यास जे काय गुंतवणूक मुल्य असेल ते आपणास परत मिळेल.
* युलीपद्वारे जिवन विमा संरक्षण घेताना गुंतवणूक म्हणून नव्हे तर सोईचा विमा पर्याय म्हणूनच पहावे.
* युलीप हा खरे पहाता गुंतवणूक पर्याय म्हणून पहावयाचाच नसल्यामुळे उगाच गुंतवणूक मुल्य वगैरे पहाण्याच्या फंदातही पडू नये.
* शेअस बाजाराचे मँजीकल परतव्यामुळे आपले विमा संरक्षणाचे चार्जेस ५ वर्षे नियमीत हप्ते भरले असता चालू रहाण्याची सर्वाधीक शक्यता असते.

ह्याप्रमाणे युलीपद्वारे जिवन विमा संरक्षण घेणे कोणत्याही वयाचे व्यक्तीला फायदेशीर होते कारण फक्त ५ वर्षे इतक्या मर्यादित काळासाठी हप्ते भरुन नंतर वर वर्षे ७५ पर्यंत विमा संरक्षण चालू रहाण्याची सुविधा मिळते व ७५ वर्षानंतर शिल्क मुल्यही परत मिळते. आपल्याला जेवढे विमा संरक्षण हवे आहे त्याच प्रमाणात युलीपचा हप्ता ठरवावा व उर्वरीत रक्कम शक्यतो सिस्टीमँटीक इन्व्हेस्टमेंट योजनेचे माध्यमातून एखादे चांगले म्युच्युअल फंड योजनेत गुंतवावेत.

अशा प्रकारे युलीप बाबत निर्णय घेतल्यास पस्तावण्याची वेळ येत नाही.

आपली एकूण बचत हि आपल्या निव्वळ (सर्व कर्जाचे हप्ते वगैरे वजा जाता) उत्पन्नाचे ३५% एवढी असावी, जेणे करुन भविष्याची चांगली तरतुद होऊ शकेल. आपली गुंतवणूक हि निरनिराळ्या गुंतवणूक माध्यमात, उदा. बँक, पोस्ट, पी.पी.एफ., इक्वीटी म्युच्युअल फंड, डेट फंड, बँलन्स फंड व शेअर्स मध्ये करावी जेणे करुन जोखिमीचे संतुलन होईल.

युलीप किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जवळचे एजंट मार्फत गुंतवणूक करण्याऐवजी तज्ञ गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला (त्याची फि देऊनही) घेऊन मगच निर्णय घेणे गुंतवणूकदाराचे हिताचे असते.

गुंतवणूकसंदर्भशिफारस