कालाय तस्मै नमः ||

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
14 Mar 2010 - 2:04 pm

जसा जसा काळ पुढे सरकतोय, तसं तसं जग बदलतंय.....फार बदलतंय. मूलभूत गरजा सुद्धा बदलल्या आहेत. आधी अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गोष्टी असल्या तरी आयुष्य निभत होतं. ह्या शिवाय जे काही हवं असायचं, त्या होत्या सुख सुविधा !! आता मात्र सगळंच बदललंय. अन्न, वस्त्र, निवाऱ्याखेरीज अजूनही खूप गोष्टी हव्या असतात जगायला आणि त्यांना सुख सुविधा म्हणून चालणार नाही.....त्या ही गरजाच झाल्या आहेत.

इंटरनेट ही अशीच माणसानं स्वत:साठी निर्माण केलेली गरज. आधी कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा ही आयुष्य चालत होतंच की. पण आता जरा नेट बंद झालं की जीव अगदी कासावीस होतो. नेट बंद झालं की एकदम out of touch वाटतं. त्यादिवशी असंच झालं. संध्याकाळी अचानक फोन बंद झाला आणि खरंच श्वासच बंद झाल्यासारखं वाटलं. फोन बंद झाला तरी मोबाईलवरुन बोलता येतं. पण फोन बंद झाला तर इंटरनेट पण बंद पुकारतं......त्याचं काय करावं.....!! थोडा वेळ वाट बघितली...मग खाली जाऊन कनेक्शन बघितलं. तरी काहीच होईना. घरात इन-मीन-तीन माणसं. पण प्रत्येकाचा त्या इंटरनेटशी जिव्हाळा वेगळा. ह्यांना ऑफिसमधे वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळाला नव्हता त्यामुळे वर्तमानपत्रं वाचायची होती. शिवाय त्याच्या केमीकल इंजीनिअरिंगच्या काही नव्या साईट्स कळल्या होत्या त्या बघायच्या होत्या. पिल्लूला फेसबुक, ऑर्कुट.....शिवाय Farm Ville मधे त्याचे crops harvesting साठी तयार झाले होते. मी...... माझी नुकतीच एक गझल लिहून झाली होती....ती लग्गेच कुणाला तरी दाखवायची होती. मायबोली, मिसळपाव, मनोगत........झालंच तर सुरेश भट.इन..... सगळीकडेच टाकायची होती. मग थोड्या थोड्या वेळाने प्रतिक्रिया बघण्याची मज्जा काही वेगळीच !! गुगल टॉक आणि याहू चा पण तो आवाज नाही.....सगळं काही शांत. जणूकाही सगळ्या जगाशी संपर्कच तुटला होता.

अस्वस्थ मनानेच जेवणं झाली.....घालमेल सुरुच होती. समोर टीव्ही सुरु होता तरी त्यात लक्ष नव्हतं. कसंबसं झोपलो. काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. खरंच...किती आहारी गेलो आहोत नेटच्या हे तेव्हा जाणवलं. मग विचारचक्र सुरु झालं. माणसाच्या प्रगतीनं माणसाने खूप काही कमावलं पण त्याबरोबरच खूप काही गमावलं सुद्धा. आता हेच बघा ना. आपल्या लहानपणी कुठे होता टिव्ही, कुठे होता कॉम्प्युटर आणि नेट ? तरीही आनंदी होतोच ना आपण. उलट त्यावेळी एकमेकांसोबत किती छान वेळ जायचा. किती गप्पा, थट्टा, मस्करी व्हायची. सोबत वेळ घालवायला कुठल्याच साधनांची आवश्यकता नव्हती त्यामुळे नकळतच आपुलकी, जवळीक वाढायची. मिळून मिसळून सगळे सण, वार साजरे व्हायचे.

आता मात्र माणूस माणसापासून दुरावलाय. इतका की आपल्या रक्ताच्या माणसांसाठीही त्याच्याकडे द्यायला वेळ नाहीये. सगळ्या सुखसुविधा आहेत पण एकमेकांसाठी वेळ मात्र नाहीये. त्यामुळे माणसं तुटत चालली आहेत. जवळची नातीही दुरावताहेत. कोणाकडे यायला जायला वेळ नाही. पत्र लिहायला वेळ नाही. त्यामुळे कितीतरी आनंदाला मुकते आहे ही पिढी. आमंत्रण, पत्रं, पोस्टमनची वाट, भेटीचा आनंद, विरहाचं दु:ख.......काहीच नाही. सगळं काही इमेल, फोन यावरच निभतं. इतकं सगळं मेकॅनिकल झालंय ना....की त्यात काही संवेदनाच उरली नाहीये. मोकळ्या हवेत खेळ, फिरायला जाणं, ते संवाद साधणं..काहीच नाही. नवी पिढी तर इतकी घरघुशी झाली आहे ना........की ते बघून आपलाच जीव गुदमरतो.

कधीतरी असं वाटतं नको ह्या काही सुखसुविधा. मस्तपैकी घड्याळाच्या गजराने, रेडीओवरच्या "वंदे मातरम" ने होणारी सकाळ अनुभवावी. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जावं, घरी आल्यावर आईने केलेले गरम गरम पोहे, उकरपेंडी असं खावं. बादलीतल्या पाण्याने आंघोळ , मग शाळेचा गृहपाठ, थोडं इकडे तिकडे उंडारुन, देवाच्या पूजेची तयारी.....आईला फुलं तोडून द्यावी....मस्तपैकी जेवून सायकलवर शाळेत जावं. शाळेत पण दामटून अभ्यास, खेळ, कानगोष्टी, एकमेकांच्या डब्यातला खाऊ, कधी मैत्रिणींशी कट्टी तर कधी गट्टी. रमत गमत घरी आल्यावर दूध प्यायलं की निघावं खेळायला. फ्रीजमधल्या थंड पाण्याऐवजी ते वाळा घातलेलं माठातलं पाणी, दुपारी चारनंतर ते "टॉक" करुन एकमेकांना बोलावणं, दिवेलागणी होईस्तोवर तुफान खेळणं......आल्यावर भूक भूक, देवासमोर प्रार्थना करुन......मग वाफाळलेलं गरम गरम आईच्या हातचं जेवण. रात्री सगळे मिळून गप्पा. काय मस्त दिवस होते ते !

आजकालच्या मुलांना मात्र हे काहीच अनुभवता येणार नाही. अती प्रगतीनं माणसानं स्वत:चंच नुकसान करुन घेतलंय. नव्या पिढीला आयुष्य आपल्यासारखं मोकळं, स्वच्छंदी कधीच जगता येणार नाही. ह्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी करावी लागणारी अखंड मेहेनत.....आणि त्यामुळेच वाट्याला येणारा कमी वेळ... हे सगळं कुठे थांबणार आहे देव जाणे !!

असो......!! सकाळी बरोबर साडे नवाला फोन सुरु झाला...लगेच नेट आणि नेटवरची कामंही !! आता कसली फुरसत मिळतेय हा विचार पुढे continue करायला......! कालाय तस्मै नम : ॥

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

14 Mar 2010 - 2:12 pm | पर्नल नेने मराठे

मला गेले ३ वर्शे अजिबात बोलायची सवय नाहिये, सासु सासरे आले तेव्हा दिवसभर बोलत राहायचे 8| , सवय नस्ल्याने ३-४ दिवस जडच गेले :< . कोणीजर २-३ मिनिटाच्यावर फोन वर बोलले तरी मला सान्गावेसे वाटते कि सरळ च्याटला येउन काय त्या गप्पा मार. :P असा आहे सवयीचा परिणाम :S

चुचु

टारझन's picture

14 Mar 2010 - 2:23 pm | टारझन

लै भारी !!

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2010 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते

ट्टॉक !!!!

बिपिन कार्यकर्ते

तुमचा लेख वाचून मर्ढेकरांची कविता आठवली. चांदण्याची आणि नदीची जुनी ओढ, पुन्हा त्या विश्वात जाण्याची इच्छा आहे पण...

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी;
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा

शाळेत असताना नीट कळली नव्हती. असल्या गोष्टी नंतरच कळतात.

राजेश

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2010 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

मलाही ही कविता शाळेत होती... तेव्हा नुसतीच शिकलो होतो... आता कळते थोडी थोडी.

बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा's picture

14 Mar 2010 - 3:24 pm | मेघवेडा

छान लिहिलंय! लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील सुरुवातीच्या प्रसंगाची आठवण झाली ज्यात जान्हवी म्हणते:

गुड मॉर्निंग मुंबाय!

शहर की इस दौड मे दौडके करना क्या है? जब यही जीना है तो दोस्तों मरना क्या है?
पहली बारीश मे ट्रेन लेट होने की फिक्र है, भूल गये भीगते हुए टहलना क्या है?
सीरिअल्स के किरदारोंका सारा हाल मालूम है, पर मां का हाल पूछनेकी फुरसत किसे है?
अब रेत पे नंगे पाँव टहलते क्यों नही, १०८ है चॅनल फिर दिल बहलते क्यों नही,
इंटरनेट की दुनिया के तो टच मे है, लेकिन पडोस में कौन रहता है ये जानते तक नहीं,
मोबाईल, लँड्लाईन सब की भरमार है, लेकिन जिगरी दोस्त तक पहुंचे ऐसे तार कहां है?
कब डूबते हुए सूरज को देखा था याद है? याद है शाम का गुजरना क्या है??
...

खरंच .. कालाय तस्मै नमः॥

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा!

विसोबा खेचर's picture

14 Mar 2010 - 3:19 pm | विसोबा खेचर

मस्तपैकी घड्याळाच्या गजराने, रेडीओवरच्या "वंदे मातरम" ने होणारी सकाळ अनुभवावी. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जावं, घरी आल्यावर आईने केलेले गरम गरम पोहे, उकरपेंडी असं खावं. बादलीतल्या पाण्याने आंघोळ , मग शाळेचा गृहपाठ, थोडं इकडे तिकडे उंडारुन, देवाच्या पूजेची तयारी.....आईला फुलं तोडून द्यावी....मस्तपैकी जेवून सायकलवर शाळेत जावं. शाळेत पण दामटून अभ्यास, खेळ, कानगोष्टी, एकमेकांच्या डब्यातला खाऊ, कधी मैत्रिणींशी कट्टी तर कधी गट्टी. रमत गमत घरी आल्यावर दूध प्यायलं की निघावं खेळायला. फ्रीजमधल्या थंड पाण्याऐवजी ते वाळा घातलेलं माठातलं पाणी,

अप्रतीम..!

तात्या.

दिपाली पाटिल's picture

14 Mar 2010 - 8:50 pm | दिपाली पाटिल

अगदी मस्तच...

दिपाली :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2010 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेटाचं व्यसन लैच बेक्कार. कधी-कधी नेटावर खूप वेळ गेलेला असतो
आणि हाती फार काही आलेले नसतं. तेव्हा या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे असे वाटते.
आणि नेट बंद असले आणि नेटावर आलो नाही तर, अस्वस्थपणा अगदी आपल्यासारखाच...! :)

-दिलीप बिरुटे

नंदू's picture

14 Mar 2010 - 4:11 pm | नंदू

अगदी मनातलं लिहिलंय.

नंदू

रेवती's picture

14 Mar 2010 - 6:02 pm | रेवती

अगं, अगदी असच काल मनात आलं, जेंव्हा नवर्‍याच्या कॉप्युटरला व्हायरल इन्फेक्शन झालं ;) आणि माझ्या एकटीच्या कॉम्प्युटरवरच सगळे जण अवलंबून होतो (म्हणजे आहोत सध्या)!
बराचवेळ चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं.
बाकि तुझं लेखन अगदी सगळ्यांच्या मनातलं!

रेवती

मिसळभोक्ता's picture

14 Mar 2010 - 11:18 pm | मिसळभोक्ता

नवर्‍याच्या कॉप्युटरला व्हायरल इन्फेक्शन झालं

ह्म्म्म.. जरा सांभाळून रहा..

व्हायरल इन्फेक्शन पसरतं, म्हणतात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

II विकास II's picture

14 Mar 2010 - 7:08 pm | II विकास II

मलाही जाम आंतरजालाचे व्यसन लागले होते. आता बर्‍याच अंशी कमी झाले आहे. जुन्या आवडत्या ठिकाणी जाणे, मित्रांना भेटणे मुद्दामहुन चालु केले.

अरुंधती's picture

14 Mar 2010 - 7:26 pm | अरुंधती

अगदी सध्याचे वास्तव मांडले आहेस गं! नुस्ता एखादे दिवशी मोबाईल हाताशी नसला की हात शिवशिवत आणि नजर भिरभिरत राहाते. इंटरनेट, कॉम्प्युटरला कसली बाधा झाली असेल तर चुटपुटल्यासारखे होते. मला वाटते, आपणच स्वतःला ह्या सवयींचे गुलाम करून घेतो. म्हणूनच अधून मधून इंटरनेट, कॉम्प्युटर, मोबाईल उपवास शरीर व मनःस्वास्थ्यासाठी फार उत्तम!!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

जयवी's picture

14 Mar 2010 - 7:51 pm | जयवी

आपणच कदाचित कारण असू ह्या गुलामीसाठी. पण आहे हे असं आहे. ह्यामुळे कितीतरी गोष्टी करायच्या राहून जातात. सगळा वेळ नेटावरच निघून जातो.

किती दिवसात हातात पुस्तक घेऊन वाचायचं राहून जातं. कितीतरी दिवसात जुना किशोर ऐकलेला नसतो, कितीतरी दिवसात चांदण्यांनी भरलेलं आकाश सुद्धा बघितलं नसतं.....वेळच नसतो. आयुष्य हळुच निसटून जातं आणि शेवटी काय काय करायचं राहून गेलं ह्याची फक्त यादीच जवळ राहते.

असो........ अरुंधती म्हणतेय तसा एकेक दिवस उपास करुन बघायला हवा :)
प्रतिक्रियांबद्दक्ल खूप खूप धन्यवाद :)

प्राजु's picture

14 Mar 2010 - 10:36 pm | प्राजु

अगदी अगदी!! अगदी मनातलं!
खूप छान लिहिलं आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

इंटरनेटस्नेही's picture

15 Mar 2010 - 4:12 am | इंटरनेटस्नेही

इन्टरनेटाय तस्मेः नमः

--

इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.

चित्रा's picture

15 Mar 2010 - 4:52 am | चित्रा

खरे आहे. लेखातल्या भावनेशी सहमत!

आता तपशील विसरले, पण मला वाटते सुधीर गाडगिळांच्या मुद्रा का अशाच कोणत्या पुस्तकात एका मराठी कुटुंबाचे वर्णन असे आहे, की ते आठवड्यातला एक दिवस सगळ्या आधुनिक सोयी-सुविधांपासून दूर काढतात - ठरवून आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तसे करण्याचा मोह होतो, पण जमतेच असे नाही.

विष्णुसूत's picture

15 Mar 2010 - 5:09 am | विष्णुसूत

आवडलं लेखन !
सुख सुविधा नकळत आपल्याला गुलाम करतात. आधि त्यांच्या चक्रव्युहात अडकत जाणं सोपं आणि प्रगत वाटतं नंतर समजतं .. आता बाहेर पडणं अवघड आहे !

मदनबाण's picture

15 Mar 2010 - 5:41 am | मदनबाण

गरज्...मनाची...कोणाला तरी आपल्या भावना सांगण्याची गरज्,कुठेतरी स्वतःला व्यक्त करण्याची गरज्... कुठेतरी आपलं अस्तित्व आहे हे दाखवण्याची गरज... या मायाजालाची सवय ज्याला लागते तो व्यसनाधीन होतोच होतो. :)
जितका जास्त वेळ जो इथे घालवतो तितकाच जास्त तो याच्या अधिन होतो.
जरी हे आभासी जग असलं तरी ते खर्‍या लोकांनीच बनवल आहे आणि त्यांची यातील भावनिक गुंतवणुक देखील तितकीच खरी आहे.जितकी भावनिक गुंतवणुक जास्त तितकाच त्रास देखील जास्त...म्हणुनच ज्या प्रमाणे पाण्याबाहेर काढलेल्या माशाची तडफड होते त्याच प्रमाणे नेट ग्रस्त व्यक्तीची नेट बंद झाल्यावर तीच गत होते.

उपाय :--- आधी नेट नव्हतं तेव्हाही जग चालतच होत तेव्हा अधुन मधुन नेटशी स्वत:हुन कट्टी फू करायच आणि आभासी जगास काही काळ लांब ठेवायच.
अर्थात हे सांगण सोप आहे आणि तसं वागण कठीण... ;) पण स्वतःला टेस्ट करत राहायच.

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

हर्षद आनंदी's picture

15 Mar 2010 - 9:00 am | हर्षद आनंदी

पण हा कोष आपण स्वतःच बांधुन घेतलाय....तोडुन टाका पाश! मुक्त व्हा!!!

जाणीवपुर्वक यंत्रापासुन लांब रहा, घरी जाताना २ स्टॉप अलिकडे ऊतरुन चालत जा, नविन माणसे दिसतील, नविन ओळखी होतील. सकाळी लवकर ऊठुन फीरायला जा, रात्री कट्ट्यावर ५ मिनिटे हजेरी लावा.. वेळ झालाच तर शेजारच्या आजींशी बोला, एखाद्या लहान मुलाचे लाड करा, सुटीच्या दिवशी चार लोकांच्या घरी जा, जुन्या मित्राला, मैत्रिणीला भेटा..आठ्वणींना ऊजाळा द्या!!

हे असले तुणतुणे जरा जास्त पैसे बाळगुन असलेली लोकंच वाजतात, असे आढळुन आले आहे. पैसे आले की गरज भासु लागते, मग अजुन पैसे, मग परत नवी गरज...मग पैसा!! हळु हळु माणुस मशीन बनतो ..मग कसल्या आल्यात भावना??

आई, वडील, भाऊ, बहीण अश्या भरलेल्या घरातुन ४ खोल्यांच्या घरात नवरा-बायको आणि मुले असा एकसुरी संसार मांडताना मनाला वेदना होत नाहीत? आई-बापाला मायदेशी ठेवुन करीयरचे गोंडस कारण देऊन परदेशी जाताना, काहीच वाटत नाही?

चार पैसे कमी मिळाले तरी चालतील.. पण मानसिक समाधान महत्वाचे!!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं
तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

राजेश घासकडवी's picture

15 Mar 2010 - 10:28 am | राजेश घासकडवी

का लोकं आंतर्जालाविषयी तक्रार करतात मला समजत नाही. गेल्या दहा वर्षात माझ्या जितक्या नवीन, समधर्मी लोकांशी ओळखी झाल्या नाहीत तितक्या माझ्या गेल्या दोन महिन्यात उपक्रम व मिपा वर लेखन केल्यामुळे झाल्या. कित्येकांनी माझ्या लेखनावर साधकबाधक चर्चा केली, प्रतिसाद दिले, कौतुक केलं, आणि उणीवाही दाखवल्या. हे खऱ्या जगातल्या तोंड असलेल्या मित्रांमध्ये मला शक्य झालं नव्हतं. ज्यांना मी आत्तापर्यंत लेखन दाखवलं त्यांनी 'वा चांगलं आहे' या मैत्री/नात्यातून येणाऱ्या प्रतिक्रियेपलिकडे कधी काही सांगितलं नाही.

माझ्या शेजाऱ्याशी माझी ओळख नसेल, पण माझ्यापासून हजारो मैल दूर राहाणाऱ्या मुक्तसुनीत, धनंजय, शुची, बिपिन, आणि आणखीन अनेक कितीतरी लोकांशी मी आंतर्जालाशिवाय कसा संवाद साधू शकलो असतो? चेहेरा दिसणे, स्पर्श करता येणे या वाईट गोष्टी नाहीत. पण त्या चेहेऱ्यावर असलेल्या तोंडातून व आत असलेल्या मेंदूतून जर मला हव्याशा वाटणाऱ्या कवितांविषयीच्या चर्चा नसतील, आणि त्याच्या पोरांच्या शाळेविषयीच्या पंचवीस वेळा ऐकलेल्या तक्रारी असतील तर मी का खरा चेहेरा अधिक चांगला मानावा?

शेवटी योग्य संतुलन चांगलं हे खरंच, पण केवळ आपण लहानपणी एक विशिष्ट जीवनपद्धती जगलो, आणि लहानपणी जीवन सुंदर होतं म्हणून ती जीवनपद्धती चांगली असं नाही. किंवा आजची वाईट असंही नाही. उगाच मॅसोचिस्टीक स्वबडवेगिरी का करावी? लहानपणी आपण स्वच्छंद, आवडेल तसं मनसोक्त केलं. मग आज जर आपल्याला आंतर्जाल आवडत असेल तर ते मनसोक्त का उपभोगू नये? (अधूनमधून मोकळ्या हवेत जाऊनच, अर्थात...)

राजेश

विसोबा खेचर's picture

15 Mar 2010 - 1:12 pm | विसोबा खेचर

वेगळा प्रतिसाद..
राजेशरावांचा सकारात्मक दृष्टीकोनही आवडला..

आपला,
(सकारत्मक) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2010 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते

राजेशचा प्रतिसाद मला जे म्हणायचंय त्याच्याशी पूर्ण जुळतोय. अर्थात, अति आहारी जाऊन अगदी घरच्या माणसांशीही संवाद तुटावा असे न व्हावे.

बिपिन कार्यकर्ते

जयवी's picture

15 Mar 2010 - 11:56 am | जयवी

राजेश..... तुम्ही म्हणताय ते सगळं अगदी पटलं. नेटचे तुम्ही म्हणताय तसे खूप फायदे आहेत.....नक्कीच ते मान्य करायला हवेत. म्हणणं फक्त इतकच की त्याच्या आहारी जाऊ नये. दूर देशातल्या कुणा ८-१० अनोळखी लोकांच्या ओळखीसाठी आपली घरची मंडळी दुर्लक्षिल्या जायला नकोत इतकंच :)

आपल्या लहानपणी जसं आयुष्य सुंदर होतं..तसंच ते आजही आहे पण ते तसंच सुंदर ठेवण्यासाठी स्वतःला काही बंधनं, शिस्त नक्कीच घालायला हवीत.

Dhananjay Borgaonkar's picture

15 Mar 2010 - 2:09 pm | Dhananjay Borgaonkar

राजेश यांची प्रतिक्रिया पटली.
या नवनवीन सोयी सुविंधामुळे खरच खुप फायदे झाले आहेत. गुगलबाबाने तर कमाल केली आहे. यापुढेही उत्क्रांती ही होतच रहाणार. मला नाही माणसं लांब गेली आहेत उलट जवळच आली आहेत.
शेवटी आपण या सगळ्या गोष्टींचा ताळ्मेळ कसा करतो हे आपल्याच हातात आहे.