विंदा

विकास's picture
विकास in काथ्याकूट
14 Mar 2010 - 10:52 am
गाभा: 

आत्ताच सकाळ आणि म.टा. मधे वाचले की ज्ञानपिठ पारीतोषिक विजेते ९२ वर्षीय विंदा करंदीकर यांचे मुंबईत भाभा इस्पितळात निधन झाले.

"देणार्‍याने देत जावे-घेणार्‍याने घेत जावे" असे म्हणणार्‍या विद्वान साहीत्यिकाने जसे स्वतःच्या लेखणीने भरभरून दिले तसेच स्वतःला ज्ञानपिठ मिळाल्यावर त्या बक्षिसातील रोख रक्कमही जनकार्यासाठी परत केली होती हे आठवले...

विंदांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Mar 2010 - 11:14 am | विसोबा खेचर

विंदांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली.

II विकास II's picture

14 Mar 2010 - 11:15 am | II विकास II

आज घरातीलच कोणी तरी गेल्या सारखे वाटत आहे.

II विकास II's picture

14 Mar 2010 - 12:44 pm | II विकास II

मराठी साहित्य जगतातील एक अनमोल तारा हरवला...

ज्ञानपीठसारखा सर्वोच्च साहित्य सन्मान प्राप्त करणारे कवीवर्य, कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांचे आज निधन झाले. मराठी कवितेचा एक तारा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना स्वराज सामाजिक संस्थेकडून विनम्र श्रद्धांजली.

ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य विंदा करंदीकर यांचं मुंबईत निधन झालं. मुंबईतल्या भाभा रुग्णालयात त्यांचं निधन झालं. विंदा करंदीकरांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. मराठी साहित्यातला साहित्य तपस्वी काळाच्या पडद्याआड गेलाय. विंदांचा ज्ञानपीठ, कोणार्क सन्मान, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्काराने गौरव झाला होता. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार विंदांना ''''अष्टदर्शने'''' या साहित्यकृतीसाठी देण्यात आला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. विंदांनी आपले शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. रा.स्व. ते मार्क्स असा त्यांचा वैचारीक प्रवास राहीला पण ते अशा कोणत्याही संघटनेचे सभासद झाले नाहीत. अर्थार्जनासाठी त्यांनी अध्यापन स्विकारले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय , मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. १९८१ मध्ये त्यांनी लेखनाला वेळ मिळण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्विकारले नाही.

कविवर्य विंदा करंदीकरांची साहित्यसंपदा:

स्वेदगंगा
मृद्गंध
धृपद
जातक
विरूपिका
अष्टदर्शने (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)

संहिता (संपादन - मंगेश पाडगावकर)
आदिमाया (संपादन - विजया राजाध्यक्ष)

राणीची बाग
एकदा काय झाले
सशाचे कान
एटू लोकांचा देश
परी ग परी
अजबखाना
सर्कसवाला
पिशीमावशी आणि तिची भुतावळ
अडम् तडम्
टॉप
सात एके सात
बागुलबोवा

स्पर्शाची पालवी
आकाशाचा अर्थ
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध

परंपरा आणि नवता
उद्गार

ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र
फाउस्ट (भाग १)
राजा लिअर

संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर

लिटरेचर ऍज अ व्हायटल आर्ट
अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज

कविवर्य विंदा करंदीकरांची गाजलेली कविता स्मरण करुया, त्यांना अभिवादन म्हणून..

तेच ते नि तेच ते...

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते
– विंदा करंदीकर

अजित साटले
(सरचिटणीस, स्वराज सामाजिक संस्था)
(इ-पत्रातुन साभार)

नीलकांत's picture

15 Mar 2010 - 9:24 am | नीलकांत

विंदांना माझी विनम्र श्रध्दांजली.

- नीलकांत