थेंबे थेंबे...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
9 Mar 2010 - 2:47 pm

"कॅन हॅव सम वॉटर प्लीज?" मी हवाईसुंदरीला पाचव्यांदा पाणी मागत होतो. दर वेळेस कुणीतरी एक सुंदरी एका छोट्या पेल्यात थोडे पाणी आणून देत होती आणि माझी तहान काही केल्या इतक्या कमी पाण्याने शमत नव्हती. घरी असतांना सुटीच्या दिवशी दुपारी झकास जेवण झाल्यावर एक तांब्या सरळ तोंडाला लावून न थांबता घटाघटा पाणी पिणार्‍या मला ते चार थेंब पाणी तहानेची अधिक जास्त प्रकर्षाने जाणीव करून देत होतं. त्या सुंदर, फटाकड्या सुंदरींना वारंवार पाणी मागणं मलाही प्रशस्त वाटत नव्हतं. माझा पहिलाच आंतरराष्ट्रीय विमानप्रवास होता तो. त्यामुळे नवखेपणा लपवत सराईत हवाई प्रवाशासारखे वागत मी त्यांना माझा राग पाण्यासोबत गिळून हसून 'थँक्स' वगैरे म्हणत होतो. बरं सुंदर्‍या (बहुतेक सगळ्याच) खरच खूप सुंदर आणि कमनीय बांध्याच्या असल्याने त्यांच्यावर रागावणं किंवा त्यांना जास्त पाणी मागणं मला जमत नव्हतं. खोटं खोटं का असेना त्या खूप गोड हसून मला पाणी देऊन जायच्या. आता त्यांच्या स्मितहास्यावर फिदा होऊन मी माझी तहान विसरावी इतका काही मी कवी मनाचा नाही. त्यामुळे त्या हसल्या काय किंवा रुसल्या काय, मला पाणी हवच होतं. माझ्याइतकं पाणी बहुधा कुणीच पीत नव्हतं.

असा २०-२२ तास प्रवास करून मी एकदाचा शिकागोच्या माझ्या हॉटेलवर पोहोचलो. तोपर्यंत माझ्या नेहमीच्या पाण्याच्या साधारण फक्त एक चतुर्थांश पाणी माझ्या पोटात गेले होते. खूप तहान लागली होती म्हणून मी माझ्या खोलीत पाण्याचा जग किंवा तांब्या असं काहीतरी शोधू लागलो. मला कुठेच काहीच दिसत नव्हतं. मी मनातल्या मनात हॉटेलला आणि ज्या माझ्या सहकार्‍याने माझं हॉटेलचं वास्तव्य ठरवलं होतं त्याला शिव्यांची लाखोली वाहत पाण्याचा जग शोधत होतो.

"काय भिकार हॉटेल आहे यार; साधा पाण्याचा एक जग नाही ठेवता येत यांना खोलीमध्ये. च्यायला सगळं आहे; टीव्ही आहे, फ्रीज आहे; हीटर आहे; मस्त गरम पाणी आहे, जॅकुझी आहे; मऊमऊ बेड आहे आणि एक दीडदमडीचा जग नाही! एक पेला नाही! रहाणार्‍याने पाणी प्यायचं कसं?" मी जरा तिरमिरीतच रिसेप्शनला गेलो आणि तिथे बसलेल्या एका मोनिका नावाच्या अवाढव्य स्त्रीला पाण्याच्या प्रश्नाविषयी पृच्छा (बाप रे, अचानक आठवला म्हणून दिला ठेऊन हा शब्द) केली. ती फोनवर कुणाशी तरी बोलत होती. तिला सुरुवातीला कळलच नाही की मला पाणी का हवय ते. तिने मला निरागसपणे बाथरूममध्ये पाणी असल्याचं सांगीतलं. "बाथरूममध्ये तर पाणी असणारच ना यार्... नाहीतर वांधे होतील ना. पण प्यायचं पाणी कुठे आहे?" मी तिला विचारले. अर्थात पहिला भाग मी मनातच म्हटलो. भारतात एकवेळ हॉटेलच्या बाथरूममध्ये पाणी नसेल पण मागीतल्यावर प्यायचं पाणी मात्र लगेच मिळतं. मोनिका (कुठे ती लेवेंन्स्की आणि कुठे ही!) जरा गडबडली. मग मीच तिला पुन्हा पिण्याच्या पाण्याविषयी विचारले तेव्हा ती म्हटली की असलं काही इथं नसतं. तिच्या चेहर्‍यावर तेव्हा "येडंच दिसतय हे बेनं" असा भाव होता. पण मी पण मागे हटणार्‍यांपैकी नव्हतो. मग मी पाणी पिणार कसा असा खडा सवाल मी तिला टाकला आणि कमरेवर हात ठेवून एका पायाचा पंजा जमीनीवर हलकेच आपटत चेहर्‍यावर "आता बोल, आता बोल, आता का?" असा भाव आणून तिच्याकडे बघू लागलो. बाथरूमचं पाणी बिनदिक्कत प्या असं म्हणून तिने माझा प्रश्न सोडवला आणि मी माझ्या खोलीत आलो. बाथरूमच्या (म्हणजे तिथल्या बेसिनच्या) नळाचं पाणी मी हातात धरून थोडं प्यालो. पण शाळेत असतांनाच ही हात नळाला आणि तोंड हाताला लावून पाणी प्यायची सवय मोडली होती. मनातच चरफडलो.

दुसर्‍या दिवशी मला मेडीकल टेस्ट साठी एका टेस्ट सेंटरला जायचे होते. क्लायंटची तशी अटच होती. मी सकाळी टॅक्सी करून त्या सेंटरला गेलो. तिथे बर्‍याच गोर्‍या-गोर्‍या मुली भिरभिरत होत्या. एका मुलीने मला युरीन टेस्ट करायची आहे असे सांगीतले आणि एक बाटली हातात देऊन बाथरूममध्ये पाठवले. एका विशिष्ट खुणेपर्यंत लघवी भरून घ्यायची आणि फ्लश करायचा नाही असे त्या मुलीने बजावले होते. हा तर आपल्या डाव्या हातचा मळ म्हणून मी मस्त शिटी मारत कार्यभाग उरकून घेतला. हसत-हसत मी बाहेर आलो आणि बाटली एका ट्रे मध्ये ठेवून बाहेर येऊन बसलो. थोड्या वेळाने तीच मुलगी माझ्या नावाचा पुकारा करीत बाहेर आली. मी आत गेल्यावर तिने मला माझी बाटली दाखवली. मनात म्हटलं, ही पुन्हा मलाच काय दाखवते आहे माझी बाटली. मग तिने खुलासा केला. माझं बापुडवाणं सँपल तिने सांगीतलेल्या खुणेच्या खूप खाली रडवेल्या अवस्थेत हलत होतं. आता आली का पंचाईत! मला प्रश्न पडला; हे असं झालंच कसं? एरवी दुसर्‍यांना उधार सँपल देण्याची क्षमता असणारा मी आणि माझ्या बाबतीत अशी लाजिरवाणी गोष्ट व्हावी? तिथे बरेच सँपल्स मांडलेले होते आणि बहुतेक सगळे अगदी तुडुंब जरी नाही तरी व्यवस्थित भरलेले होते. भला उनके सँपल्स मेरे सँपल्स से इतने ज्यादा कैसे? कौन नळ का पानी पीते हैं रे ये लोग? त्या मुलीच्या चेहर्‍यावर थोडी काळजीची छटा उमटली. च्यायला, या पोरीला का एवढं टेंशन आलं असेल? मी माझा, सँपल माझं आणि टेंशन या कोमलिकेला? ये बहुत नाइन्साफी हैं. मी प्रश्नार्थक तिच्या चेहर्‍याकडे बघू लागलो. आधीचा माझ्याच बाटलीकडे बघतांनाचा अभिमानाचा भाव बदलून आता माझ्या ही चेहर्‍यावर चिंता उमटली.

मग त्या मुलीने मला माझ्या या नाकर्तेपणाचं कारण विचारलं. मला लख्खकन आठवलं; गेल्या ३५-३६ तासात माझं पाणी पीणं एकदम कमी झालेलं होतं. अगदी थोडं पाणी प्यायल्यामुळे मला माझ्या सँपलने दगा दिला होता. मी तिला हे संदर्भासहित आणि कारणासहित स्पष्ट करून सांगीतलं. तिने माझ्या या अपयशी सँपलची नोंद करून घेतली आणि मला दुसर्‍या दिवशी यायला सांगीतलं. पण क्लायंटला काय सांगणार? तसंही टेस्टचा निकाल आल्याशिवाय मला ऑफीस जॉईन करता येणार नव्हतं. मग टेस्ट करून घ्यायला उशीर का झाला याचं उत्तर काय देणार? इनसफिशिएण्ट सॅम्पल हे कारण सांगतांना आपल्याला कसे वाटेल याचा मी विचार करू लागलो. माझ्या डोळ्यासमोर माझा एखादा गोरा बॉस आणि मी बोलत आहोत असं दृष्य उभं राहिलं. आणि बॉस जर बाई (त्यातही सुंदर, आकर्षक) असेल तर काय होईल याचा एक लघुपट माझ्या डोळ्यासमोर तरळला.

"व्हॉट हॅपन्ड यु नो? लेट मी टेल् यु द फनी एक्स्पीरियन्स आय वेण्ट थ्रू लास्ट मॉर्निंग...आय वेन्ट टू द टेस्ट सेंटर फॉर द टेस्ट बट अनफॉर्च्युनेटली आय कुड नॉट डिलीव्हर द रिक्वायर्ड अमाउंट ऑफ...यु नो...द सँपल ऑफ...यु नो... अ‍ॅज पर देअर एक्स्पेक्टेशन्स. सो द यंग गर्ल देअर आस्कड मी टू कम द नेक्स्ट डे...यु नो...आय डीड नॉट गेट इनफ वॉटर ड्योरिंग माय ट्रॅवल्... हेन्स द प्रॉब्लेम्... हॅहॅहॅहॅहॅ..."

अगदी प्रोजेक्टाळलेल्या भाषेतलं असं स्पष्टीकरण इमॅजिन करून माझं मलाच हसू आलं. हे असं अजिबात चालणार नाही असा निश्चय करून मी पुन्हा त्या मुलीकडे गेलो. एखाद्या प्रेयसीकडे प्रेमाची याचना, भीक वगैरे मागावी त्याप्रमाणे मी माझ्या डोळ्यात अतीव कारुण्याचे भाव आणून तिला एक 'चान्स' मागीतला. अहो, म्हणजे पुन्हा सँपल देऊ देण्याविषयीची एक संधी मागीतली. ती हसली आणि म्हणाली, "यु थिंक यु विल बी एबल टू डू इट नाऊ?" मी आनंदलो. चला हिची तयारी आहे तर. मी अगदी मोठ्ठा होकार भरला आणि अंगात वीरश्री संचारावी त्याप्रमाणे पाण्याच्या फाउंटनकडे धाव घेतली. दुश्मनावर तुटून पडावे अशा ईर्षेने मी त्या पाण्याच्या नळकांडावर तुटून पडण्यास आतूर झालो पण ज्याप्रमाणे एखादा वीर तलवारीविना लढाई लढू शकत नाही त्याप्रमाणे मी पण निशस्त्र होतो. हाय, माझ्याकडे पेला नव्हता. हाता-तोंडाशी आलेला घास (की घोट?) मला घालवायचा नव्हता; पण नुसत्या हाता-तोंडाच्या मदतीवर विसंबून राहणे काही उपयोगाचे नव्हते. त्याने मला त्याक्षणी हवे असणारे प्रमाण नुसत्या हाता-तोंडाने मिळण्यासारखे नव्हते. मग एखाद्या पेटलेल्या योद्ध्याप्रमाणे इकडे-तिकडे बघू लागलो. एका नर्सबाईला माझी अडचण समजली आणि तिने मला तात्काळ एक कप आणून दिला.

मग मात्र मी कुणाचीही तमा न बाळगता घटाघट पाणी पिण्याचा सपाटा लावला. तिथे बसलेले २-३ गोरे माझ्याकडे डोळे विस्फारून बघू लागले. याला वेड तर लागले नाही ना असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर होते. पण मी थांबणार नव्हतो. आज मी या संधीचे सोनसँपल करूनच थांबणार होतो. मी जवळ-जवळ २५ कप्स पाणी प्यायल्यावर एका खुर्चीवर बसलो. १० मिनिटांनी मी पुन्हा पाणी प्यायला सुरुवात केली. पुन्हा १०-१२ कप्स पाणी पिऊन मी शांतपणे बसून राहिलो. आता मला फुल् कॉन्फीडन्स होता. माझी तयारी पूर्ण झाली होती. मी २०-२५ मिनिटे बसलो असेन आणि मला तीव्र जाणीव झाली की आता आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो. पण मी अजून थोडा बसून राहिलो. एकदा उठून १-२ कप्स पाणी अजून पिऊन आलो आणि आता मात्र मला 'सँपलकळा' यायला लागल्या. मी तात्काळ त्याच गौरांगनेला गाठले आणि आत्मविश्वासाने मी तयार असल्याचे सांगीतले. तिने मला पुन्हा एक बाटली दिली आणि सगळ्या सूचना रिपीट करून लढाईला पाठवून दिले.

१-२ मिनिटांनी मी विजयश्री खेचून आणल्याच्या अविर्भावात दरवाजा उघडून बाहेर आलो. माझ्या चेहर्‍यावर हसू फुललेले होते. विजयी वीराच्या आवेशात मी बाटली ठेवली आणि मोठ्या अपेक्षेने तिच्याकडे पाहिले. तिच्या चेहर्‍यावर कौतुकमिश्रीत हास्य पसरले आणि ती उद्गारली, "ओह, धिस इज सो मच मोअर दॅन रिक्वायर्ड्...गुड्...थँक्स!"

माझा जीव भांड्यात पडला आणि मी आनंदाने बाहेर पडलो. थोडं अंतर चालत नाही तोच मला पुन्हा एकदा जाणवले की आता पुन्हा एकदा वेळ आलेली आहे....पण जाणार कुठे? सार्वजनिक स्वच्छतागृहे, सुलभ वगैरे सगळं भारतात, इथे काहीच नाही. आता काय करावे. टॅक्सीने हॉटेलवर जावे तर पोहोचायला ४०-४५ मिनिटे तरी लागणार होती. च्यायला, कुठून एवढं पाणी प्यायलो...मग एका दुकानात शिरलो आणि तिथल्या एका माणसाला विचारलं. तो म्हणाला की पुढे एक पुस्तकांच दुकान आहे, त्या इमारतीमध्ये वॉशरूम आहे म्हणून. मी झपाझप पाऊले टाकत आत शिरलो. मला हे कळत नव्हते की ते सार्वजनिक स्वच्छतागृह असावे की त्या दुकानाचे खाजगी स्वच्छतागृह असावे. मी थोडा वेळ पुस्तके बघण्याचे नाटक केले आणि मग सरळ 'तिकडे' कूच केले. थोड्या वेळाने मला कळले की ते सार्वजनिकच होते आणि इथे स्वच्छतागृहे अशीच असतात. मग उगीच मी पुस्तके चाळण्यात वेळ दवडला असे वाटून मी बाहेर आलो. शेवटी पाणी देखील आपली काय काय रुपे दाखवेल याचा नेम नाही!

--समीर

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

सुधीर१३७'s picture

9 Mar 2010 - 4:53 pm | सुधीर१३७

मस्तच रे भौ................

.....हसून हसून मुरकुंडी वळाली................. =)) =)) =))

शुचि's picture

9 Mar 2010 - 5:04 pm | शुचि

मजेशीरच. लेख आवडला.
**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole

मदनबाण's picture

9 Mar 2010 - 5:15 pm | मदनबाण

जबराट !!! :)
मी माझा, सँपल माझं आणि टेंशन या कोमलिकेला?
खल्लास्स्स... :D

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2010 - 5:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))
किती लोकांना पाण्यात पहातो ना नाहीतर आपण!

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2010 - 5:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))
किती लोकांना पाण्यात पहातो ना नाहीतर आपण!

अदिती

जे.पी.मॉर्गन's picture

9 Mar 2010 - 5:41 pm | जे.पी.मॉर्गन

वर्णन...
शैली एकदम झ्याक्क !

जे पी

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2010 - 5:47 pm | स्वाती दिनेश

लेख मस्त..
स्वाती

सुरसुरीच भरली होती जणु त्या दिवशी.
चौकार, षटकारांची बरसात एकदम फट्याक लेख .खुप हासवलत . धन्यवाद.

दुबई स्थीत माझ्या मित्राचा आनुभव असा(उलटा) होता.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2010 - 6:04 pm | प्रकाश घाटपांडे

पानी प्यायच्या ऐवजी बियर पेली अस्ती तर कळा लवकर येतात असा अनुभव हाय!
बाकी तुमचे लेख झकास अस्त्यात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चिरोटा's picture

9 Mar 2010 - 6:34 pm | चिरोटा

धमाल अनुभव. =D> =D>
भारतातही काही लॅब्स असले टेस्टिंग जायच्या आधी करतात. स्टूल टेस्टिंग हा त्यातला सर्वात दळभद्री प्रकार होय.रेलिगेरच्या लॅब् मध्ये मी गेल्यावर मला ही टेस्ट त्याच दिवशी करावी लागेल म्हणून नर्सने सांगितले.बरेच जण आधीच 'सँपल' घेवून आले होते. नर्सने मग आम्हाला एका हॉटेलचा रस्ता दाखवला."तिकडे भरपेट खावून या आणि मग सँपल द्या"
भेंडी
P = NP

चतुरंग's picture

9 Mar 2010 - 6:50 pm | चतुरंग

भला उनके सँपल्स मेरे सँपल्स से इतने ज्यादा कैसे?
एकदम भारी! ;)

मला सँपल वगैरे काही द्यायचं नव्हतं पण माझीही अशीच गोची पहिल्यांदा आलो तेव्हा झाली होती. आणि नळाचं पाणी प्यावं लागलं तेव्हा "कसला हा देश साधं प्यायचं पाणी भरुन ठेवत नाहीत हाटेलातून?"
अश्शाच भावना आल्या होत्या मनात. पण नंतर ह्यांचं पाणी मी जोखलं आणि पुन्हा तोंडचं पाणी पळण्याचा प्रसंग आला नाही! ;)

(जलचर)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Mar 2010 - 6:54 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!!!

बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा's picture

9 Mar 2010 - 7:02 pm | मेघवेडा

छानच लिहिलंय समीरशेठ!!

सुंदर लेखनशैली!

>> एरवी दुसर्‍यांना उधार सँपल देण्याची क्षमता असणारा मी आणि माझ्या बाबतीत अशी लाजिरवाणी गोष्ट व्हावी
>>

आपली तुम्हाला कॉम्पिटीशन द्यायची तयारी आहे हं राव!

-- मुकुंद . राणे.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

श्रावण मोडक's picture

9 Mar 2010 - 7:47 pm | श्रावण मोडक

कुरकुरीत लेखन.

रेवती's picture

9 Mar 2010 - 7:49 pm | रेवती

मजेशीर लेखन!
'भला उनके सँपल्स.....' आणि अश्याच वाक्यांनी फार हसू आलं.
कालच आमच्या वार्षिक डॉक्टरीय तपासणीसाठी आम्हीही इथल्या 'विन्चेस्टर मेडिकल सेंटरला' जाउन आलो. बारा तास काहीही न खाता म्हणजे जरा जास्तच उपास घडलेल्या अवस्थेत सक्काळी लवकर गेलो. बाकी सगळं ठीक पण तिथली नर्सबाई फारच रक्तपिपासू होती.....अर्थात ही दरवर्षीचीच गोष्ट आहे. भरपूर पाणी पिण्याची आवड/सवय आहे त्याबद्दल आपले अभिनंदन!

रेवती

शुचि's picture

9 Mar 2010 - 8:55 pm | शुचि

ह. ह. पु. वा.
***********************************
“The war between the sexes is the only one in which both sides regularly sleep with the enemy”

प्राजु's picture

9 Mar 2010 - 10:22 pm | प्राजु

मस्त लिहिले आहे.
एकदम मजा आली वाचताना.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

सुमीत भातखंडे's picture

10 Mar 2010 - 12:11 am | सुमीत भातखंडे

मस्त.

शाहरुख's picture

10 Mar 2010 - 12:25 am | शाहरुख

गमतीदार लिखाण !!

'रोडट्रीप' चित्रपटातील एका चावट प्रसंगाची आठवण आली ;-)

डावखुरा's picture

10 Mar 2010 - 11:11 am | डावखुरा

छान....
"राजे!"

स्मिता श्रीपाद's picture

10 Mar 2010 - 11:36 am | स्मिता श्रीपाद

भारी लिहिलंयस रे समीर...
मज्जा आली वाचताना :-)

जरा नियमितपणे लिहित जा आता...

-स्मिता

दिपक's picture

10 Mar 2010 - 11:57 am | दिपक

खुशखुशीत लिखाण. मजा आली वाचुन.

(खुप पाणी पिणारा)- दिपक

झकासराव's picture

10 Mar 2010 - 12:16 pm | झकासराव

=))

पक्या's picture

11 Mar 2010 - 6:40 am | पक्या

मस्त खुमासदार लेखन. बर्‍याच दिवसांनी असं निखळ मनोरंजक वाचायला मिळालं. जागोजागी विनोदाची उत्तम पेरणी केली आहे. उगाच ओढूनताणून विनोदनिर्मिती केली नाही. भरपूर हसलो. धन्यवाद.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

तुका म्हणे's picture

11 Mar 2010 - 8:12 am | तुका म्हणे

सुरेख लेखन!
काही वाक्ये विशेष भिडली, उदा:
- एरवी दुसर्‍यांना उधार सँपल देण्याची क्षमता असणारा मी
- ती हसली आणि म्हणाली, "यु थिंक यु विल बी एबल टू डू इट नाऊ?" मी आनंदलो. चला हिची तयारी आहे तर.
- मला तीव्र जाणीव झाली की आता आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो

समीरसूर's picture

11 Mar 2010 - 9:09 am | समीरसूर

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

घाटपांडे साहेब,
बियरच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद! :-) पण मी बियर पीत नाही. पण अशा अडचणीच्या वेळी ट्राय करून बघायला हरकत नाही.

मेघवेडा,
कधी करायची काँपिटीशन? ;-)

स्टूल सँपलच्या बाबतीत असा प्रसंग घडणे म्हणजे डबल मजा! :-) पण त्यासाठी पेशन्स हवा. कारण खाल्ल्यानंतर रिजल्ट लगेच मिळेल याची शाश्वती नाही शिवाय 'चांगल्या' 'कसदार' रिजल्टच्या नादात अ‍ॅसिडीटी, अपचन, गॅसेस इत्यादी दुसर्‍यांना प्रदूषणाचा त्रास देऊ शकणार्‍या 'बाय्-प्रॉडक्ट्स' च्या निर्मितीच्या शक्यताही अधिक! पण थ्रिलिंग असणार हा ही अनुभव हे नक्की! ;-)

--समीर