जेहूटीनाक्थची कबर

चित्रा's picture
चित्रा in जनातलं, मनातलं
20 Nov 2009 - 11:18 am

अलिकडेच मॅसॅचुसेटस मधील म्युझियम ऑफ फाईन आर्टस मध्ये सहकुटुंब गेले होते. मला स्वतःला या म्युझियममध्ये जायला खूप आवडते. खरे तर सुटीच्या दिवशी घरी कोणी येणार नसण्याचे, किंवा बाहेर कुठे जायचे नाही आहे असे दिवस आमच्या वाट्याला सध्या कमीच येतात. अशा कुठच्यातरी दिवशी नुसतेच घरात कोंडून बसण्यापेक्षा बाहेर भटकून येण्यात गंमत असते. पण आमच्याकडे बाहेर पडायचे त्याआधी बाहेर हवा कशी असेल हे पहावे लागते. एक म्हणजे कडाक्याची थंडी किंवा पाऊस हे इथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेले आहे. शिवाय अशा दिवशी इतर कोणतीही कामे करावीशी वाटत नसल्यामुळे आणि सुटीचा पुरता उपयोग करण्याचा निश्चय केल्यामुळे काय करायचे त्याचे पर्याय तसे फार कमी असतात -घरातल्या पसार्‍याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, नुसतेच घरात टीव्हीसमोर बसून राहणे, कोणालातरी फोनवर गाठून कुठच्यातरी विषयावर चकाट्या पिटणे, किंवा मसंवर ढिम्म काहीही चाललेले नसताना सवयीने उगाचच शंभरदा ये जा करणे; किंवा दर दहा मिनिटांनी "आई, आय अ‍ॅम बो अर्ड" असे ऐकणे याखेरीज काही होत नाही. शिवाय थंडीच्या दिवसातला लवकर पडणारा अंधार पडल्यावर कोणतेही काम न केल्याचा शीण आणि अपराधी भावना आल्याने झोप येते ते वेगळेच ;) त्यापेक्षा या म्युझियमवारीमध्ये मजा असते. आणि पाऊस किंवा थंडीच्या दिवशी बाहेर जाऊन उगाच कुडकुडण्यापेक्षा छान उबदार म्युझियममध्ये फिरणे मला अधिक प्रिय आहे.

या म्युझियममध्ये तसे आम्ही आजवर अनेकदा गेलो आहोत, पण दरवेळी गेल्यानंतर काहीतरी नवीन सापडते असा अनुभव आहे. आणि खरे तर बघायला, समजून घ्यायला इतके काही आहे, की त्यासाठी एक दिवसही पुरत नाही. त्यामुळे असे बोनस मिळालेले दिवस म्हणजे एक पर्वणीच असते. त्यातही यंदा आकर्षण होते ते इजिप्तमधील ममींचे एक नवे प्रदर्शन भरवलेले असल्याने. खरे तर जाण्याआधी "ममी" आणि इजिप्त यावरून इतके काही बघून झाले आहे, की अजून नवीन काय बघणार असे वाटत होते. तरी आत गेल्यावर इतरही काही तरी बघू असे ठरवून गेलो.

म्युझियम चांगले भव्य आहे. निओ-क्लासिकल शैलीत बांधलेली ही मुख्य बिल्डिंग उघडते ती हंटिग्टन रस्त्यावर. या प्रवेशद्वारापाशी एक मोठे शिल्प आहे - खरेतर म्युझियमच्या विस्ताराच्या तुलनेत ते तसे लहानसे असल्याने पटकन नजरेत येत नाही. ते आहे एका "इंडियन" म्हणजे आपण ज्यांना "नेटिव्ह" अमेरिकन म्हणतो त्यांच्या एका घोड्यावर स्वार असलेल्या विराचे - सायरस डॅलिन नावाच्या शिल्पकाराने तयार केलेले. या शिल्पाचे नाव आहे "Appeal to the Great Spirit ". या शिल्पात वीर आणि घोडा एका जागी स्तब्ध आहेत, विराची मांड पक्की आहे, पण बहुदा संकटावर मात करण्याची शक्यता नाही, आकाशातल्या शक्तीकडून मदतीसाठी हात पसरले आहेत. घोड्याच्या चेहर्‍यावरही हे समजल्याचे काहीसे करूण आणि गंभीर भाव आणि तरीही आज्ञेसाठी टवकारलेले कान. हा पुतळा बघताना मनाची विचित्र स्थिती होते - एका बाजूला हंटिग्टन रस्त्यावरून गाड्या जोराने येत जात असतात, आपल्याला सध्याच्या काळाची जाणीव करून देत असतात आणि दुसरीकडे हा दुसर्‍या काळातला कोणतातरी क्षण असा स्थिर झाला आहे असे वाटते. वातावरणाचा परिणाम असेल, पण ईशान्येकडच्या या फॉलमधल्या गळणार्‍या लाल-पिवळ्या पानांच्या पार्श्वभूमीवर या एकट्या माणसाची आणि घोड्याची अगतिकता जास्तच गहिरी होते. अर्थात पहायला तेवढा वेळ दिला तर.

नाहीतर झपाझप फोटो घेत घेत इमारतीच्या या बाजूने आत शिरून दुसर्‍या बाजूने बाहेर पडणे कठीण नाही. खरेतर म्युझियमच्या दुसर्‍या बाजूने बाहेर पडतानाही अशीच दोन बाळांची दोन शिल्पे दिसतात - पण ही मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या शिल्पाहून अगदीच वेगळी. ही बाळे जमिनीतूनच उगवत आहेत, रोपे उगवावीत त्याप्रमाणे. ती अजून जमिनीतच आहेत, एक झोपलेले आणि एक जागे. जागे बाळ काहीसे घाबरून जगाकडे पाहते आहे असे वाटते. दुसर्‍या बाळाच्या तोंडावर एकदम गंभीर भाव आहेत जणू काही ते अजून स्वप्नातच आहे. किंवा त्याला डोळे उघडायचे नाही आहेत असे काही तरी. शिल्पे पाहणे आणि त्यांचे रसग्रहण करणे हा माझा प्रांत नाही, पण अशा शिल्पांनी कितीही दगड माणूस/बाई असली तरी आत कुठेतरी "हलेल" असे वाटते. आत जाताना ज्याने शिल्पे पाहिली आहेत त्याला ती कळली नाहीत तरी "न्यूट्रल" होऊन जाणे शक्य होणार नाही असे वाटते.

अर्थात मुलांना बरोबर घेऊन गेल्यावर असा हळवेपणाचा नूर फारकाळ टिकवता येत नाही, त्याचप्रमाणे झाले. आम्ही आत गेल्यावर लेकीने "इथे ममींखेरीज दुसरे काय आहे?" असा सूर लावला, तेव्हा "आपण मुळात इथे का आलो आहोत?" अशी आठवण करून देणे भाग पडले. शेवटी ममीज बघून झाल्या की इतर काही पहाण्याआधी मधल्या चौकात बसून काहीतरी खायचे या एका अटीवर लेक "ममी "पहायला तयार झाली. ह्याआधी आम्ही जेव्हा ममी पाहिली होती, ती म्युझियम ऑफ सायन्सच्या ऑपरेशन थिएटरला लाजवेल अशा खोलीत. दिव्यांच्या भरभक्कम प्रकाशात, एखाद्या ऑपरेशनला तयार असावी अशी ती "ममी "पाहून त्याबद्दलचे भितीमिश्रित आकर्षण नाहीसेच झाले होते. पण इथे आल्यावर त्या वेळी कमावलेल्या सिनीसीझमची जागा थोड्याश्या कुतुहलाने घेतली. आम्ही आत गेलो, तर एका अंधार्‍या खोलीत कुजबुजत, भिंतीवरची माहिती वाचत लोक पुढे पुढे चालले होते. त्या खोलीच्या मध्यभागी मंद प्रकाशात एक पुतळा हात छातीवर क्रॉस केल्याप्रमाणे धरून उभा होता. ह्या हातांमध्ये उच्च आर्थिक आणि सामाजिक स्थितीच्या निदर्शक अशा "अंख" नावाच्या वस्तू धरण्याप्रमाणे ही मृतदेहाच्या हातांची रचना केलेली असे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी इजिप्तमधील नाईल नदीच्या काठी राहणारा दर अल-बर्श येथील एक धनाढ्य "गव्हर्नर" जेहूटीनाक्थ आणि त्यांची पत्नी यांच्या मृत्युनंतर त्यांच्या ममी ज्या गुहेत ठेवल्या होत्या तेथे सापडलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन होते. इजिप्तमधील राजे आणि सरदार हे आपल्या मृत्युनंतर आपला मृत्युनंतरचा प्रवास तितक्याच इतमामाचा व्हावा, अशी काळजी घेण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळे या प्रवासात लागणार्‍या सर्व वस्तू, दागदागिने, भांडी, अन्न, कपडे, आणि इतर दरबारी इतमामाच्या वस्तू यात असत. परंतु याच कारणामुळे या गुहांतील वस्तूंकडे चोरांचे लक्ष जाते. अशाच काही चोरांनी जेहुटीनाक्थ आणि त्याच्या पत्नीच्या कबरीतील अशा मौल्यवान सामानाची चोरी करून आग लावली, त्यात एका "ममी" चे डोके तेवढे उरले होते, ते या चोरी आणि आगीपासून बचावलेल्या इतर वस्तूंबरोबर म्युझियममध्ये ठेवले आहे. पण इतर पुराव्यांच्या अभावी "ममी"चे मिळालेले डोके या प्राचीन दांपत्यातील स्त्रीचे आहे का पुरूषाचे (जेहूटिनाक्थचे) हे सांगता येत नाही असे कळले.

तरी या कबरीमधून चोरांपासून बचावलेले जे सामान उरले, त्यात अशा वस्तू मिळाल्या आहेत ज्या त्या काळातील इजिप्तमधील जीवनाचे चित्र समोर उभे करतात. या कबरींमध्ये सापडलेल्या विपुल अशा सामानामुळे, त्यावरील कारागिरीमुळे तत्कालिन इजिप्तमधील वैभवाची कल्पना येऊ शकते. अतिशय उत्तम सीडर किंवा तत्सम वृक्षांच्या लाकडाच्या शवपेटिका त्याकाळच्या कारागिरीचे उत्तम उदाहरण आहेत. ह्या पेट्यांचे लाकूड टिकाऊ, मजबूत असून त्यावर काळजीपूर्वक सुंदर चित्रे, आणि वचने कोरलेली असत. मेल्यानंतरही दिव्य चक्षू असतील अशी कल्पना करून की काय ही वचने ममीला दिसतील अशी आतल्या बाजूलाही रंगवली जात. ममीला बघता यावे यासाठी पेटीवर मोठे डोळे रंगवले जात. यातील वेगवेगळी वचने गंमतीशीर वाटली - "ए मॅन डझ व्हॉट ही विशेस इन दी लँड ऑफ दी डेड" - म्हणजे स्वर्गच. पण या कबरीचे खरे वैशिष्ट्य म्हणजे खेळणी वाटावीत अशी त्यांत सापडलेली त्या काळच्या इजिप्तमधील कारागिरांची आणि बोटींची लहान लहान लाकडी मॉडेल्स. या कबरीत सापडलेल्या विविध तर्‍हांच्या बोटी तत्कालिन इजिप्तमधील जलप्रवासाच्या प्रगतीची साक्ष देतात. विटा बनवणारे, सुतार, विणकर, स्वैपाकी, यांच्या लहान प्रतिकृती त्याकाळचे जीवन कसे असेल याचे चित्रच डोळ्यासमोर उभे करतात. त्यातही स्त्रिया आणि पुरूषांची कामे विभागलेली दिसून येतात. त्याकाळच्या केशरचनेचा, पेहरावाचा अंदाज बांधता येतो. या कबरी तयार करण्यामागे त्या काळच्या समाजाची प्रेरणा/गरज काहीही असो, पण त्यामुळेच आज चार हजार वर्षांनंतरही एवढे स्पष्ट चित्र उभे करता येऊ शकले, हे मात्र खरे.

हे सर्व सामान बघत आम्ही आतपर्यंत कधी गेलो कळलेच नाही. तेथे उरलेले डोके एका पेटीत ठेवले होते. ज्या माणसाने जिवंतपणी एवढे सगळे वैभव मिळवले त्याला असे पेटीत बघून जरा फिलॉसॉफिकल व्हायला होते, पण तरी जगण्यासाठी जे करायचे ते सगळे मनसोक्त करून झाल्यानंतर तो पेटीत गेला आहे हेही एक सत्य आहेच हेही झाले.
पण परत आमच्या कन्येने भूक लागल्याचे जाहीर करून सगळे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. त्यामुळे बाकी उरलेल्या वस्तूंची भराभर पाहणी करून आम्ही बाहेर पडलो.

(दुसरा भाग टाकण्याची इच्छा आहे, पण लगेच जमेल असे वाटत नाही; वरची छायाचित्रे फार देखणी आलेली नाहीत, :( पण इथे म्युझियमच्या संकेतस्थळावर छान छायाचित्रे मिळाली - http://www.mfa.org/tomb/afterlife.html

या छायाचित्रांच्या काही भागांवर झूम करता येते.).

इतिहाससमाजअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

20 Nov 2009 - 5:49 pm | श्रावण मोडक

इच्छा? लिहाच!

धनंजय's picture

20 Nov 2009 - 6:55 pm | धनंजय

लिहाच!

(जमेल तेव्हा जरा लांब प्रतिसादही लिहितो.)

सहज's picture

20 Nov 2009 - 7:43 pm | सहज

>दुसरा भाग टाकण्याची इच्छा आहे,

वेळ मिळेल तेव्हा जरुर लिहा. हा लेख वाचनीय.

प्रभो's picture

20 Nov 2009 - 8:46 pm | प्रभो

लिहाच!

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया's picture

22 Nov 2009 - 7:15 pm | अवलिया

लिहा बरं लवकर !

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Nov 2009 - 7:54 pm | अक्षय पुर्णपात्रे

चित्रा, माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
_________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

नंदन's picture

21 Nov 2009 - 12:55 am | नंदन

लेख आवडला, विशेषकरून इंडियन वीराचे आणि लहान बाळांच्या चेहर्‍यांच्या शिल्पांचे वर्णन. पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

22 Nov 2009 - 3:04 am | Nile

असेच म्हणतो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

निखिल देशपांडे's picture

23 Nov 2009 - 11:20 am | निखिल देशपांडे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्राजु's picture

21 Nov 2009 - 9:08 am | प्राजु

चित्रा ताई, छान लिहिले आहेस गं.
पुढचा भाग लिहीच.
चित्रेही छान आहेत.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2009 - 7:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन माहितीपूर्ण आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

21 Nov 2009 - 11:24 pm | चित्रा

प्रतिसादांबद्दल आणि दुसर्‍या लेखातील "इंटरेस्ट" बद्दल सर्वांचीच आभारी आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Nov 2009 - 2:00 pm | बिपिन कार्यकर्ते

चित्राताई, लेख अप्रतिम. खेळकर पण वाचकाच्या मनाची पकड घेणार्‍या सुरूवातीपासून, ते 'पेटीत गेला पण जगताना जे करायचे ते सगळे करून गेला' हे भान फिलॉसॉफिकल झाल्यावरही ठेवून केलेल्या शेवटापर्यंत... सगळेच आवडले. तो वीराचा पुतळा डोळ्यासमोर उभा केला.

असेच अजूनही बरेच काही वाचायला आवडेल. म्हणजे, तुम्ही लिहा ही विनंतिवजा मागणी.

बिपिन कार्यकर्ते

प्रदीप's picture

25 Nov 2009 - 7:27 pm | प्रदीप

लेख नुसता माहितीपूर्णच आहे असे नव्हे, तर संवेदनशील मनाचे प्रतिबिंबही त्यात आहे. बाळांची शिल्पे, घोडा व स्वार ह्यांची शिल्पे ह्यांची वर्णने आवडली, तसेच इजिप्तमधील पुराणकालीन मॉडेल्सचे वर्णनही.

इजिप्तमधील राजे आणि सरदार हे आपल्या मृत्युनंतर आपला मृत्युनंतरचा प्रवास तितक्याच इतमामाचा व्हावा, अशी काळजी घेण्याचा प्रयत्न करीत. त्यामुळे या प्रवासात लागणार्‍या सर्व वस्तू, दागदागिने, भांडी, अन्न, कपडे, आणि इतर दरबारी इतमामाच्या वस्तू यात असत.

'ना हाथी है, ना घोडा है, वहाँ पैदल ही जाना है' हे त्यावेळी लागू होत नव्हते, बहुधा :)

मदनबाण's picture

22 Nov 2009 - 9:32 pm | मदनबाण

मस्त लेख... :)
दुसरा भाग टाकण्याची इच्छा आहे, पण लगेच जमेल असे वाटत नाही;
चित्रा ताई आम्हाला पण दुसरा भाग वाचायची इच्छा आहे.तेव्हा टंकन कष्ट घेणे.

(ममी च्या शापाला घाबरणारा)... :S
मदनबाण.....
The Mummy's Curse
http://www.touregypt.net/featurestories/curse.htm

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Nov 2009 - 9:03 am | llपुण्याचे पेशवेll

चित्राताई छान माहितीपूर्ण लेख. आवडला. मलाही म्युझियम पहायला आवडतात. पण बरोबरच्यांमुळे मनाला मुरड घालून पुढे जावे लागते. तुम्ही केलेले प्रेझेंटेशनही खासच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

चतुरंग's picture

23 Nov 2009 - 9:12 pm | चतुरंग

मी एकदाच गेलोय म्यूझिअम ऑफ फाइन आर्ट्सला. तो इंडियन वीराचा पुतळाही इथे चित्रात बघितला तेव्हा मला पुन्हा आठवला. आता पुन्हा एकदा जायला हवे जेहूटिनाक्थ्ची कबर बघायला.

(स्फिंक्स)चतुरंग