इंटरप्रीटींग ऑब्झर्वेशन्स- ब्लॅक-बॉक्स

अजय भागवत's picture
अजय भागवत in जनातलं, मनातलं
14 Nov 2009 - 10:10 am

आय-टीवाल्यांना ब्लॅक-बॉक्स ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. सॉफ्टवेअर टेस्टींग वाल्यांनातर जास्तच!

कल्पना करा की, ह्या गोष्टीतल्या व्यक्तिला एखादी भेट मिळते व त्या भेटीचे रंगीबेरंगी, झगमगीत कागदाने सजवलेले खोके त्याने उघडता क्षणी त्यातून एक स्प्रिंगवर लावलेला छोटा ब्लॅक-बॉक्स झूपकन बाहेर येतो. त्यावर लिहिलेले असते "मला दणका द्या". व त्यावर दोन छोटे दिवे असतात- एक लाल व दुसरा हिरवा.

दचकून झाल्यावर कुतूहलमिश्रीत भीती-आश्चर्याने तो त्यावर हळूच एक टिचकी मारतो. त्या ब्लॅक-बॉक्समधून एक धून ऐकू येते, त्याच्या नोट असतात- "क ख ग घ, क, ख, ग, घ" व लाल दिवा लागतो. तो दुसरी टिचकी मारतो, दिवा हिरवा होतो व आवाज येतो, "ट, ठ, ड, ढ, ट, ठ, ड, ढ". त्याची भीड चेपते व तो थोडी जोरात टपली मारतो. आता त्यातून आवाज येतो, "त, थ, प, फ, म, न, य, र, ल, व". ही धून आधीपेक्षा जास्त लांब असते. आता त्याच्या भीतीचे रुपांतर पुर्णपणे कुतूहलात झालेले असते व त्याला त्याची मजाही वाटते. दरवेळी टपली मारली की, दिवा बदलतो व धून बदलते. त्याला कळते की, ह्यात अधिक काही मजा उरलेली नाही आणि त्याला वाटते की ह्यात निश्चीत असा काहीही क्रम नाही. आणि ती व्यक्ति त्या ब्लॅक-बॉक्सशी खेळणे थांबवते. पण झाल्याप्रकारावर विचार मात्र चालू राहतात.

तेव्हढ्यात त्याला एक मित्र भेटतो, तो विचारतो, "काय चालले आहे?". तो सांगतो.
मित्र, "बघू, मी ही पाहतो." मित्र तो ब्लॅक-बॉक्स घेऊन काही स्वतःची निरिक्षणे नोंदवतो. "तू जे म्हणतो आहेस, ते चूक आहे. ह्यात तीन नव्हे, दोनच धून आहेत."
तो, "अरे, असे कसे म्हणतो तू, मी त्या ब्लॅक-बॉक्सशी चांगला तासभर खेळलो आहे".

त्यांचा वाद चालू असतांना, आणखी एकजण येतो (ह्याला आपण आगंतूक म्हणू), त्यांचा वाद ऐकतो, व म्हणतो, "तुझे म्हणणे बरोबर आहे, त्यात तीन धून आहेत. पण, तिसरी धून ८ नव्हे, पाचच नोटची आहे".
आधीचे दोघे, "तुला कसे माहित?"
आगंतूक, "हा ब्लॅक-बॉक्स मीच बनवला आहे, तो एक म्युझिक-बॉक्स आहे".
"म्युझिक-बॉक्स?, ह्या! हा काही म्युझिक-बॉक्स नव्हे"
आगंतूक, "मी हा म्युझिक-बॉक्स बनवला आहे. मी त्याला म्युझिक-बॉक्स असेच म्हणतो. आणि तो काही साधा-सुधा म्युझिक-बॉक्स नाही."
आपल्या गोष्टीतील नायक म्हणतो, "हे बघ, मी त्या ब्लॅक-बॉक्सशी चांगला तासभर खेळलो आहे आणि मी काही निरिक्षणं नोंदवली आहेत...."
नायकाला मधेच तोडत आगंतूक पुढे म्हणतो, "मला मधेच थांबवू नकोस. तू निरिक्षण केले आहेस म्हणजे तुला त्यातले सगळे कळले आहे असे नव्हे".
मित्र, " हे पहा, तुम्ही दोघेही गप्प बसा. तू जरी निरिक्षक असलास, आणि तू जरी त्याचा निर्माता असलास तरी मी एक भौतिकशास्त्रातील द्विपदवीधर आहे व मी तुम्हाला आता प्रयोगाने सिद्ध करुन दाखवतो की, त्यात दोनच धून आहेत".
आगंतूक, "तसे जर झाले तर नक्कीच मी म्हणेन की, तुम्ही त्या ब्लॅक-बॉक्सला टपला मारुन तो बिघडवून टाकला आहे".
"अरे, पण तूच तर त्यावर लिहिले आहेस की, ’मला दणका द्या’".
आगंतूक, "त्याचा असा शब्दशः अर्थ घेऊ नका. त्याचा असा अर्थ आहे की, माझ्यावर जोरात ओरडा. तुम्हाला आपल्या राजाचे ते प्रसिध्द वाक्य माहिती आहे ना? (गोष्ट वाचणाऱ्यांनो, असे गृहीत धरा की, त्यांच्या राजाचे असे एक प्रसिद्ध वाक्य असते की ज्यात तो ’मला दणका द्या’ असे म्हणतो. त्यातून राजाला असे सुचवयचे असते की, काही बदल हवा असल्यास जोरात ओरडा; तसे केल्याने मी काहीतरी बदल करेन.) त्याचा वापर मी येथे केला आहे. तुम्ही ओरडून पहा; धून बदलते की नाही हे तुम्हाला कळेल."

नायक आणि मित्र दोघेही चाट पडतात. त्यांनी हा त्या सुचनेचा गर्भितार्थ लक्षातच घेतलेला नसतो. तरीही त्यांचे मन काही त्या आगंतूकाच्या ह्या नव्या अर्थाला मानायला तयार नसते कारण एखाद्या निरिक्षणाबद्दल असे वेगळा अर्थ असलेले भाष्य कोणी केले की, आपले मन ते सहजा-सहजी स्वीकारत नाही.

आगंतूक त्यांना सांगतो की, त्यात तीन धून आहेत. हे त्या भौतिकशास्त्रवाल्या मित्राला पटवून घेणे जड असते कारण त्याने दोनच धून ऐकलेल्या असतात. पण ते होण्याचे कारण म्हणजे, त्याची श्रवणशक्ती त्याला दगा देत असते.
तरीही भौतिकशास्त्रवाला आगंतूकाला म्हणतो, "ठिक आहे, तीन तर तीन. पण ते दिवे?- त्याचे काय काम?"
आगंतूक, "दिवे? कसले दिवे?"
भौतिकशास्त्रवाला, " ते नाहीत का, लाल आणि हिरवा?"
आगंतूक, "ओहो, ते होय!, ते फारसे महत्वाचे नाहीत. त्यांच्यापैकी कोणताही एक दिवा लागला तरी ठिक. त्याचा ह्या म्युझिक-बॉक्सशी फारसा संबंध नाही."
भौतिकशास्त्रवाला, "तरीही, हे बघ, लाल दिवा नेहमी काहीतरी धोका दाखवण्यासाठी वापराण्याचा प्रघात आहे. मी नेहमी माझ्या प्रयोगशाळेत ह्या नियमाचे पालन करतो. मी हिरवा दिवा नेहमी "सगळे काही ठिक" अशा अर्थाने वापरतो. तू ही असा संदर्भ घ्यावास असे वाटते."

आणि मग आता ब्लॅक-बॉक्स की, म्युझिक-बॉक्स आणि त्यात किती धून आहेत, त्यात किती स्थिती आहेत हा सगळा मामला स्पष्ट होतो. आगंतूक हाच त्या म्युझिक-बॉक्सचा निर्माता असतो त्यामुळे त्याने ज्या कल्पना वापरुन तो म्युझिक-बॉक्स बनवलेला असतो त्या इतरांना स्पष्ट कळतात. तो म्हणतो की, ह्या म्युझिक-बॉक्सकडे पाहून तुम्ही त्याच्या किती स्थिती आहेत हे ठरवण्याचा जो प्रयत्न केला होतात ते त्याला अपेक्षितही नव्हते. त्याच्या मते तो म्युझिक-बॉक्स त्याने फक्त एखादा ओरडला की, त्यातून तीन प्रकारापैकी एक अशी धून वाजेल अशीच सोय त्याने केली होती. त्यातून इतरांनी जो अर्थ लावायचा प्रयत्न केला तो त्यालाही नवीनच होता.

[आधारीत- इंटरप्रीटींग ऑब्झर्वेशन्स, इंट्रोडक्शन टू जनरल सिस्टीम्स थिंकींग, गेराल्ड विनबर्ग]

तंत्रप्रकटन

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

14 Nov 2009 - 6:38 pm | पाषाणभेद

ह्म्म... थोडक्यात ते मुझीक बोक्स चुकीचे बनवले गेले होते तर.

आमच्या भाशेत त्याला 'करायला गेलो गनपती आन झाला मारूती' आस म्हनत्यात.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)