Skip to main content

कविता

कधी किनारा लिहितो,किंवा...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 05/05/2017 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो! कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो! तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो! कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो! अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो! तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो! तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो! —सत्यजित
काव्यरस

दे बहाणे सोडुनी ...

लेखक संदीप-लेले यांनी गुरुवार, 04/05/2017 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
खास काही आजच्या भेटीत झाले आखरी कावरी झाली किती झाली किती ती बावरी भासवे नाजूक काही भावना या ना मनी सांगते सारे खळी जी लाजते गालावरी मान वेळावून पाही तो बहाणा लाघवी एकदा सारे अशी सारे तशी बट लाजरी ऐकण्यासाठी अबोला कोकिळा झाली मुकी बोलली नाही तरी पंचम तिच्या ओठावरी साधली संधी कशी तो वर्षला ग्रीष्मातही दे बहाणे सोडुनी ती लाज आता सावरी ... संदीप
काव्यरस

चकवा

लेखक रामदास यांनी गुरुवार, 04/05/2017 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी हरवलो आहे असं , माझं मला कळवूनच , मी गहाळ झालो आहे. last seen at 5.45 ही whatsapp वरची अफ़वा आहे . घरून निघताना निळा शर्ट घातला होता आणि घरात सगळे वाट बघत आहेत , ही पण एक आवईच आहे . एसटी स्टैंड वर आणि स्टेशनच्या मुतारीत पोस्टर दिसलेच तर कळवा , मलाच कधीतरी. मी हातचा एक होतो त्या घरालाच, मी एक चकवा दिला आहे . रात्रीच्या खर्जात प्रेम सेवा शरण गाणारं , माझंच बेमालूम version 2.0 वगैरे असंच काहीतरी आहे , believe me वगैरे कशाला ?? मी हरवलोच आहे .
काव्यरस

जीत्याची खोड

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 30/04/2017 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
समोरून येत आहे ती व्यक्ति . . वर्णाने जातीने धर्माने शक्तीने विचाराने हुद्याने कर्तुत्वाने ऐपतीने . . काळी का गोरी? . अरे ! हा तर यमदूत !
काव्यरस

मैत्रि...

लेखक DTPS यांनी रविवार, 30/04/2017 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते कधि हसून तर कधि मुक्त रडून ति कुलवायची असते गरज नाही रोजच भेटले बोलले पाहिजे पण मनापासुन एकदा तरि आठवण काढायची असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते... कोण आपले कोण परके हे भेद मैत्रित विसरायचे असते सगळ्यांना सोबत घेऊन जगायचे असते भांडण रुसवे फुगवे आनंदाने उपभोगायचे असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... फायद्या तोट्याला इथे किंमत नसते सगळी गोळा बेरीज शेवटि शून्यच असते हेवे दावे सारे काही इथे गौंन असते मैत्री हि नाजुक फुला सारखी जपायची असते.... आयुष्याच्या शेवटी हि मैत्रिचि कुपी अलगद उघडायची असते आठवणींच्या रम्य स्वप्नात सैर करायची असते

ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 30/04/2017 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा... का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा! मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा! आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा! काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती? ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! —सत्यजित

ऐसी काये केली करणी काय जाणो

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 29/04/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
ऐसी काये केली करणी काय जाणो तुझे तुज जाणों काय जालें ।। छन्द ऐसी गोडीं सगुणाची आवडी भक्तिचिच गुढी आनंदाची ।। निर्गुणाचे ध्यानी ब्रह्मभाव खाणी रूप तुझे मनी नूरे परि ।। नको आम्हा देवा निर्गुण करणी तुझेनि चरणी वेध लागे ।। मोहलो सावळ्या टाळ अन चिपळ्या धुंद देत टाळ्या गजरी तुझे ।। सागरलहरी

शेक्सपिअरचे “यक्ष”गान

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 27/04/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
"द टेम्पेस्ट –(झंझावात)". भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक. त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं. त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी. त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान. या नाटकात “एरियल” नावाचा एक यक्ष आहे. समुद्री झंजावातात नष्ट झालेल्या जहाजात आपला पिता मृत्यू पावलाय अशी समजूत झालेल्या नेपल्सच्या राजपुत्राचे सांत्वन करताना हा यक्ष ही कविता म्हणतो. ही कविता म्हणजे केवळ सांत्वन नाही.

कास्तकारी :(

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 25/04/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाऊस येईन रोजच वाटतं वाट पाह्यता पाह्यता डोळ्यात पाणी दाटतं मळ्यातल्या विहरीपरी मनबीन आटतं जमिनीतल्या भेगांसंगं उर महं फाटतं चिंबओल्या वावराचं स्वप्न पहा वाटतं कुटका गिळून पडल्यावर झोपाच कुठं वाटतं कर्जाच्या ओझ्यानं सम्दं गणित हुकतं घरगुती चिंतायनं स्मशानगाव पेटतं कास्तकारी करणं आता पाप केल्यावानी वाटतं बैलावानी मलेबी मरून जा वाटतं

सुगंध

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 25/04/2017 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
या ओंजळीतून त्या ओंजळीत फुले सहज निघून जातात... उरल्या सुगंधाचे अत्तर फुलांच्या आठवणीत दरवळत राहते! -शिवकन्या
काव्यरस