अगदी सकाळची वेळ, अंदाजे साडेपाच ते पावणेसहा. मला जाग आलेली होती, पण अंथरुणात लोळत, परत एकदा अनावश्यक सुलतानी झोपेच्या प्रतिक्षेत होतो. तेवढ्यात कानावर खड्या, खणखणीत आवाजात घराच्या बाहेरून एक लकेर ऐकू आली.
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
भजन ओळखीचे होते, पण लावलेली चाल ओळखीची नव्हती आणि भजनाला दिमडीचा ठेका धरलेला होता. मी बिछान्यातून ताडकन उठून कोण गातंय, बघायला बाहेर आलो तर शेजारच्या सोसायटीच्यासमोर एक नाथपंथी जोगी भजन म्हणंत उभा होता.