रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?)
गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली.
कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं.