Skip to main content

मुक्त कविता

विस्कळखाईत कोसळताना

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 08/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
रेणुबंध होतील खिळखिळे खळकन् फुटतील ठाशीव साचे हादरून जातील स्तंभही तर्काच्या भक्कम इमल्यांचे गाभ्यातून जर्जर पृथ्वीच्या लाव्हारस येईल उधाणून अगणित जीवांचा कोलाहल उरेल भवतालाला कोंदून विस्कळखाईत कोसळताना असेच काही घडेल? किंवा, विज्ञानाचे ज्ञात नियम मग वागतील वेगळेच तेव्हा?
काव्यरस

सुटका नाही

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 11/06/2021 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या प्रश्नांना नसते उत्तर तेच मला खुणविती निरंतर अज्ञेयाच्या पल्याडून कुणी म्हणते,"यातून सुटका नाही" तीन मितींची अभेद्य कारा तिचे दार किलकिले उघडुनी बघती प्रतिभावान थोडके तेही म्हणती,"सुटका नाही" तुंदिलतनु तुपकट ध्येयांची हाक ऐकुनी डळमळते मन उनाड भटकी पायवाट मग खेचून म्हणते,"सुटका नाही"
काव्यरस

देव

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 05/05/2021 या दिवशी प्रकाशित केले.
देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध तो अन्नात आहे, उपवासात नाही. देव दानशूर मोठा, लाचार नाही न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही. देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे. देवही भक्त आहे, भावाचा भुकेला देव नाही खजिनदार-पुजारी. देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे देव दाढीत नाही, शेंडीतही नाही. जीवन देव आहे, मृत्यूही तोच प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे. देव म्हणजे गंभीर गोष्ट माणूस त्याची गंमत करतो. गुलाबजाम जणू पाकातला हलवायाची व्याख्या करतो. देव म्हणजे साधा माणूस जरा अधिक जरा उणा. देव म्हणजे तुम्ही-मी आपल्या आईच्या नजरेतले.

सवय

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 30/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून हाकारणार्‍या अनघड कल्पनांची वास्तवाच्या धगीत कापूरवाफ होताना बघण्याची आता सवय करून घेतोय मास्कावगुंठित श्वासात अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध ऊरफोड भरून पाऊसगाणे गाण्याची आता सवय करून घेतोय हताशेच्या महासाथीची "न"वी लाट सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने नेस्तनाबूत होईलच हे स्वत:ला वारंवार पटविण्याची आता सवय करून घेतोय
काव्यरस

चक्कर

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 29/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न आयुष्याचा असतो उत्तर असते आयुष्याचे. आपण निव्वळ कोरे कागद नशीब छपाईच्या कामाचे. शब्दांना का कळतो अर्थ लिहिणाऱ्याच्या मनातला? अर्थ कोणता जीवनाला मग जन्म देत असे अज्ञातातला. मृत्यू म्हणजे शेवट कसला? पितरांच्या शांतीत काकही फसला. अनुभवाचे गाठोडे सोडून वर्तमानावर भूतकाळ हसला. विश्वाचे मुळ गूढ भयंकर सोबत नाही एकही शंकर. अंधाराला शोधीत भास्कर पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!

कबुलीजबाब

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
रोज तो जुळवून अपुली एक कविता ठेवतो वृत्त-मात्रा-अर्थ-लय- -छंदात निशिदिनी रंगतो जे न दिसते रविस तेही मिटून डोळे पाहतो काव्य अन् शास्त्रामधे तो क्षण नि प्रतिक्षण डुंबतो कल्पनांचे भव्य इमले सुबकसे तो बांधतो (मी तयांची द्वारपाली आपखुशीने निभवितो) विविध प्रश्नांचा तुम्हाला अटळ छळ जो जाचतो मात त्याला देऊनी तो मिति-दिशा ओलांडतो शब्द धन वाटून अविरत थकून कधि तो थांबतो (मी ही त्या दुर्मिळ क्षणाची वाट गुपचूप पाहतो) आजवर कोणा न कथिले तेच आता सांगतो कल्पना उचलून त्याच्या मीच कविता प्रसवितो
काव्यरस

या अशा कुंठीत वेळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 03/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
एकही कविता आताशा काळजाला भिडत नाही शब्द मोहक विभ्रमांनी  भ्रमित आता करीत नाही कोरडा असतो किनारा  लाट फुटते मत्त तरिही जखम होते खोलवर पण  रक्त आता येत नाही प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,  बीजअक्षर श्रांतलेले भंगलेल्या देवतांना  आळवूनी भ्रष्टलेले मार्गदर्शी ध्रुव अन्  सप्तर्षी आता लोपलेले दीपस्तंभांचे दिवेही  भासती मंदावलेले या अशा कुंठीत वेळी दाटुनी येते मनी विफलता, जी रोज उरते  रोमरोमा व्यापुनी एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी
काव्यरस

अंतर्नाद

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 27/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
अमूर्ताचा अंतर्नाद अक्षरांच्या कपारीत शब्दाशब्दाच्या घळीत ओळीओळीत गुंजला अमूर्ताचा पायरव हलकेच जाणवता अनाहत तरंगांनी डोहडोह डहुळला अमूर्ताचा पोत कसा अमूर्ताचा पैस किती अमूर्ताचा डंख कुठे विचारत विचारत अणुरेणू झंकारला
काव्यरस

खिडकी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 19/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजावरचा निळसर पर्वत कातळमाथा ढगात घुसळत भूशास्त्राला कोडी घालत खोल ठेऊनी लाव्हा धुमसत पुरातनाचे सूक्त गुणगुणत नभरेषेवर उंच उसळुनी दिसे अनाहूत माझ्या खिडकीत निळे पाखरू पहाटफुटणीत पंखभिजवत्या दवास झटकत चोच मुलायम पिसात फिरवीत पंखांतील अचपळ बळ जोखीत साद घालुनी अधीर, अवचित नभांगणाला उभे छेदुनी उतरे अलगद माझ्या खिडकीत आखीव रेखीव खिडकी चौकट निळ्या नभाचा कापुनी आयत इंद्रजाल निळसर पसरवुनी जड चेतन द्वैताला मिटवीत

ते तुझ्याचपाशी होते

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 13/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळत्या झाडावरती किलबिलणार्‍या पंखांनी आणले नभातून जे जे ते तुझ्याचपाशी होते अर्थाचे अनवट कशिदे विणणार्‍या चित्रखुणांना जे जटिल असूनही कळले ते तुझ्याचपाशी होते तार्‍यांच्या मिथककथांचा आकाशपाळणा अडता जे पुरातनाला सुचले ते तुझ्याचपाशी होते
काव्यरस