सरस्वती ... एक लोकमाता
सरस्वती लुप्त होऊन हजारो वर्षे झाली. हिमालयात उगम पावून हरियाना, पंजाब, राजस्थान,गुजराथ मधून वहात जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळणारी सरस्वती, ऋग्वेदात जिचे रम्य वर्णन केले आहे, एके काळी जिचे पात्र ८-१० किलोमीटर रुन्द होते, जिच्या काठावर भारतातील सर्वात पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत , अशी सरस्वती आज मात्र तुम्हाला पहावयासही मिळत नाही. तिच्या पाण्यावर आज तुम्ही शेती करू शकत नाही. तिच्या लेकरांची तहानभूक ती आज भागवू शकत नाही. भूगर्भातील उत्पातामुळे तिचे पात्र आटले पण तिचे प्रेम मात्र आजही आटलेले नाही. आजही ती भारताला सुजलाम्-सुफलाम् करावयास आसुसलेली आहे.