मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायऱ्या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र.
बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३...!