राजभाषेचा साज असलेला मुकुट डोक्यावर लेऊन मंत्रालयासमोर ताटकळणाऱ्या माय मराठीचे गेल्या आठवड्यात चहूदिशांनी धिंडवडे निघाल्याने मराठीचा अवस्था आणखीनच केविलवाणी झाली आहे. शेकडो निरपराधांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजमल कसाब न्यायालयात मराठीतून बोलला, याचा अभिमान वाटावा, की महाराष्ट्राच्या राजधानीतदेखील मराठीचे केवळ कामचलाऊ ज्ञान पुरेसे आहे, असा घूमजाव पवित्रा घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची कीव करावी, अशा दुहेरी संकटात महाराष्ट्राची माय मराठी सापडली आहे.