Skip to main content

कविता

कविता — मिसळपाववरील मराठी कवितांचा विशाल संग्रह. प्रेम, निसर्ग, समाज, विरह आणि जीवनानुभव यांवरच्या हजारो मराठी कविता, गझल, मुक्तक आणि चारोळ्या येथे वाचा व आपली कविताही प्रकाशित करा.

जॅझ जुगलबंदी

लेखक धनंजय यांनी शनिवार, 05/04/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.

सॅक्सोफोन आणि ड्रमची जुगलबंदी

सॅक्सोफोन-ड्रमच्या जुगलबंदीमध्ये
कोणी प्रमुख कलाकार नाही
कोणी सहायक कलाकार नाही

जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्ये
गती आणतो,
त्याच्या सुरांत मध ओघळतो -
तो गोफ विणतो
हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये.
ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला,
आणि मानतो आपल्या भाग्याला -
सॅक्सोफोनच्या भरारीमागचे
स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले.

मोजणी

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी गुरुवार, 03/04/2008 23:46 या दिवशी प्रकाशित केले.

हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही
मीही चुकून तेथे कोणास नेत नाही

ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे
निसटून काळ गेला हातात येत नाही

बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही

मी श्वास घेत आहे की भास होत आहे ?
काळीज धडकल्याचा आवाज येत नाही

आश्वासने जरी ते देऊन काल गेले
परतून भेटण्याला कोणीच येत नाही

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही

मला आवडलेली कविता

लेखक प्रगती यांनी गुरुवार, 03/04/2008 17:33 या दिवशी प्रकाशित केले.

उडत्या पाख्ररांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरटयाचे काय आहे
बांधता येईल केव्हाही
नजरेत सदा क्षिति़ज्यांच्याही
पलिकडे झेप घेण्याची
जिद्द असावी.

मिसळाख्यान

लेखक शैलेश यांनी बुधवार, 02/04/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.

जय जय मिसळपावा । तूझी किर्ती अमर्यादा ।
गुणानुक्रम तुझे वर्णीता । विद्वज्जनही थकती ।। १ ।।
टोपीकरांचा* प्रभाव पडूनी । कैसे कैसे जन वर्तती ।
चिंताक्रांतले थोर ज्ञानी । अंतराळी सभेसी ।। २ ।।
इतालियन चायनीज भक्षती । नटमोग-या मालिका बघती ।
आणिक मिरवती फ्याशनी । तयांसी शहाणे करावे ।। ३ ।।
मजसी तेथ पाचारण करोनी । मिसळीचे गुण वर्णुनी ।
वेवस्थित काव्य रचोनी । मिसळपावी प्रकाशना सांगितले ।। ४ ।।
त्यांची आज्ञा शिरोधर । मी तो केवळ आज्ञाकार ।
कवितेचा गंधही ना ठाव । परि प्रयत्न करीतो ।। ५ ।।
अहो ही मिसळ अलौकिक । तेणे साधली ओवी मज ।

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/04/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.

तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो
माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो?
तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब
पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे?

हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल
फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल
अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल
पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे !

कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात
अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात
मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात
पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे !

आयुष्य

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/04/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.

आयुष्य म्हणजे काय असतं
देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....?
खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं
माणूसपण जोपासायचं असतं
दुसर्‍यांना हसवत स्वतःही फुलायचं असतं
पहाटेच्या दवबिंदूत नहायचं असतं
प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं
रातराणीच्या झुळुकांनी मोहरायचं असतं
चंद्राच्या साक्षीनं बहरायचं असतं
निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं
स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं असतं
मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 31/03/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :)

कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती.