तडकलेली स्वप्न काच
तडकलेली स्वप्न काच
पायात् रुतलेली
अन पाऊल पुढं टाकता टाकता
माझी मी खचलेली
एक फ़र्लांगभर दूर
एका मंदिरातला घंटानाद
ऐकुन ,पुन्हा
माजघरात रडत बसते
फ़ुटेस्तोवर ऊर
मापं ओलांडल्याच्या
पाऊलखुणा
अजुनही घाबरवतात
थोडी जरा मागे फ़िर
बजाऊन किंकाळतात
चौकटितल्या आत
एक देवघर
देवघरातली ज्योत
पाठीवर हात फ़िरवताना
सांगत असते.....बाईचं जिणं
असच असतं
मापाच कलंडण...
पैजणाच्या सुरात
शेवटपर्यत रुणझुणत असतच
श्वासातली काही नावं
अस्पष्टच हुंकारतात
ऐकुन न ऐकल्यासारखी
कानात धुसफ़ुसतात
कल्पी जोशी
मिसळपाव
पानावरच्या दवबिंदूपरी
सजते, निसटुनिया विरते
ऊन - सावली नाते अपुले
कधी हसते अन् कधी रुसते
कधी हिरवाईच्या मखमाली
भिरभिरते अन् बागडते
कधी काहिली, कधी होरपळ
कधी पेटुनी धगधगते
कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी
चमचमते अन् लखलखते
कधी गर्द अवसेच्या राती
काळोखातुन पाझरते
लडीवाळ कधी मोरपिसापरी
हळुच कानी कुजबुजते
कधी अनावर प्रपातापरी
दुमदुमते अन् कोसळते
कधी मौनाच्या बंद क्षणांनी
हिरमुसते अन् मुसमुसते
कधी शब्दांच्या पागोळ्यातुन
गहिवरते अन् रिमझिमते
विरहाच्या एकांती नाते
उष्ण आसवांनी भिजत