नवं शैक्षणिक वर्षं उजाडलं, आम्ही नोटीस बोर्डासमोर जमलो. बघतो तर लोचा! आम्हाला दिलेला वर्ग साक्षात जुन्या इमारतीत आणि नवे विद्यार्थी (नी) मात्र नव्या इमारतीत. ही फाळणी कुणालाच मंजूर नव्हती. काही लडीवाळ शब्दांची देवाण घेवाण झाली आणि सर्वांची पाऊले हॉलिवुड कडे वळली. हॉलिवुड म्हणजे आमच्या कॉलेजची मागची बाजू. मोठा नयनरम्य परिसर. ईमारतीच्या भिंतीलगत हिरवळ आणि काही शोभिवंत झाडं. अशोक, गुलमोहर आणि नारळाचे उंच वृक्ष. दुसर्या म्हणजे खाडीलगतच्या बाजूला सलग बांबूची बेटं. मधे पायवाट. टोकाला खाडी, डावीकडे वळलं की आमच्या नव्या इमारतीला वळसा घालून कला, वाणिज्य च्या इमारती आणि पुढे कँटीन.