आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा.
मोठमोठे नेते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन प्रत्यक्ष तिथं न जाता रिमोटनं करतात. अगदी ग्रामपंचायती ते अख्ख्या देशाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असतो. (महिला सरपंचबाईंचा रिमोट त्यांच्या नवऱ्याच्या हातात असतो.) आघाडी म्हणू नका,दल म्हणू नका, युति, गठबंधन, ब्रिगेड,सेना, काही म्हणू नका. प्रत्येकाला एक रिमोट असतो आणि तो भलत्याच कुणा माणसाच्या हातात असतो.