थंडी हा माझा आवडता ऋतू आहे,असं मी मागच्या लेखात म्हटलंच आहे. थंडीमध्ये आणखीही एक मज्जा असते. ती म्हणजे थंडीतली खाद्ययात्रा!
थंडीत सर्वात जास्त मजा असते ती हुरडा पार्टीत. मस्त एखाद्या शेतावर जायचं. शेतात मध्यभागी एक बेताच्या आकाराचा खड्डा खणलेला असतो. त्यात शेणाच्या गोवऱ्या, कोळसे,पेटते निखारे धगधगत असतात. कोवळी ज्वारीची कणसं तोडून ठेवलेली असतात. तिथला शेतमजूर एक बारीक पण मजबूत काठी त्या ज्वारीच्या कणसात खुपसतो आणि त्या शेकोटीत घालतो. सर्व बाजूंनी फिरवून फिरवून कणीस भाजतो. कणीस नीट भाजलं गेलं की ते बाहेर काढून हातावर चोळायचं , आणि कोवळे, भाजलेले दाणे खायचे.