लेखकवेल्लाभटयांनी गुरुवार, 05/11/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D
विडंबन वगैरे समजू नये.
मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे
त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे.
प्लीज रिस्पेक्ट दॅट.
लेखकविशाल कुलकर्णीयांनी शनिवार, 31/10/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हात अलगद सोडवून
तू जायला निघतेस
उन्हं डोक्यावर येतात
सावल्या ...
फेर धरून गोळा होतात
माझ्याभोवती !
वेशीपाशी तू थबकतेस
मनमोर नाचायला लागतो
"सावली मागेच राहिली रे"
तू कसंबसं हसून सांगतेस
सावलीचा हात धरून
पुन्हा चालायला लागतेस
तिच्या पदराचा शेव...
माझ्या छातीपाशी अडकलेला
तू तशीच....
नेटाने चालत राहतेस
कशाचं कौतुक करू ?
तिच्या ओढीचं ...
किं...
तुझ्या नेटाचं .... ?
विशाल
लेखकशिव कन्यायांनी गुरुवार, 29/10/2015 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!
इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला
हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
लेखकचुकलामाकलायांनी शुक्रवार, 23/10/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव?
संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… …
गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते
तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव…
जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली
दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव….
तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती
मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव…
ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे?
ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…
लेखकज्योति अळवणीयांनी बुधवार, 21/10/2015 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला कुणाला दुखवायच?
शब्दांच्या जाळ्यात अड़कायच?
थोड़ स्वतःत राहायच...
जगण सुंदर करायच!
निसर्ग... प्राणी... पक्षी असतात;
ते कुठे आपल्या भाषेत बोलतात?
स्वतःत ते मग्न असतात..
त्याचं जगण सुंदर करतात!
त्यांच्याकडून थोड़ शिकायच.
जगण्याला जीवन बनवायचं...
मात्र शब्दात न गुंतता...
आयुष्याला हिरवं बनवायचं!
लेखकवेल्लाभटयांनी बुधवार, 21/10/2015 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्यापुढे कोण झुकले बघा रे
कुणा बोलुनी कोण चुकले बघा रे
कुणी होत वाचाळ थयथय उगाच
कुणी शांत राहून ठेवीत जाच
कसे सिद्ध होईल श्रेष्ठत्व त्याचे
असे सैन्य नाठाळ ज्या राजियाचे
कृतीतून ठरते इथे कोण वाघ
मुखे बोंबलोनी करी काय सांग
एकीत असते रहस्य यशाचे
तुम्हाला महत्व न पटले अशाचे
तुम्ही स्वाभिमानात धन्य जहाला
तिथे एक चेहरा भुलवतो जगाला
असे वेळ हाती न वागा असे रे
कशाला करावे स्वतःचे हसे रे
इथे संधी सर्वांस आहे समान
भूतापरी हो जपा वर्तमान
जसा जन्मतः वाघ ना वाघ झाला
करोनीच हो दाखवा या जगाला
-अपूर्व ओक
ब्लॉग दुवा हा
लेखकशिव कन्यायांनी बुधवार, 14/10/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !
लेखकसुमित_सौन्देकरयांनी मंगळवार, 13/10/2015 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
तिथे थांबतोय
जिथे थांबायचं न्हवत
ठरवलं होत
मागे वळून पहायचं न्हवत
ती अंधार खोली
पुन्हा उघडतोय
मोडलेल्या फडताळात
स्वताला शोधतोय
सोफ्यावरली धूळ झटकून
बसून क्षणभर डोळे मिटलेयत
क्षणभरातच त्यांनीसुद्धा
चुकांची चलचित्र पाहिलेयत
जगाच्या वेगासोबत धावताना
मागे खूप काही राहून गेलय
कृत्रिम आनंदाच्या हट्टापाई
निरागस हसण विसरून गेलोय
चव यशाची मिळवायला
आजवर फक्त स्पर्धा केलीय
दिखाउपणाच्या गर्दीसाठी
आपल्यांची आहुती दिलीय
आशा आहे तिरीप येईल
उजेडाची अंधारात
खांद्यावरती हात ठेऊन
कुणी दावील त्यातून वाट
अजूनही त्या अंधारात
एकाकी पडलोय
राहायचं आत्ता पुन्हा तिथे
जिथे मी घडलोय
लेखकशिव कन्यायांनी शुक्रवार, 02/10/2015 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
काहीच नाही म्हणता म्हणता
चंद्राभवती पडले खळे,
खळेच पडले इतके सुंदर
चंद्र दिसेना त्यानंतर!
काहीच नाही म्हणता म्हणता
चाफ्याभवती पान उमटले
पानच इतके गर्भरेशमी,
फूल दिसेना त्यानंतर!
काहीच नाही म्हणता म्हणता
बागेभवती जडली माया
माया इतकी गर्दसावळी
बाग दिसेना त्यानंतर!
काहीच नाही, काहीच नाही
कशी म्हणू मी यानंतर?
तव श्वासांचे गान ऐकते
इथले तिथले मिळून अंतर!
लेखकप्राची अश्विनीयांनी गुरुवार, 01/10/2015 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
पाप पुण्य अन् काल आजच्या
पल्याडही जर असेल काही,
अनादि, आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी ...
काळाची विक्राळ कातरी
कापू पाहते त्या धाग्याला..
जळजळीत कधी चटके देतो
तीव्र अतीव दु;खाचा प्याला..
गळ्यात बेडी अंध भक्तीची
प्राण तिचे कंठाशी येती..
डोळस, निर्दय नास्तिकतेचे
घाव बैसती माथ्यावरती ..
पण
अतूट आहे टिकून अजुनी
जीर्ण बकुळीसम ती ताजी..
अनादि आदिम त्या तत्वाशी
नाळ जोडली आहे माझी..