मन इंद्रधनू
कधी दंवात भिजावे, कधी चांदणे वेचावे
येता आभाळ भरून मन इंद्रधनू व्हावे
ऊन-पावसाचा लपंडाव, श्रावणाची गाणी
मेघांतून झरणारी वेड्या यक्षाची कहाणी
निळ्यासावळ्या दूताने माझ्या दारी बरसावे
तहानेली काळी धरा जसा यशोदेचा कान्हा
धारा पावसाच्या जसा झरे देवकीचा पान्हा
प्राशून त्या अमृताला तनमन तृप्त व्हावे
दूर मंदिरात घुमे टाळ-मृदुंगाची वाणी
सुरावटी त्या वाहते गावयमुनेचे पाणी
सूर गुंफून शब्दांत हरीरूप रंगवावे
काव्यरस
मिसळपाव