शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.
तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अॅडमिट व्हायला सांगितले आहे.