बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं.
आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं?