आज ज्येष्ठ लागला. असं ! मग ? मग काही नाही, मी भूतकाळात गेले.
पावसाळी वातावरण .सकाळी १० चा सुमार. मंदिराचं सभागृह, मध्यभागी प्रवचनकारांची बैठक मांडलेली. त्यावर बसण्यासाठी आसन. पुढ्यात चौरंग मांडलेला. त्यावर आच्छादन घातलेलं .आमच्या काकू.. हो.. आमच्या शेजारी रहायच्या नं , म्हणून आमच्या. तर कीर्तनचंद्रिका सौ. पद्मावतीबाई देशपांडे ... आसनावर विराजमान होत आणि खड्या स्वरात,
हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा
असा गजर सुरु होई.
प्रतिपदेपासून दशमीपर्यंत रोज सकाळी
पंडितराज जगन्नाथ यांच्या जीवनचरित्रावर आख्यान होई आणि दशमीला समाप्ती होई.