- डॉ. सुधीर रा. देवरे
मी आठवी नववीत असेल तेव्हा. एका लहानश्या विरगाव नावाच्या खेड्यातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत होतो. शाळेत आम्ही काही मित्र त्यावेळी स्वत:ला हुशार समजत होतो. पहिला नंबर मिळवण्यासाठी आमच्यात स्पर्धाही असे. विज्ञानाच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या तिन्ही शाखा तसेच भूगोल, खगोल, गणित अभ्यासताना आतापर्यंत लागलेल्या विविध शोधांवर आमचं एकमेकांमध्ये बोलणं व्हायचं. अशा प्रकारची एकदा शोधांची चर्चा सुरू असताना एक मित्र सहज बोलून गेला, ‘आपल्या जन्माआधीच शास्त्रज्ञांनी सर्व शोध लावून ठेवलेत.