बायो-डेटामधे हॉबीज म्हणून एक सेक्शन असतो. मला वाटतं ९०% लोकांच्या हॉबीज अगदी सारख्या निघतील. वाचन, संगीत, क्रिकेट (पहाणं ), पोहोणं, इत्यादि. आपले असे पण काही छंद असू शकतात की जे आपण तिथे लिहू शकत नाही. ते छंद पाहून मुलाखत तिसरीकडेच भरकटेल म्हणून कदाचित लोकं (ज्यात मी पण आलो) उल्लेख करत नसतील.
मला लहानपणी काडेपेट्यांचे कव्हर (टिक्के) जमवायचा छंद होता. त्या नादापायी मी आणि माझा चुलतभाऊ नाही नाही तिथे भटकलो. शाळा सुटली रे सुटली की ३-३, ४-४ किलोमीटर आम्ही वणवण हिंडायचो आणि नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. आता लक्षात येतंय की समोरच्याला ते एकदम येडछापसारखं दिसत असणार.