निद्रादेवीची कुंडली मांडून तिला समजून घेणं फारसं अवघड नाहिये. ती आपल्यावर का बरे रुसलीये याचीही उत्तरे मग शोधता येतात. पूर्वीची माणसं उशाला दगड घेऊनही प्रगाढ झोपत असत असे म्हणतात. याउलट आजच्या सिमेंटच्या जंगलात दगड सापडणे दुरापास्त झाल्यामुळे की काय कोण जाणे, माणसांना मऊ उशा अंगाखाली घेऊनही 'म्हणावी तशी' झोप लागत नसते. किंबहुना अशी तक्रार नेहमी कानावर येते. त्यामुळेच निद्रेची चिरफाड करण्याचे योजिले आहे.
तर ती निद्रादेवी एकटी नसून त्या दोन जुळ्या बहिणी असतात. भिन्न स्वभावाच्या, विरोधी आचरणाच्या. रात्रभर त्या फेर धरुन कधी झिम्मा, कधी लपाछपी तर कधी खोखो खेळतात.