अहो ऐकलंत का?
नुकतीच घरच्या देवाची पूजाअर्चा करून , ग्राम दैवत असलेल्या कालभैरवाच्या देवळात जाण्यासाठी तयार होत असलेल्या हरभटांना पत्नी भागीरथी बाइंची हाक कानी आली.नुकते कुठे झुंजू मुंजु झाले होते. सगळीकडे शांतता होती. नाही म्हणायला गोठयातल्या गायींच्या गळ्यातील बारीक घुंगरांचा, विहिरीवरील पाणी शेंदायचा, कोंबडा आरवल्याचा, रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या बैल गाडीच्या चाकांचा ,असे काही परिचित आवाज येत होते. पण हिंदळ्यासारख्या गावंढ्या गावात असून असून वर्दळ ती कितीशी असणार? कोकणातल्या कोणत्याही गावासारखे एक साधे सुधे गाव. समुद्र किनारा थोडका लांबच , त्या पेक्षा खाडी जवळ.