Skip to main content

कविता माझी

संध्याकाळी तू गंगेतीरी

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 01/09/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

शोक कुणाला? खंत कुणाला?

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 25/08/2019 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

देवघर

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 19/08/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

आसिंधू

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 14/08/2019 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती.... ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती.... ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा! मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर! ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला! नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला.... @मधुरा #14August
काव्यरस

कावळा..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 31/07/2019 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा. तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी, ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा. व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा? कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा? या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा? ( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))

कविता: आज्जी माझी…

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 30/07/2019 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला आज्जी माझी... मायेची पाखर, उडून गेली दूरवर परी आठवण नाही पुसली कदापि आज्जी माझी... संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले आज्जी माझी... कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले, डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले, प्रयत्नांत कधी धडपडले, घडले परी मी किंचित नाही घाबरले आज्जी माझी... आप्तांना भेटण्यास जीव कासावीस दिसताच पाणावले डोळे आठवणीने आज्जी माझी... आत्ता शरीर थकले, आणि कृश झाले इच्छा संपल्या, उरल्या फक्त स्मृती आज्जी माझी... पानगळ सुरू झाली आणि फक्त खोडच उरले वसंताची चाहुल लागेल, पुन्हा पालवी फुटेल
काव्यरस

पावसाच्या धारा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 30/07/2019 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या धारा -------------------------------------------------------------------------------- पावसाच्या धारा भन्नाट वारा टपटप टपटप पागोळ्या दारा पोरं घरामध्ये बसली अडकून वीज कडाडे ढगोबा धडकून लख्ख प्रकाश आकाश तडकून पावसाचा तोरा धिंगाणा सारा पावसाच्या धारा पाणी साठले त्यात खेळू या धबक धबक ते उडवू या पाण्यात होड्या चला सोडू या पाण्यात भोवरा फिरे गरागरा पावसाच्या धारा तुडुंब पाणी वाहते खळाळून चालावे कसे ? किती सांभाळुन ? कागदाच्या होड्या जाती गोंधळून पावसाचा जोरा तडमतडम नारा पावसाच्या धारा किती पडतो कसा पडतो कधी झरतो कधी दडतो कधी हळूच कधी वाढतो पावसाचा होरा कळे ना पोरा पावसाच्या धारा ------
काव्यरस

हा संभ्रम माझा

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 23/07/2019 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
नकळत ओढून नेतो मिचकावत सोडून देतो स्वतःशीच खिन्न हसतो हा संभ्रम माझा स्वप्नांच्या झुळूकी मनाला तप्त पाऊलवाटा पायाला अनवाणी चालू पाहतो हा संभ्रम माझा अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा - संदीप चांदणे

पावसा पावसा पड रे

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 03/07/2019 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
पावसा पावसा पड रे --------------------------------------------------- पावसा पावसा पड रे लागू देत झड रे पाऊस पडला संततधार सगळं झालं हिरवंगार रान सारे चिंब झाले वाहू लागले नद्या नाले पावसा पावसा पड रे लागू देत झड रे
काव्यरस

कोडगं व्हायचं...

लेखक निओ यांनी मंगळवार, 02/07/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
खुशाल कोडगं व्हायचं कशाला मनाला लावून घ्यायचं मनाला लावून घेण्याने परिस्थिती थोडीच बदलणार आहे अवतीभवतीची माणसं थोडीच बदलणार आहेत कशाला पाहिजे हळवं संवेदनशील मन लहान सहान गोष्टींनी चरे पाडून घ्यायला ओरखडे पडायला काय सुख मिळतं संवेदनशील मनाने चार ओळी लिहिता येतात पानभर खरडता येते...