एक संघ मैदानातला - भाग १९

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
22 Jul 2016 - 5:10 pm

मी मात्र तो आवाज कुठून येतोय याचा शोध घेण्यासाठी जनरेटरच्या मागे जाऊ लागले. जाता जाता मी जागूकडे पाहिले तिने मला थांबण्याची खूण केली, मी ती जवळ येईपर्यंत थांबले. ती जवळ येऊन काहीतरी खाणा-खुणा करायला लागली पण मला ती काय म्हणतेय ते समजेना. म्हणून मी हात झटकला आणि मागच्या बाजूला जाऊ लागले. तेवढ्यात परत आवाज आला, "आत्ता बरोबर कोणाला आणलं आहेस का तू ?"
" अं... नाही... का ?"
" मग इकडे तिकडे बघत हात का झटकत आहेस?"
आता तो डोक्यात जायला लागला होता. एवढे प्रश्न मला विचारणारा हा कोण टीकोजीराव?
" हॅलो... तुम्ही जरा समोर येता का? मग बोलणं जास्त सोपं होईल नाही? असं आडून आडून बोलण बर नाही "
" हम्म.. बरोबर आहे पण.."
आधी मला खुसखुस ऐकू आली मग आवाज " तू नक्की एकटीच आहेस ना ?"
" तुझ्यासाठी मी एकटीच पुरे... आता येतोस का बाहेर की... " जनरेटर मागून हळूच एक जीन्स घातलेला पाय डोकावला तो पाय आणि त्याचा मालक बाहेर का येत नाही हे बघायला मी आत डोकावले तर दुसऱ्या बाजूने त्या मजनूने एंट्री घेतली. काल पासून डोक्याला शॉट लावणारा हाच तो प्राणी... लगेच मेंदूने नोंदी करायला सुरुवात केली.
साधारण ५' ८" ते ५' 10" उंची, सावळा पण उजळ असा वर्ण, मध्यम बांधा, वजन साधारण ७५ ते ८० मध्ये असावं, नाक सरळ, डाव्या बाजूला कपाळावर हेअर लाईन जवळ एक मोठा तीळ, पिवळ्या रंगाचा स्किन टाईट फुल स्लीव्ज टी शर्ट असल्यामुळे व्यायामाचे शरीर लगेच कळत होते, काळी जीन्स (मग ती ब्लू जीन्स कोणाची? ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक व्यक्ती इथे आहे आणि तोही ह्याच्या एवढ्याच उंचीचा आहे. त्याने शूज घातले आहेत), काळे डोळे, भुवया कमालीच्या रेखीव , उजव्या कानात बहुतेक काही तरी घातलं असावं कारण ते अंधारात चमकत होत. दिसायला म्हणाल तर बरा होता. केसाला तेल किंवा क्रीम असे काहीतरी चोपडून एक बाजूचा भांग पाडून व्यवस्थित बसवलेले. बहुतेक डिओ लावलेला असावा. हातात घड्याळ, दुसऱ्या हातात जाड कड, पायात काळे फ्लोटर्स बहुतेक नवीनच होते. हाताची घडी घालून गालात हसत विजयी वीरासारखा माझ्याकडे पाहत उभा होता.
" तू आलास आता तुझ्या दुसऱ्या पंटरला पण बोलावं" त्याच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह
" कोनाला म्हणालीस ?"
" मी त्याला बघितलेलं आहे. आता त्यालाही बाहेर आण.. ती तिथे पलीकडे आहे ना?" तो त्याला वाकून शोधायला लागला. माझी नजर जागूला शोधायला लागली पण जागू जागेवर नव्हतीच. मेले मी आता.. . माझ्या हातात किट शिवाय काहीच नव्हतं. सगळी तयारी करून आणली होती पण ते सगळं मी ग्राउंडवरच विसरले होते. आता बँक आउट व्हायचं बस...
" अग इथं कुणीच नाहीये.. हवं तर तू बघ की ..."
" नको राहू दे.. बोल तू.. एवढी फिल्मीगिरी करून कशाला बोलावलेस ?"
" आता चिठ्ठीत होत की लिहिल्यालं.. तुला समजलंच असेल.."
" तू नक्की मलाच चिठ्ठी लिहिलेस ना?"
" हा मंग.. तुजच नाव रेवती आहे ना ?"
" नाव माझंच आहे पण सेम चिठ्ठी अजून एक मुलीला पण येत होती त्याच काय ?"
" शेम टू शेम?"
" हो.. अगदी तशीच.. फक्त नाव बदललेल.." तो थोडा चक्रावलेला दिसला. तेवढ्या मला त्याच्या मागून जागू रूपा बॅग घेऊन येताना दिसल्या. मी चेहऱ्यावर काहीही न दाखवता शांत उभी होते.
" त्या सगळ्या चिठ्या तू लिहिल्यास की कोणाकडून लिहून घेतल्यास?"
" ... "
" अरे बोल ना.. पहिली मी लिहिली. दुसरी माज्या मित्राने लिहिली. पण त्यात लिहिलेलं खरं आहे. मला तू आवडलीस. मी आमच्या आक्काला पन सांगितलं. "
" काय ? कोण आक्का ? काय सांगितलस ?"
" हेच की तू मला आवडलीस म्हणून. मी थोडं माज्याबद्दल सांगतो. मी बी.एस्सी. अॅग्री आहे. आता ३ वर्षाच्या गॅप नंतर एम. एस्सी. ला अॅडमिशन घेतली आहे. तात्यांची ४५ एकर शेती आहे आणि वडिलोपार्जित १५ एकर आहे पण त्यात चुलत्यांचा पन वाटा आहे. ऊस, जोंधळे घेतो त्यात. सध्या शेतीच तात्याचं बघतात. माज्या शेतीच्या प्रयोगकरता थोडी जमीन त्यांनी दिली आहे. घरी मी तात्या म्हंजे माझे वडील, आक्का म्हंजे आई आम्ही एवढेच. मोठी बहीण आहे तिचं झालं लग्न. ३ वर्ष झाली. तिला मिरजेला दिली आहे. बाकी चुलते वैगरे ह्याच गावात असतात. आता आक्का सारखं सारखं लग्नचा विषय काढती पण मला तसं ते मुलगी बघुन वैगरे लग्न नाही करायचं. जी मला आवडेल तिच्याशीच मला लग्न करायचं आहे.... बस मला वाटल ते मी बोललो तुला अजून काय हवं तर विचार.. "
" एवढं सगळं सांगितलंस पण तुझं नाव नाही सांगितलंस.. "
" अर्रर्र.. राहिलं की ते.. माझं नाव पुष्कर कोळेकर पाटील .."
" ह्हम्म.. पुष्कर तुझ्या मनात जे आहे तसं माझ्या मनात काहीही नाहीये. मी तुला प्रथमच बघत आहे आणि तसही माझा काही एवढ्यात लग्नाचा विचार नाहीये. सो... जे काही चालू आहे ते तू इथेच थांबाव.."
" अग आज नाही पण कधी तरी लग्न कारशीलच ना? तेव्हा कर की विचार माजा.. मी पण कॉलेज केलंय ना सुरू..आणि तशी मला पण घाई वैगरे नाहीये बर का.. पुढे शिकण्यातच अजून २-४ वर्ष निघून जातील आणि तुला हवं तर तू लग्नानंतर पण खेळ.. आपण टीम काढू की इकडे... तुला माहित आहे का ह्या तुमच्या मॅचेसला तात्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे.. आपल्या घरात लई ओपन... "
"पुष्कर .. प्लिज आपण तेव्हाच तेव्हा बघू.. त्याला अजून खूप वेळ आहे. सध्या तू हे चिठ्ठीचे प्रकार थांबव.."
“बर नाही पाठवणार चिठ्ठी मी.. पण मग तुझ्या पर्यंत पोचू कसा ?"
"ते राहू दे... मला अजून एक गोष्ट सांग तू अजून कोणाला ही चिठ्ठी पाठवली होतीस?"
"तुला सांगितलं नं मघाशी.. मी अजून कुणालाही चिठ्ठी नाही पाठवली म्हणून"
"आमच्या संघातल्या अजून एक मुलीला सेम चिठ्ठी आली आहे.. मजकूर आणि अक्षरही सेम आहे." असं बोलून मी फक्त त्याच्या डोळ्यात बघत राहिले. त्याने नजर वळवली. पण तोंडाने सतत मला माहीत नाही म्हणत राहिला. मी पण जास्त खोलात न शिरता तिथून हलायच ठरवलं नाही तर तो अजून महिती गोळा करण्यासाठी बडबड करत राहिला असता.
" बरं.. चल जाते मी.. मला जायचे आहे."
" तुझा फोन नं देना.. मी तुला फोन करेन.. "
" नाही माझ्याकडे फोन नाही... मी जाते" मी जाऊ लागतं त्याने माझा हात कोपराजवळ पकडला
" अगं थांब ना जरा.. थोडंसं तर बोल माझ्याशी.." तो तोंडाने बोल म्हणत होता पण त्याच्या हाताची पकड मात्र जाम घट्ट जाणवत होती. आत्ता पर्यंत शांतपणे बोलणारा पुष्कर आणि आताचा पुष्कर खूप फरक होता.
" पुष्कर हात सोड.. ह्या असल्या गोष्टी मला आवडत नाहीत" त्याने हात सोडला पण माझी वाट अडवून उभा राहिला. आता त्याच खरं वागणं कळत होत.
"मला जाऊ दे.. माझे विचार मी तुला सांगितले आहेत.. "
" आग थांब ना ५ मिनिट..." असं म्हणत तो माझ्या समोर आला आणि त्याने पटकन माझा उजवा हात कोपरा जवळ धरला आणि तो उजव्या बाजूलाच असल्यामुळे माझ्या डाव्या हाताच्या हालचालीवर देखील मर्यादा आली. आता त्याच्या तोंडावर एक प्रकारचे विचित्र हसू दिसु लागलं होत. आता काही तरी कारण भाग होत.
मी त्याच्या नाकावर जोरदार डोकं आपटले. आमची ही काही सेकंदात झालेली झटपट बघून रूपा आणि जागू पळत जवळ आल्या. आयत्या वेळेला जागूने कुठून तरी नाडी आणली होती ती. तो एक हाताने नाक धरून आणि दुसऱ्या हाताने माझं कोपर धरून थोडा बेसावधपणे वाकलेला असताना तिने मागून त्याच्या गळ्यात घातली आणि आवळायला सुरुवात केली. मी आणि रूपाने त्याचा फायदा घेत त्याला पोटात, कानावर, प्रायव्हेट पार्टवर असे जमेल तसे तिथे गुद्दे मारले. प्रायव्हेट पार्टवर जोरदार लाथ बसल्यावर तो खालीच बसला. आम्ही त्याला तसंच टाकून भराभर ग्राउंडच्या दिशेने चालू लागलो.

झालेल्या गोष्टीचा आम्हाला बोभाटा करायचा नव्हता नाहीतर पहिले आम्हालाच दादांचा मार खावा लागला असता त्यामुळें कोणी पाहिले नाही ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी इकडे तिकडे पाहत चालत होतो. बरेच लांब गेल्यावर मागे वळून पाहताना त्याला कोणीतरी उठायला मदत करताना दिसले. कपड्याचा रंग वैगरे दिसला नाही पण तो ब्लू जीन्सवालाच असणार ह्याची मला खात्री होती. स्टेडियममध्ये मुलींमध्ये जाऊन बसल्यावर बरं वाटलं. हातापायाला किंचित थरथर जाणवत होती. समोरचा खेळ मेंदूत शिरत नव्हता. अजूनही ह्रदयाचे ठोके जाणवत होते. तेवढ्यात मला एवढा वेळ का लागला म्हणून दीदीने विचारले. टॉयलेटला गेलो होतो म्हणून सांगितले. तिचा विश्वास बसला. तिने सीआयडीगिरी बंद केली. नॉर्मलला येण्यासाठी दीर्घ श्वसन कारण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. योग्याकडून बिस्कीट मागून खाल्ली त्याने जरा बरं वाटलं. हे सगळं होईपर्यंत समोरच्या मॅचही संपत आल्या होत्या. खरं तर भूक लागली होती पण त्याक्षणी काहीच नको वाटत होत. मॅच कधी संपली कोण जिंकलं ते समजलेच नाही. सगळे उठले तश्या आम्हीदेखील उठलो आणि मेसच्या दिशेने चालू लागलो. जागूने तुप्याला ही गोष्ट गपचूप सांगितली. तिचा पिटाई करायचा चान्स चुकला म्हणून ती वैतागली. जमेल तसं बकाबका जेवलो आणि रुमवर येऊन पडलो.

हात पायातील शक्ती गेल्यासारखं वाटत होत. आज माझा हात धरला तर मला एवढा राग आला, आम्ही तिघी होतो म्हणून त्याला जमेल तसे बदडू शकलो. पण ज्या मुली अशा वेळी एकट्या असतात.. किंवा ज्यांच्या बलात्कार होतात त्यांचं काय होत असेल? त्या मुलींनी तर बलात्कार करणाऱ्या पुरुषाचा जीवच घ्यायला पाहिजे ती सुध्या अतिशय क्रूरपणे.. त्यांचे हाल हाल करून मारणे हीच त्याला सजा आहे. माझं डोकं ठणकायला लागलं. हातावरची त्याची पकड परत जाणवायला लागली. मी उगाचच जाऊन हात धूत राहिलें. मनात मी त्याला धडा शिकवला ह्याबद्दल समाधान वाटण्यापेक्षा ह्या मनोवृत्तीबद्दल चीड यायला लागली होती. आज माझ्याकडे मदत होती म्हणून निभावलं.. पण रोज अशा किती तरी मुली बाहेर कामासाठी शिक्षणासाठी एकट्या जात-येत असतात त्यांचं काय ? घरात मुलीला कराटे वैगरे शिकवणारे पालक मुलांच्या बाबतीत एवढे ढिले कसे राहू शकतात की त्यांना साधं मुलींशी कसं वागावं हेही शिकवता येऊ नये. मुलीला एखादी गोष्ट आली नाही की आपण दोष आई- वडिलांना देतो 'आई बापाने हेच शिकवलं आहे का ?' म्हणत त्यांचा उद्धार करतो पण मुलं जेव्हा अशी वागतात तेव्हा मात्र त्याचा दोष सगळं मुलांचाच असतो? त्यांना घडवणाऱ्या पालकांचा काहीही दोष नसतो? स्वतःच्या आया-बहिणीच्या बाबतीत असलेलं त्याचं संवेदनशील मन अशा वेळी कुठे जात जेव्हा त्यांचा समोर त्यांच्याशी नातं नसलेली मुलगी येते?
सगळं सगळं बधिर झाल्यासारखं वाटत होत. सगळ्याची चीड येत होती. सगळ्या बाजूने अंगावर कुणीतरी येत आहे असं वाटू लागलं. जरा मोकळ्यावर बसावं म्हणून मी बाहेर येऊन बसले. माझ्या मागे मागे रूपा पण आली. माझ्या मनात आलेले प्रश्न मी तिला विचारत होते आणि उत्तरादाखल ती फक्त माझ्या पाठीवरून हात फिरवत राहिली. दिदिने आम्हाला झोपायला बोलावण्यासाठी आवाज दिला. आम्ही "आलो" म्हणून परत तिथेच बसून राहिलो.

थोड्यावेळाने तुप्या पण आम्हाला जॉईन झाली. मूड चेंज करण्यासाठी दुसरा दुसरा विषय काढून बोलू लागलो. तेवढ्यात बाथरूमचं निमित्त काढून योग्या पण बाहेर आली. तिच्यासमोर हा विषय बोलता येणार नव्हता. तिला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं. आम्ही मग उगाचच शाळेच्या आवारात फिरू लागलो. शाळेच्या मागच्या बाजूने फिरताना आम्हाला कोपऱ्यात झाडामागे कोणीतरी असल्यासारखं वाटलं. योग्या जाऊ नका म्हणून सांगत होती पण आम्ही मात्र जायचं ठरवलं. आम्ही हलक्या पावलाने पुढे जाऊ लागलो. मी आणि तुप्या झाडाच्या डाव्या बाजूने आणि रूपा झाडाच्या उजव्या बाजूने एकदम डोकावायचं ठरवलं. योग्याची फाटली होती म्हणून ती जरा लांब उभी राहिली. अजून ५ पावलं आणि आम्ही त्या झाडापलीकडच्या माणसाला बघणार होतो.
माझ्या मनात कुठेतरी पक्कं बसलं होत की त्या दोघांपैकीच कोणीतरी असणार म्हणून... आता ते परत आले असते तर ह्यावेळी आम्ही पळणार नव्हतो. मनातली सगळी चीड,राग,संताप बाहेर पडणार होता. जागा आणि वेळ आमच्या फेव्हरमध्ये होती. रात्रीच्या वेळी ते दोघ किंवा तो मुलींच्या राहण्याच्या ठिकाणी आवारात घुसला होता.. आता त्याची खैर नव्हती. आता तो हातात सापडला तर त्याची कशी वाट लावायची ह्याच सगळं प्लॅनिंग ५ पावलात डोक्यात तयार झालं होतं. फक्त ते / तो समोर यायची खोटी होती. दिलेला मार पुरे झाला नाही वाटत जो परत आला आहेस काय?

आम्ही त्या झाडाजवळ पोचलो आणि घुसमटल्यासारखा आवाज आला. आम्ही दोन्ही बाजूने एकदम डोकावलो. आणि.... "ओह... सॉरी.. सॉरी.. " म्हणत आम्ही बाजूला आलो. आम्हाला डोकावलेलं पाहिलं आणि ते दोघं पटकन लांब झाले. आम्ही मागे फिरून योग्याजवळ जाई पर्यंत ती जोडी झाडामागून बाहेर आली होती. खरं तर आम्ही कोणीही तिला ओळखत नव्हतो. पण तिनेच ओळख करून दिली. ती नाशिकच्या टीम मधली मुलगी होती आणि तिचा बॉयफ्रेंड भारत पेट्रोलियम मधून खेळत होता. आम्ही काहीही विचारले नसतानाही तिने बरेच डिटेल्स आम्हाला दिले. खरं तर आम्हा तिघीना त्यांना पाहिल्यावर सुटल्यासारखे झाले होते. आम्हाला वाटत होत तस काही नाही निघालं. पण योग्या हे बघून जामच खुश झाली. तिला घबाड मिळाल्याचा आनंद झाला होता. आता काही तिला रात्रभर झोप लागणार नव्हती. आम्ही कोणालाही काहीही सांगणार नाही ह्याच त्यांना आश्वासन देऊन मागे फिरलो आणि परत कट्ट्यावर येऊन बसलो.

क्रमशः

एक संघ मैदानातला - भाग १ http://www.misalpav.com/node/35830
एक संघ मैदानातला - भाग २ http://www.misalpav.com/node/35846
एक संघ मैदानातला - भाग ३ http://www.misalpav.com/node/35878
एक संघ मैदानातला - भाग ४ http://www.misalpav.com/node/35893
एक संघ मैदानातला - भाग ५ http://www.misalpav.com/node/35924
एक संघ मैदानातला - भाग ६ http://www.misalpav.com/node/35954
एक संघ मैदानातला - भाग ७ http://www.misalpav.com/node/35989
एक संघ मैदानातला - भाग ८ http://www.misalpav.com/node/36014
एक संघ मैदानातला - भाग ९ http://www.misalpav.com/node/36071
एक संघ मैदानातला - भाग १० http://www.misalpav.com/node/36205
एक संघ मैदानातला - भाग ११ http://www.misalpav.com/node/36256
एक संघ मैदानातला - भाग १२ http://www.misalpav.com/node/36281
एक संघ मैदानातला - भाग १३ http://www.misalpav.com/node/36300
एक संघ मैदानातला - भाग १४ http://www.misalpav.com/node/36406
एक संघ मैदानातला - भाग १५ http://www.misalpav.com/node/36536
एक संघ मैदानातला - भाग १६ http://www.misalpav.com/node/36579
एक संघ मैदानातला - भाग १७ http://www.misalpav.com/node/36625
एक संघ मैदानातला - भाग १८ http://www.misalpav.com/node/36685

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

सहमत. असल्या मजनूंना हालहाल करून मारलं पाहिजे. साला #&@%#&!

शलभ's picture

22 Jul 2016 - 6:02 pm | शलभ

+१
थोडं वेगळच वळण

नाखु's picture

23 Jul 2016 - 10:07 am | नाखु

बापाच्या पैशाचा माज असलेला जनावर इतकंच म्हणेन मी ! (भले इथल्या सो कॉल्ड प्रिन्स पाठीराख्यांना राग आला तरी)

एकंदर वागणुकीवरून त्याची नियत चांगली नव्हतीच हे नक्की ,

पुलेशु+पुभाप्र

मुक्त विहारि's picture

23 Jul 2016 - 10:15 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

संजय पाटिल's picture

23 Jul 2016 - 11:52 am | संजय पाटिल

चांगली अद्दल घडवली.
पु.भा.प्र.

पैसा's picture

23 Jul 2016 - 3:04 pm | पैसा

अगदी रंगतदार लिखाण!

असंका's picture

23 Jul 2016 - 3:29 pm | असंका

वाईट अनुभव!!
:(

आणि तरीही लिहिण्यात कडवटपणाचा लवलेश नाही. अत्यंत संयमित भाषेत लिहिलंयत.

पुभाप्र...!

सुधीर कांदळकर's picture

24 Jul 2016 - 8:02 am | सुधीर कांदळकर

मागील भाग मस्त रंगला. टेक्निकल पॉईन्ट ठाऊक नव्हता. या भागाबद्दल .. आपण जरा जास्त धैर्य दाखवलेत. अति आत्मविश्वास. ते सामान्य मुलगे होते म्हणून बचावलात. व्यावसायिक गुन्हेगार असते तर जड गेले असते. मारामारीतही नेहमी आपणच जिंकतो असे नसते. शिवाय डूक ठेवून नंतर हल्ले करणे हे देखील वृत्तपत्रात आपण वाचतोच की. घाबरून गप्प राहणे जेवढे चूक तसेच अतिआत्मविश्वासही चूकच. दादा वगैरेंची मदत घ्यायला हवी होती. पुन्हा असे कधी करू नका ही कळकळीची विनंती.

शि बि आय's picture

24 Jul 2016 - 4:19 pm | शि बि आय

आम्ही घातलेला गोंधळ नंतर लक्षात आला. त्यावेळी जे सुचले ते एकमेकींच्या भरवश्यावर करून गेलो.

ह्या भागातला पहिला प्रसंग थोडा कल्पनेप्रमाणे पण तरीही ब-यापैकी हादरवून टाकणारा होता. त्यानिमित्ताने आलेले मनातले विचार मात्र १००% पटले आणि वाईट वाटलं.
असो, शेवट थोडा हलका-फुलका केला ते एक बरं केलं :)

अनुप ढेरे's picture

25 Jul 2016 - 4:19 pm | अनुप ढेरे

छान! आवडला हा भाग. कंसेंशुअल प्रेम आणि एकतर्फी प्रेम. दोन्ही उदाहरणं जमली आहेत.

Ujjwal's picture

29 Jul 2016 - 11:39 pm | Ujjwal

पुभाप्र...

किसन शिंदे's picture

29 Jul 2016 - 11:48 pm | किसन शिंदे

ही संपूर्ण मालिका एकदा निवांत वाचेन म्हणतो. तूर्तास ही पोच: )

नावातकायआहे's picture

22 Aug 2016 - 4:15 am | नावातकायआहे

पुभाप्र...

पुढील भाग कधी? अस आम्हाला विचारायला काय जातय पण आम्ही वाट बघतोय या गोष्टीची..:)