हिंदोळे
आज तिचं लग्न होतं .
तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं .
होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ.
तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं .
तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील .
एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती.