प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
१४ फेब्रुवारी, म्हणजे संतश्रेष्ठ व्हॅलेंटाईन यांच्या नावाचा प्रेमाच्या गावी जाण्याचा दिवस. आपल्या सखीला किंवा सख्याहरीला आपले प्रेम जाहीरपणे सांगण्याची संधी देणारा दिवस आणि अर्थात काही सडक सख्याहरींना आपली जागा दाखवून द्यायचा दिवस. व्हॅलेन्टाईन्स डे म्हणजे अगदी आगळावेगळा दिवस. नेहमीच्या दिवसासारखा हा नाही उजाडत. सूर्यही जरा लाजत, दबकत उगवतो, उषेचा रक्तिमा अधिक गडद भासतो आणि हवाही पॅरिसच्या हवेसारखी धुंद नशीली बनून जाते. त्यातून आज वसंत पंचमी, म्हणजे भारतीय कामदेवाचा उत्सव आणि अभारतीय लव्ह डे असे एकत्र आले आहेत.