काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं - ओजसनं - फोन घेतला.
'मोडक बोलतोय. आई आहे?'
'थांबा हं. देते.' असं म्हणत तिनं आईकडं फोन दिला.
त्यांनी फोन घेतला तेव्हा पहिलंच वाक्य होतं, 'ओजस म्हणतेय की, यांचं नाव इतकं सुंदर असून हे मोडक असं का सांगतात?'
'बऱ्याच वर्षांपासून ती एक सवय बसली आहे. काही केल्या जात नाही...'
मी उत्तर देऊन मोकळा झालो. हा अनुभव काही पहिलाच नव्हता. याआधीही एकदा असा अनुभव आला होता. त्यावेळी मी एका लोकसंघटनेसोबत जोडून घेतलं होतं.