अज्ञानवाद !!
माझ्या घराच्या भिंतीला
रंग गायीच्या शेणाचा
नाही भय जरीही
आला अणुबाँब कुणाचा...
माझ्या घराच्या खोलीत
यज्ञकुंडाचे भूषण
नाही पर्वा कधीही
असो किती प्रदूषण...
माझ्या घराच्या दारात
काळ्या घोड्याची हो नाळ
घर संपन्न होणार
नाही कशाची आबाळ...
माझ्या घरी प्रत्येकाच्या
गळ्यामधे गंडेदोरे
नाही भय कशाचे
कुणी करी काळेबेरे...
माझ्या घरी कपाटात
पोथ्यापुराणांचा संचार
त्याच्या पलीकडे व्यर्थ
सुखी जीवनाचे सार...
माझा घरी विज्ञानाला
नाही जरासाही थारा
कसा जगतो मी ते
शेजाऱ्यालाही विचारा...
मिसळपाव