असाच भटकत रानात असता
रानफुले समोर येती
नव्हता कसला गंध तयांना
रंगही नव्हते भरजरी विविध
परी तयांत होती नक्षी
बारीक नाजूक सुंदर कोमल
पिवळे गेंद उन्हात चमके
वार्यावरती डौलाने डुलके
वेड लागले मलाच तेथे
दृष्य मनोरम खरोखर ते
डोंगर उतार पठारावरती
फुले पाहता लागली समाधी
घोस तयांचे लेऊन घ्यावे
वाटले तक्षणी अंगावरती
एकरूप व्हावे, तेथेच रमावे
परत न फिरावे घराप्रती
बघतो जेव्हा अचानक
रानफुले समोरी येती
- पाभे (03/10/24)
(काल डोंगर उतारावर पाहिलेले दृष्य)
न करीशी व्यर्थ चिंता तू
ठाऊक मज सामर्थ्य माझे !
कुणाशी कसे वदावे कसे वागावे
काय केल्याने काय होईल....
हि चिंता तयास
ज्याने क्रमिला पथ दुहेरी
माझा पथ सुर्यप्रकाशाहूनही स्वच्च्छ
कण भारही किंतु तयात नाही !
नकोत सला-मशवरा मजला
ठाऊक मज मार्गक्रमण माझे !
मान्यता जगात उदंड जाहल्या
त्या प्रती जगणारे अमाप ...
मी तर अव्यक्ताचा चाहता
जी माझी कृती तीच परिणती !
का कशाचीही बाळगावी मी भीती
ठाऊक मज अंतिम ध्येय माझे !!
साक्षीला दिवस आहे
दिवस आहे साक्षिला की मी न लटिकें बोलतो
एक उन्नत काजवा बघ भानुला भेवाडतो
दावितो लोकांत मी आहेस की सत्शील तू
त्याचसाठी झाकलेली मूठ पुन्हा झाकतो
आपला सन्मान असतो आपणच राखायचा
तोल सांभाळून रस्ता दृढदृष्टी चालतो
तारतम्य लागले जर हेलकावे खायला
भोवतीच्या फडतुसांना दूरदेशी हाकतो
योग्यतेला योग्यतेने पारखावी योग्यता
अभय येथे पारखी तर लाळघोटू शोधतो
- गंगाधर मुटे 'अभय'
======
बारा/आठ/चोवीस
घोट घे रे यार काही होत नाही
जीव जातो फार काही होत नाही.
एकदा रक्ताळली बेधुंद झाली.
म्यान ही तलवार काही होत नाही.
बांधता घर एकदा कळले उन्हाला
सावली मग पार काही होत नाही.
भूत नसते सिध्द करण्या ठार मेला.
भूत त्याचे ठार काही होत नाही.
गंजलेल्या जिंदगीला धार देतो
आणि मी भंगार काही होत नाही.
पोरसवद्या बालिकेची माय होते.
स्वस्थ ती घार काही होत नाही.
एकदा तिज आपुलेसे मानले कि
वेदनेचा भार काही होत नाही.
+कानडाऊ योगेशु
पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा...
संपले का रंग तुमचे
का कुंचले मोडले
किंतान सोडून तुम्हीं
अभासी चित्र का काढले?
शब्द गुंत्यात भंजाळले ,
टकांळता कंटाळले का?
रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून
रंगीत चित्र कसे साधले?
अभिजात कलागुण तुमचा
का खुंटीवर टांगला?
देवप्रज्ञा सोडून आपण
कृ प्रज्ञा सवे खेळ का मांडला?
___________________________________
कल्पनेत मन दंगले
कृबू ने ते साकारले
लेवूनी शुन्य,एक साज
अभासी चित्र ते रंगले
शुष्क शब्दांच्या उड्या
कल्पना सागरातल्या बुड्या
रंग सारे दाटले तरीही
नाही उमटल्या भावनांच्या खुणा.
जाणतो सारे तरीही
नवोन्मेषी गीत मी गातो
रात्रीच्या स्वप्ना
इथं तीन लाख,
मिळतात बसून।
हो हे आहे,
पुण्याचे ससून।।
कसे बदलणार,
डाॅक्टरचे रक्त?
कुठे मिळणार,
'भ' विटामीन-रहीत
शुद्ध रक्त?!
कुणाकुणाचे
बदलणार रक्त?
पोलीस,RTO,
वकील,कस्टम,Excise,
जज,आमदार,बिल्डर?
त्यापेक्षा सोपी,
मजूरी सक्त ।।
प्रश्न सुटता सुटता
माय उत्तरांची व्याली
प्रसवल्या उत्तरांच्या
प्रश्नचिन्ह शोभे भाळी
ललाटीचे लेकरांच्या
वाचुनिया फुंदे माय,
"प्रश्न घेऊनी जन्मल्या
उत्तरांचे करू काय?"
प्रश्नांकित उत्तरांची
गाठ घडोघडी पडे
एक सोडविण्याआधी
नवा प्रश्न ठाके पुढे
अनादि नि अनंत ही
श्रेढी प्रश्न उत्तरांची
चिरंतनाशी जोडीते
नाळ क्षणभंगुराची
लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली
जशी झुळूक वार्याची, ग्रिष्माच्या काहीली
लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण
गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं
ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा
गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा
लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा
बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.