तुझे माझे नाते
तुझे माझे नाते जशी गूढ सागराची खोली
दूर दूर तरी एक तुझी माझी मनबोली
तुझा धुंद निशिगंध, माझी नाजूक अबोली
तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी
पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी
तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी
तुझे माझे नाते जशी घनगर्द देवराई
तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई
तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई
तुझे माझे नाते जशी श्रावणसरींची गाणी
तुला-मलाच कळली प्राक्तनाची गूढ वाणी
तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी
तुझे माझे नाते जसे उठती तरंग जळी
आभाळीच्या खेळियाने मांडली अबोध खेळी
तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी
Taxonomy upgrade extras
मिसळपाव