"अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्ला..."
घराशेजारच्या मशिदीच्या खरखरत्या लाऊडस्पीकरमधून काझीसाहेबांचा आवाज आला आणि गाढ झोपलेला उस्मान एकदम गडबडून जागा झाला. अर्धवट झोपेतच त्याने बाहेर नजर टाकली, त्याला पटकन आपण कुठे आहोत हेच समजेना. बाहेर अजून अंधार होता, रात्र सरल्यासारखी वाटत नव्हती. काझीसाहेबांचं दुसरं आवर्तन सुरू झालं आणि मात्र त्याला हळूहळू भान यायला लागलं. आपण तर आपल्याच घरात आहोत की चक्क...
तो पर्यंत काझीसाहेबांची अझान संपली होती आणि लाऊडस्पीकर नुसताच जोरात खरखरत होता. उस्मानला म्हातार्याच्या युक्तीचं नेहमीच हसू यायचं. हा काझीसाहेब मोठा वस्ताद आहे.