गजर झाला आणि झोपमोड झाली. मस्त गुबगुबित बिछान्यात रजईत गुरफटलेला देह बाहेर पडायला राजी नव्हता. पाठोपाठ दूरध्वनी किणकीणू लागला आणि उठणे भाग पडले. दहाचे उड्डाण म्हणजे नऊला हजेरी, म्हणजे साधारण आठला बाहेर पडणे आले. म्हणजे सातला उठलेले बरे. जरा आळसावायचे, एक चहा, जरा टंगळमंगळ, पुन्हा चहा, मग दाढी, तुषारस्नान, मग सामानाचा ताळेबंद एवढे सगळे जमवयला तास तरी हवाच. आठ दिवसाच्या दौर्यात पाच गावे पालथी घालायची तर ’विंचवाचे बिर्हाड पाठीवर’ अशी स्थिती. रोज नवे गाव, नवे हॉटेल, रोज सामान उघडा आणि दुसर्या दिवशी पुन्हा बांधा. चालायचेच!