खूप खूप वर्षांपूर्वी डॉक्टर व्हावं असं मला वाटत असलं तरी ते मला जमण्यातल नव्हतं हे माझ्या पक्कं लक्षात आलं आहे. डॉ. अस्थाना म्हणतो तसा पाषाणह्रदयीपणा माझ्याकडे आहे. अत्यंत आवडती जीन्स फाटल्यावर मी तिच्याकडे काही न घडल्याप्रमाणे शांतपणे बघू शकतो. तेंडूलकर आउट झाल्यावर टि.व्ही. बंद केला तरी ऑनलाईन मॅचचा स्कोअर पाहू शकतो. ह्यावरून लक्षात आलं असेलच की, अनलाईक मुन्नाभाई, मी अगदी आरामात हात न थरथरता रोग्यांवर शल्यचिकित्सा केली असती. त्यामुळे प्रश्न हिमतीचा किंवा हुशारीचा नाही. प्रश्न आहे पथ्याचा... एखाद्या व्यक्तीला तू अमुक अमुक पदार्थ खाऊ नकोस असा सल्ला देणं ह्यासारखी पौष्टीक अरसिकता ती काय ?